बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By

WeChat अॅपचा वापर करून चीनचं सरकार लोकांवर पाळत ठेवतं

- स्टीफन मॅकडोनेल
चीनमधील WeChat हे अॅप गप्पा मारण्यासाठी आहे. त्याचबरोबर या अॅपचा वापर इतर अनेक कामांसाठी होतो.
 
ट्विटर, फेसबुक, गुगल मॅप्स, या सगळ्या अॅपचे फीचर या एकाच अॅपमध्ये सापडतात. मात्र या अॅपचा वापर सरकारतर्फे लोकांवर पाळत ठेवण्यासाठीही केला जात आहे. या अॅपवरचं माझं अकाऊंट नुकतंच काढून घेण्यात आलं, ते पुन्हा उघडण्यासाठी मला अनेक द्राविडी प्राणायाम करावे लागले. त्यामुळे मी हे सगळं का केलं? असा प्रश्न अनेकांना पडू शकतो.
 
त्याचं पहिलं महत्त्वाचं कारण असं की बीजिंगमध्ये या अॅपशिवाय राहणं अतिशय कठीण आहे. हे अॅप पुन्हा नसतं सुरू केलं तर कदाचित हा लेख मला लिहिता आला नसता. आता माझी प्रतिमा धोकादायक व्यक्ती म्हणून झाली आहे.
 
तिआनानमेन चौकातील आंदोलनाला तीस वर्षं झाली. त्यानिमित्ताने मी हाँगकाँगमध्ये एक कँडल मार्चचं वार्तांकन करायला गेलो होतो.
 
इतिहासातील ही एक महत्त्वाची घटना मेनलँड चायना भागात बहुतांश लोकांच्या मेंदूतून पुसली गेली आहे. मात्र चिनी भाषिकांमध्ये हाँगकाँगला एक विशेष दर्जा आहे. त्यामुळे या रक्तपाताचं स्मरण करण्यासाठी हजारो लोक दरवर्षी तिथे गोळा होतात.
 
यावेळीही अशीच गर्दी तिथे जमा झाली होती. हा आकडा यावेळी साधारण 1,80,000 होता. साहजिकच या जनसागराचे मी फोटो काढले. हे लोक गात होते, नाचत होते. त्यातील काही फोटो मी WeChat मुमेंट्समध्ये टाकले. त्या पोस्टमध्ये मी काही लिहिलं नव्हतं तर फक्त फोटो टाकले होते.
 
चीनी मित्र मला WeChat विचारू लागले की काय प्रसंग होता. लोक का जमले होते? कुठे होता हा कार्यक्रम?
 
हे सर्व प्रश्न तरुण व्यावसायिक लोक विचारत होते. यावरून 1989 मधील तिआनानमेन ची घटना लोकांच्या मनावरून कशी पुसली आहे हे लक्षात येतं. मी त्यातील काही प्रश्नांची उत्तरं दिली आणि अचानक मला तिथून काढून टाकण्यात आलं.
 
"काही अपवादात्मक कारणांमुळे तुमचं लॉगइन काढून टाकण्यात आलं आहे. पुन्हा लॉगइन करा आणि पुढचे टप्पे पार करा" असा मेसेज माझ्या स्क्रीनवर येऊ लागला. मग मी पुन्हा लॉगइन करण्याचा प्रयत्न केला. "काही द्वेषपूर्ण अफवा पसरवण्याची शंका आल्यामुळे तुमचं अकाऊंट सस्पेंड करण्यात आलं आहे," असा मेसेज झळकला.
 
एखाद्या कार्यक्रमाचे फोटो कोणत्याही कमेंट न करता पोस्ट करणं म्हणजे द्वेषपूर्ण अफवा पसरवणं असा अर्थ चीनमध्ये होत असावा. मला पुन्हा लॉगइन करण्यासाठी काही वेळ देण्यात आला आणि मला दंडही ठोठावण्यात आला.
 
जेव्हा मी पुन्हा प्रयत्न केला तेव्हा द्वेषपूर्ण अफवा पसरवण्याच्या अफवेवर agree and unblock या पर्यायावर क्लिक करावं लागलं. त्यामुळे प्रस्तुत प्रतिनिधीला अफवा पसरवण्याच्या आरोपांना होकारार्थी उत्तर द्यावं लागलं.
 
मग एक टप्पा आला. तिथे सुरक्षेच्या कारणास्तव Face Print ची गरज होती. त्यासाठी तर मी अजिबात तयार नव्हतो. खाली दिसत असलेल्या फोटोत दाखवलं आहे तसं त्या डोक्यासमोर चेहरा ठेवायला सांगितला. तसंच मँडेरिन भाषेतील अंक मला मोठ्या आवाजात वाचायला सांगितला गेला. म्हणजे माझा चेहरा आणि आवाज एकाच वेळी स्कॅन झाला होता. त्यानंतर Approved असा मेसेज आला.
 
हे सगळं झाल्यावर तुम्ही फक्त वैतागत नाही तर या माहितीचा कसा उपयोग होणार याती भीती देखील तुम्हाला वाटू लागते. म्हणजे आता माझं नाव चीन प्रशासनाच्या यादीत एक संशयित म्हणून समाविष्ट झालं आहे.
 
चीनमध्ये जवळजवळ प्रत्येक जण WeChat वापरू लागला आहे. ते न वापरणारा एकही व्यक्ती माझ्या पाहण्यात नाही. टेन्सेट या कंपनीने विकसित केलेलं हे अॅप अफलातून आहे. वापरायलाही सोयीचं आहे. वापरायलाही मजाही येते. हे अॅप काळाच्या पुढे जाणारं आहे. या सर्व कारणांमुळे हे अॅप इथल्या लोकांच्या जगण्याचा अविभाज्य भाग झाला आहे. हे अॅप इथल्या प्रत्येक नागरिकाचा लेखाजोखा सरकारला पुरवू शकतं. अगदी परदेशी नागरिकांचासुद्धा.
 
तिआनानमेन चौकातल्या कार्यक्रमाच्या स्मृतीदिन कार्यक्रमात सहभागी झालेल्या लोकांचा चेहरा आणि आवाज स्कॅन करणं इथल्या सरकारसाठी उपयुक्त ठरू शकतं. भविष्यात अडचणीचे ठरू शकणाऱ्या लोकांचा माग त्याजोगे सरकारला घेता येईल. जेव्हा मी ही सगळा घटनाक्रम ट्विटरवर टाकला तेव्हा इतर लोक मला विचारत होते, "तुझ्या खासगी आयुष्यात इतकी ढवळाढवळ कशासाठी?" कदाचित ते चीनमध्ये राहिले नसावेत. असं काही झाल्याशिवाय इथलं आयुष्यच अपूर्ण आहे.
 
जेव्हा तुम्ही त्यांच्या कामाच्या निमित्ताने एखाद्या व्यक्तीला भेटता तेव्हा तुम्हाला तुमचं कार्ड वगैरे देत नाहीत. ते तुमच्याशी WeChatची माहिती शेअर करतात. जर तुम्ही एखाद्या फुटबॉल टीमसाठी खेळत असाल तर त्याची माहिती WeChatवर असते. मुलांच्या शाळेचं वेळापत्रक, टिंडर सारख्या डेट्स, चित्रपटाची तिकिटं, बातम्या, हॉटेलचं लोकेशन, एक प्लेट नुडल्स ते कपड्यांचं बिल या सगळ्या गोष्टींसाठी या अॅपचा वापर होतो.
 
हे अॅप नसेल तर लोक आप्तेष्टांसाठी आणि मित्रमैत्रिणींशी बोलू शकत नाही. त्यामुळे या अॅपमधून निघणाऱ्या सेन्सर्स च्या हातात एक मोठी शक्ती एकवटली आहे. पाश्चिमात्य देशातील गुप्तचर संस्थांच्या मते हे अॅप अजिबात सुरक्षित नाही. तरीही त्याने तुमचा ताबा घेतला आहे. जर चीनमध्ये तुम्हाला सुरळीत आयुष्य जगायचं असेल तर चीनच्या कम्युनिस्ट नेत्याबद्दल विशेषत: शी जिनपिंग यांच्याबद्दल न बोललेलंच बरं. 2019 मधील चीन असा आहे.