1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: गुरूवार, 25 जून 2020 (14:07 IST)

सहकारी बँकावर आता रिझर्व्ह बँकेचे नियंत्रण

Co-operative banks
देशातील 1540 नागरी सहकारी बँका आणि बहुराज्यीय सहकारी बँका आता रिझर्व्ह बँकेच्या अखत्यारित येणार आहेत. म्हणजेच या बँका आता रिझर्व्ह बॅंकेच्या देखरेखीखाली असतील. बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाने याबाबतच्या निर्णयाला मान्यता दिली, अशी माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली.
 
गेल्या वर्षी पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँक आर्थिक अडचणीत आल्यानंतर या बँकांच्या आर्थिक व्यवहारांवर रिझर्व्ह बँकेकडून लक्ष ठेवण्यात यावं, अशी मागणी करण्यात येत होती.
 
देशभरातील 1540 नागरी व बहुराज्यीय सहकारी बँकांमध्ये 8.6 कोटींहून जास्त ठेवीदारांचे पैसे आहेत. सुमारे 4.84 लाख कोटी रुपयांच्या ठेवी या बँकेत असून त्या नव्या निर्णयामुळे सुरक्षित राहतील, असं जावडेकर यांनी सांगितलं.
 
याशिवाय मुद्रा शिशु कर्जाच्या व्याजदरात दोन टक्क्यांची सवलत, ओबीसी आयोगाला मुदतवाढ, 15 हजार कोटी रुपयांची पशूधन योजना आणि संशोधन क्षेत्रात नॅशनल स्पेस प्रमोशन अँड ऑथरायजेशन सेंटरची स्थापना या निर्णयांवरही केंद्रीय मंत्रिमंडळाने शिक्कामोर्तब केल्याची माहिती जावडेकर यांनी दिली आहे.