बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: सोमवार, 10 जून 2019 (15:33 IST)

राष्ट्रवादी कॉंग्रेस : बीस साल बाद... पक्षाचं आता पुढे काय होणार?

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची चर्चा करायची म्हटले की हा पक्ष पुढे काय करणार हाच प्रश्न 'बीस साल बाद' सिनेमाच्या तोडीचे रहस्य बनून पुढे येतो. अन्यथा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या आतापर्यंतच्या वाटचालीत आणखी रहस्य ते काय असणार?
 
वीस वर्षांपूर्वी कॉंग्रेस पक्षांतर्गत मतभेद होऊन शरद पवार यांनी मेघालयचे पी. ए. संगमा आणि बिहारचे तारीक अन्वर या अन्य दोन प्रमुख सहकार्‍यांसमवेत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष स्थापन केला. त्यापैकी संगमा आणि पवार यांचे रस्ते २००४ पासूनच वेगळे होऊ लागले होते आणि त्यांनी यथावकाश मेघालयपुरता नॅशनल पीपल्स पार्टी नावाचा पक्ष स्थापन केला तर तारीक अन्वर अलीकडे २०१८ मध्ये कॉंग्रेस मध्ये परत गेले.
 
त्यामुळे आता कितीही दावा केला तरी राष्ट्रवादी काँग्रेस हा महाराष्ट्राचा पक्ष झाला आहे. अर्थात तरीही तो गोवा, गुजरात वगैरे ठिकाणी उमेदवार उभे करतो आणि लक्षद्वीपमधून त्या पक्षाचे खासदार निवडून येतात.
 
पण हे सगळे नंतरचे. १९९९ मध्ये पक्ष स्थापन झाला तेव्हा त्याला स्वतःविषयी बर्‍याच मोठ्या अपेक्षा होत्या. कॉंग्रेसला उतरती कळा लागून दहा वर्षं तेव्हा उलटली होती आणि कॉंग्रेसमधले इतर अनेक जण आपल्याला पाठिंबा देतील अशी या तिघांची अटकळ होती.
 
शिवाय, कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळणार नाही आणि मग आपल्याला जास्त महत्त्वाची भूमिका निभावता येईल असाही एक अंदाज होता. पण कॉंग्रेसमधून फारसा कोणाचा पाठिंबा मिळाला नाही आणि भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीला १९९९ मध्ये बहुमत मिळालं आणि राष्ट्रीय राजकारणात मध्यवर्ती भूमिका बाजवण्याची राष्ट्रवादी कॉंग्रेसची अटकळ धुळीला मिळाली.
 
पक्षाच्या स्थापनेनंतर लगोगलग महाराष्ट्रात कॉंग्रेस पक्षाबरोबर युती करून राष्ट्रवादीने नव्या परिस्थितीशी जुळवून घ्यायला सुरुवात केली. ती जुळणी मधूनमधून मोडतोड होत अजूनही शिल्लक आहे.
 
आता पक्षाला वीस वर्षं पूर्ण होत असताना हा इतिहास राष्ट्रवादी कॉंग्रेसला आपलं स्वतःचं मूल्यमापन करायला खरं तर कामी यायला पाहिजे.
 
कधीतरी हा पक्ष कॉंग्रेस पक्षात मिसळून जाईल असं अधूनमधून म्हटलं जातं. अगदी अलीकडे लोकसभेतील कॉंग्रेसच्या दुसर्‍या दारूण पराभवानंतर राहुल-पवार भेटीनंतर देखील अशाच बातम्या आल्या आणि मग त्यांचा इन्कार केला गेला.
 
राष्ट्रवादीने काय करून दाखवलं?
पण पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी वेगळा कॉंग्रेस पक्ष काढला आणि आता तिथली कॉंग्रेस जवळपास संपली आहे. तर तृणमूल सत्ताधारी पक्ष बनला आहे; आंध्रात जगनमोहन रेड्डी यांनी वेगळी कॉंग्रेस काढली आणि ती आता राज्यात सत्तेवर आली आहे आणि त्याही राज्यात कॉंग्रेस जवळपास खलास झाली आहे. तशी कामगिरी महाराष्ट्रात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष करून दाखवू शकलेला नाही.
 
त्यामुळे आपण नेमके कोणते राजकारण करीत आहोत आणि इथून पुढे कोणते राजकारण आपण करायला पाहिजे असे प्रश्न राष्ट्रवादीला पडले तर नवल नाही.
 
त्यातच, प्रत्यक्षात भाजपाच्या बरोबर न जाऊन देखील हा पक्ष भाजपाबरोबर जाईल का अशी चर्चा सतत चालू असते. गेल्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर शिवसेनेचे तळ्यात की मळ्यात चालले होते तेव्हा भाजपाला जवळपास पाठिंबा देण्याची तयारी राष्ट्रवादीने दाखवली होती.
 
पण आता तोही रस्ता तसा बंदच झाला आहे, कारण देशपातळीवर आता मोदींना ना पवारांच्या सल्ल्याची गरज आहे, ना त्यांच्या चारपाच खासदारांच्या मतांची.
 
महाराष्ट्रात सध्या तरी सेना-भाजपचा दुसरा संसार बरा चालला आहे आणि केंद्रातल्या विजयामुळे भाजपाच्या कानात वारे शिरले असल्यामुळे एकूणही तो पक्ष राष्ट्रवादीला किती जवळ करेल याची शंकाच आहे. त्यामुळे आपला स्वतंत्र बाणा चालू ठेवण्याखेरीज राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला फारसा पर्याय नाही.
 
राष्ट्रवादीची ताकद
गेल्या वीस वर्षांत राष्ट्रवादी कॉंग्रेसने महाराष्ट्रात पहिली १९९९ ची निवडणूक एकट्याच्या जिवावर लढवली आणि २०१४ची लोकसभेची निवडणूक देखील एकट्याने लढवली. पण एकट्याने लढो की आघाडीत, पक्षाची एकंदर ताकद साधारणपणे सुरुवातीपासून थोड्याफार फरकाने होती तेवढीच राहिली आहे-कमीच झाली आहे.
 
सोबतच्या आलेखावरून पक्षाची ही स्थिर अवस्था स्पष्ट होते. सुरूवातीला पक्षाला वीस टक्के मतांचा टप्पा पार करता आला होता तोही नंतर कधीच गाठता आलेला नाही.
 
पक्षाची ही काहीशी कुंठित अवस्था पाहता दोन प्रश्न विचारात घावे लागतात. एक म्हणजे कमाई काय आणि दोन, भवितव्य काय.
 
काय कमावलं?
मागची वीस वर्षं भारताच्या पक्षीय राजकारणात बरीच गुंतागुंतीची होत गेली. भाजप आणि कॉंग्रेस यांच्या नेतृत्वाखाली आघाड्या अस्तित्वात आल्यामुळे नव्या पक्षांना वाढण्यास मर्यादा पडल्या, पण अनेक छोटे पक्ष मात्र अस्तित्वात आले. अशा परस्परविरोधी वातावरणात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष टिकून राहिला हे त्याचे एक श्रेय मानता येईल.
 
अर्थात, तो काही नवा कोरा पक्ष नव्हता. कॉंग्रेसमध्ये ढोबळमानाने जो पवार गट होता, तोच पक्ष म्हणून उभा राहिला. त्यांच्याकडे स्थानिक राजकीय संस्था होत्या, साधनसामग्री होती आणि कार्यकर्ते होते, त्यामुळे एखादा नवा पक्ष स्थापन करताना जी आव्हाने येतात ती या पक्षापुढे नव्हती.
 
मात्र राजकीय चाणाक्षपणामुळे जन्मापासूनच सत्तेची नाळ तुटू न देता अलगद तो सत्ताधारी बनला. त्यामुळे पक्ष टिकायला विशेष मदत झाली—मात्र तरीही पक्ष वाढू शकलेला नाही, हेही लक्षात घेण्यासारखं आहे.
 
पवारांच्या नेतृत्वामुळे या पक्षाकडे सुरुवातीपासूनच कार्यकर्ते -जास्त करून तरुण कार्यकर्ते—मोठ्या प्रमाणात राहिले.
 
खास करून छोट्या शहरांमधले नव्याने विविध छोटे व्यवसाय करू लागलेले तरुण या पक्षाकडे ओढले गेले. (शरद पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणामधील एक महत्त्वाचे शक्तिस्थान आहे, पण इथे त्यांची चर्चा केलेली नाही, कारण एक तर हा एका पक्षाचा आढावा आहे आणि मी आधीच अन्यत्र पवारांच्या राजकाकरणावर सविस्तर लिहिले आहे: पवार नावाचं प्रकरण, महा-अनुभव, दिवाळी अंक, २०१७).
 
शिवाय, पवारांमुळेच राष्ट्रवादी पक्ष देशपातळीवरच्या राजकारणात महत्त्वाचा राहिला आहे. त्यामुळे पक्षाच्या राज्यातील पाठीराख्यांना नेहेमीच उत्साह राहिला आणि आपला पक्ष वाढेल अशी आशा राहिली, पक्षाला साधनसंपत्तीची देखील सर्वसाधारणपणे मुबलकता राहिली.
मुख्य म्हणजे या पवार-केंद्री पक्षात स्वतः शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांचं वर्चस्व असलं तरीही नेहेमीच त्यानंतरच्या टप्प्यावर अनेक महत्त्वाच्या आणि कर्तबगार नेत्यांची फौज उपलब्ध राहिली.
 
त्यांना नेते म्हणण्याचे कारण म्हणजे त्यांना महत्त्वाकांक्षा तर आहेच, पण आपआपल्या गाव-शहराच्या पलिकडे राजकारण केलं पाहिजे याची जाण राहिली आणि अनेकांचं प्रभावक्षेत्र देखील स्वतःच्या शहराच्या-जिल्ह्याच्या बाहेर वाढत गेलं.
 
एका टप्प्यावर छगन भुजबळ हे राज्यपातळीवरचे नेते बनले होते, नंतरच्या काळात आर. आर. पाटील, जयंत पाटील हे पुढे आले; आता अलिकडे सुनील तटकरे, धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड, यांसारखे नेते मोठे होताना दिसतात.
 
उत्तरेपासून दक्षिणेपर्यंतच्या लालू-मुलायम किंवा चंद्राबाबू यांच्या सारख्यांच्या पक्षात आणि अगदी पूर्वेच्या ओडिशामधील बिजू जनता दलात नेतृत्वाची दुसरी-तिसरी फळी ही बाब अगदीच अभावाने आढळते. हे पक्ष बहुशः एकाच नेत्याच्या किंवा कुटुंबाच्या भोवती उभे राहिलेले आहेत; पण आपले कुटुंबीय पुढे आणून देखील किमान प्रमाणात पक्षात नवे आणि पुढच्या टप्प्यावरचे नेतृत्व आणण्याचं शरद पवार यांचं कौशल्य ही राष्ट्रवादीची जमेची बाजू म्हणावी लागेल.
 
किंबहुना, एकीकडे कुटुंबकेंद्री राजकारणाची बेडी आणि दुसरीकडे यशवंतराव चव्हाण-प्रणीत स्पर्धात्मक अनेककेंद्री राजकारणाची रीत अशा दुहेरी प्रभावातून या पक्षाची वाटचाल झालेली आहे. ती जितकी दुसर्‍या मार्गाने होईल तितका पक्ष टिकून राहील, आणि जेवढी ही वाटचाल पहिल्या रस्त्याने होईल तितका पक्ष ठिसूळ आणि पोकळ राहील.
राष्ट्रवादीचं पुढे काय होणार?
इथेच मग पक्षाच्या भवितव्याचा मुद्दा येतो. एका ऐतिहासिक टप्प्यावर आपलं आणि कॉंग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाचे मतभेद झाले म्हणून हा पक्ष उभा राहिला, हे स्वतः शरद पवारांनी अनेक वेळा स्पष्ट केलं आहे. अन्यथा धोरणं, दृष्टी आणि विचार यांच्या बाबतीत राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस यांच्यात काही तफावत नाही.
 
ही बाब महाराष्ट्रात किंवा देशात या पक्षाला खास वेगळा ठसा का उमटवता आला नाही, हे समजण्यासाठी महत्त्वाची आहे. राज्यात काही अंशी प्रादेशिक अस्मितेची भूमिका राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष घेतो; पण तीही फार आक्रमक किंवा जहालपणे नव्हे. त्यामुळे त्याही बाबतीत त्याच्यावर प्रादेशिकतावादी पक्ष म्हणून शिक्का मारणं अवघड आहे. पण म्हणूनच कॉंग्रेसमधील एक गट असंच त्याचं स्वरूप असल्याचा भास बहुतेक वेळा होतो.
 
महाराष्ट्रात वावरताना साहजिकच राज्यातील महत्त्वाच्या अशा मराठा समाजाच्या पाठिंब्यावर राष्ट्रवादीचा डोलारा उभा राहिला, पण त्यामुळेच इतर समाजांपासून हा पक्ष काहीसा दूर राहिला आणि त्यामुळे मर्यादित सामाजिक पाया असलेला पक्ष असंच त्याचं स्वरूप राहिलं. म्हणजे, धोरणं आणि विचार यांच्या बाबतीत मर्यादा आणि सामाजिक आधारांची देखील मर्यादा अशा दुहेरी कात्रीत राष्ट्रवादी कॉंग्रेसला पुढची वाटचाल करावी लागणार आहे.
 
तिसरं आव्हान पक्षाच्या मुख्य कार्यक्षेत्राचं आहे. सुप्रिया सुळे यांची कामगिरी पाहता त्यांना देशपातळीवर वावरायला आवडेल हे स्पष्टच आहे आणि त्या देशपातळीवर राहाव्यात असं इथं पक्षातल्याच अनेकांना वाटत असणार! पण देशपातळीवरचं राजकारण महत्त्वाचं मानायचं की राज्यपातळीवरचं महत्त्वाचं मानायचं हा पेच राहतोच.
 
देशपातळीवर वावरण्यासाठी पक्षाला कधी तरी आपण वेगळे का आहोत आणि आपण कॉंग्रेसमध्ये विलीन का होत नाही, याचा गंभीरपणे विचार करावा लागेल; पण तसं झालं तर महाराष्ट्र पातळीवर पुढे जाऊ बघणार्‍या नेत्यांचे हिशेब बिघडतात अशी स्थिती आहे.
 
त्यामुळे पक्षाची ओढाताण होत राहणार. पक्ष वेगळा राहिला तर राज्यात अनेकांच्या महत्त्वाकांक्षा पूर्ण होण्याची शक्यता राहते, मात्र वेगळा राहूनही पक्षात काहीच वेगळंपण नसल्यामुळे अशा कॉंग्रेस-सदृश पक्षाच्या तुलनेत अगदी शिवसेना देखील पुढे निघून गेली तर आश्चर्य वाटायला नको.
 
म्हणजे, वीस वर्षांनंतर जिद्दीने शिल्लक असलेल्या या पक्षाला आपलं अस्तित्व आणि वेगळंपण यांची काळजी करण्याची गरज आहे. लहानपणी घर सोडून गेलेला मुलगा मोठेपणी परत येतो तेव्हा त्याला आधीच्या कुटुंबात सामावून घ्यायचे की आपसात ये-जा चालू ठेऊन त्याचं घर मात्र वेगळे राहू द्यायचं, असे पेच सिनेमात पडताना आपण पाहतो. तसाच पेच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षापुढे सतत पडत राहणार आहे.
 
तूर्त तरी महाराष्ट्रात कॉंग्रेसला संपवून त्याची जागा घेण्यात अपयश आलेला आणि स्वतःची वेगळी जागा निर्माण करू न शकलेला पक्ष म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष ओळखला जाईल अशी आजघडीची स्थिती आहे.
 
म्हणजे म्हटलं तर तो वेगळा पक्ष आहे, पण त्याच्यात कॉंग्रेसपेक्षा वेगळं काय ते मात्र सांगता येत नाही अशी ही अवस्था आहे.