शनिवार, 2 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: मंगळवार, 2 मार्च 2021 (17:54 IST)

अर्थसंकल्पीय अधिवेशन: 'सरकारने काम केलं असतं तर किमान 30 हजार लोकांचे जीव वाचवता आले असते' - देवेंद्र फडणवीस

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे सरकारवर निशाणा साधला. कोव्हिडच्या काळात खूप भ्रष्टाचार झाला असाही आरोप फडणवीसांनी केला.
 
"सरकारने कोरोनाच्या काळात नीट नियोजन आणि व्यवस्थापन केलं नाही त्यामुळे अतिरिक्त 30 हजार लोकांचे प्राण गेले. आपल्याला 30 हजार जीव वाचवता आले असते," असं फडणवीस म्हणाले.
 
'माझं कुटुंब माझी जबाबदारी'
देवेंद्र फडणवीस यांनी माझं कुटुंब माझी जबाबदारी यावरूनही शरसंधान साधले. आधी होतं माझं कुटुंब माझी जबाबदारी, आता आलंय मी जबाबदार. जर सगळ्याच गोष्टीसाठी आम्ही जबाबदार असूत तर सरकार काय करत आहे. सरकारची काय जबाबदारी आहे असा सवाल त्यांनी केला.
 
"जबाबदारी तुमची आणि श्रेय आमचं असं काम सध्या चालू आहे. लहान मुलांना पोलिओ डोस ऐवजी सॅनिटायजर पाजण्यात आलं. भंडाऱ्यात एवढी मोठी दुर्घटना झाली त्यासाठी केवळ कर्मचाऱ्यांना जबाबदार धरण्यात आलं," असं फडणवीस म्हणाले.
 
सेलिब्रिटींच्या ट्वीटवरून विधानसभेत चर्चा
सचिन तेंडुलकर आणि लता मंगेशकर यांनी केलेल्या ट्वीटवरून महाराष्ट्राच्या विधानसभेत विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला.
 
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले, "देशासाठी आम्ही जर सेलिब्रिटींना ट्वीट करायला सांगितले तर आम्हाला अभिमान आहे. यातून आमची देशभक्ती आणि तुमची देशभक्ती दिसतेय."
 
यावर महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले, "लता मंगेशकर आणि सचिन तेंडुलकरच्या ट्वीटची चौकशी कुणीही केली नाही. भाजप पक्षाच्या आयटी सेलचे काहीजण सापडले आहेत. त्यांची चौकशी सुरू आहे."
 
'आमचा आवाज तुमच्या पर्यंत पोहोचत नाही'
21 फेब्रुवारीच्या मुख्यमंत्र्यांच्या लाईव्हवरूनही फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.
 
"21 फेब्रुवारीचं मुख्यमंत्र्यांचं लाईव्ह उत्तम होतं. मुख्यमंत्री म्हणाले माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय का? तुमचा आवाज माझ्यापर्यंत पोहचत नाही. मुख्यमंत्री महोदय जनतेचा आवाज तुमच्यापर्यंत पोहचत नाही.
 
"भंडाऱ्यामध्ये जी घटना घडली. सरकारकडे 6 महिने प्रस्ताव पडून होता पण सरकारने काही केलं नाही. कोणाला फुरसत नव्हती. बालकं मरून गेली.
 
"या सरकारला संतांचाही विसर पडला आहे. संत शिरोमणी नामदेवांचं मंदीर पंजाबमध्ये आहे. पण त्याचवेळी 750 वी जयंती संत नामदेवांची आहे. त्यांचा सरकार का विसर पडला?
 
"राजकीय मेळावे, हॉटेल, दारूची दुकानं उघड्यावर कोरोना वाढत नाही. धार्मिक स्थळं उघडल्यावर कोरोना कसा वाढतो?
 
वीज बिलावरून भाजप आक्रमक
कोरोना काळात ग्राहकांना देण्यात आलेल्या वाढीव वीज बिलांच्या मुद्द्यावरून विधिमंडळ अधिवेशनात आज गोंधळ उडाला.
 
विधिमंडळ अधिवेशनाच्या कामकाजाला सुरूवात झाल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रश्नोत्तराचा तास तहकूब करून वाढीव वीज बिलाच्या मुद्द्यावर चर्चा घेण्यात यावी, अशी मागणी केली. त्यावरून भाजप आक्रमक झालं.
 
सभागृहात गोंधळ सुरू झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मध्यस्थी करत वीज तोडणी मोहिमेला स्थगिती देत असल्याची घोषणा केली. या घोषणेनंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारचे आभार मानले.
 
प्रश्नोत्तरांचा तास बाजूला ठेवून वीज बिलावर (घरगुती वीज बील विद्युत पंपाबाबत) चर्चा केली जावी अशी मागणी भाजपने केली होती. विरोधकांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी केली.
 
सर्वसामान्य नागरिकांच्या वीज कनेक्शनसह कृषी पंपाची वीज तोडण्याची कारवाई थांबवण्यात यावी, अशी मागणी भाजपानं केली. त्यानंतर सभागृहाचं कामकाज सुरू झाल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी वाढीव वीज बिलाचा मुद्दा उपस्थित केला.
 
राज्यात वीज कनेक्शन कापली जात आहेत. कोरोनामुळे संकटात आलेल्या नागरिकांना अडचणीत आणलं जात आहे," असं फडणवीस म्हणाले.
 
भाजप आमदार राम सातपुते यांचं विधानभवनाच्या गेटबाहेर प्रतीकात्मक वीजपंप आणून आंदोलन केलं. भाजप आमदारांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर बसून घोषणाबाजी केली.
 
सत्ताधारी आमदार पेट्रोल डिझेलच्या किंमतीबाबत बॅनर घेऊन वेलमध्ये उतरले.
 
जोपर्यंत यासंदर्भात निर्णय होत नाही तोपर्यंत शेतकर्‍यांच्या वीज बिलाचे कनेक्शन तोडणं बंद केलं जाईल असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं.
 
अजित पवार म्हणतात आधी 12 आमदारांचा प्रश्न मार्गी लावा मग...
विधान परिषदेतलील बारा आमदारांच्या घोषणेचा मुद्दा विधिमंडळ अधिवेशनात चांगलाच गाजत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की आधी राज्यपाल नियुक्त आमदारांचा प्रश्न मार्गी लावा मगच आम्ही मराठवाडा-विदर्भ वैधानिक विकास महामंडळाबाबतची घोषणा करूत.
 
अजित पवार आपल्या भाषणात म्हणाले, "कॅबिनेटने एक निर्णय घेतलेला आहे. 12 नावं विधानपरिषदेची राज्यपाल महोदयांकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आली आहेत. ऐकून घ्या, तुमचं ऐकलं, माझं ऐकून घ्या. अधिवेशन दहा दिवसांचं झालं पाहिजे असं सुधीर मुनगंटीवारजी म्हणाले. दसनंबरी झालं पाहिजे असंही म्हणाले.
 
"आणखी कुठलाही आकडा घ्या. ज्यादिवशी बारा नावं जाहीर होतील त्यादिवशी किंवा दुसऱ्या दिवशी मराठवाडा-विदर्भ वैधानिक विकास महामंडळ जाहीर घोषित केलं जाईल", असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं.
 
अजित पवारांच्या निवेदनावर बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले, "मी दादांचे आभार मानतो की त्यांच्या मनातलं ओठावर आलं. 12 आमदारांकरता विदर्भ-मराठवाड्याला तुम्ही ओलीस ठेवलं आहे.
 
किती राजकारण? विदर्भ-मराठवाड्याचं कवच नसतं तर कसं लुटून नेलंय ते आम्ही सभागृहात वारंवार मांडलं आहे. वैधानिक विकास महामंडळं आमच्याकडे होती म्हणून तुम्हाला बजेट पुन्हा मांडावं लागलं होतं. बजेटमध्ये विदर्भ-मराठवाड्याचे पैसे द्यावे लागले होते. ते 12 करतील तर आम्ही हे करू असं कसं? राज्यपाल आणि तुमचा विषय आहे. सभागृहाला आणि महाराष्ट्राच्या जनतेला काय देणंघेणं आहे?
 
"राज्यपाल हे कुठल्या पक्षाचे आहेत का? त्यांना घटनात्मक अधिकार आहेत. आज तुम्ही जे बोलला आहात, दादा तुम्हाला विनंती आहे की असं बोलू नका. विदर्भ-मराठवाड्यातली जनता माफ करणार नाही. बारा आमदारांकरता तुम्ही मराठवाडा-विदर्भच्या जनतेला ओलीस ठेवणार का?