बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: बुधवार, 6 मे 2020 (15:03 IST)

मलेरिया होणार हद्दपार? डासांपासून होणाऱ्या रोगाला आळा घालण्यात शास्त्रज्ञांना मोठं यश

जेम्स गॅलाघर

मलेरिया एक गंभीर आजार आहे. प्लाझमोडियम नावाच्या सूक्ष्मपरजीवीचा (पॅरासाईट) संसर्ग झालेला डास चावल्याने मलेरिया होतो.
 
प्रसंगी प्राणघातक ठरू शकणाऱ्या मलेरियाच्या निर्मूलनाच्या दिशेने सुरू असलेल्या संशोधनात शास्त्रज्ञांना मोठं यश मिळालं आहे.
 
डासांचं प्लाझमोडियमच्या संसर्गापासून बचाव करणारा सूक्ष्मजंतू (microbe) शास्त्रज्ञांनी शोधून काढला आहे. या नवीन शोधामुळे मलेरियावर मोठ्या प्रमाणावर नियंत्रण मिळवता येईल, असं ब्रिटन आणि केनियामधल्या संशोधकांच्या टीमचं म्हणणं आहे.
 
संक्रमित डास चावल्याने माणसाला मलेरिया होतो. मात्र, डासांनाच संसर्ग झाला नाही तर पर्यायाने माणसांनाही आजार होणार नाही, असं संशोधकांचं म्हणणं आहे.
 
त्यामुळे मलेरियाच्या परजीवींपासून बचाव करणारे सूक्ष्मजंतू डासांच्या शरीरात कसे सोडायचे, यावर सध्या संशोधन सुरू आहे.
 
शास्त्रज्ञांनी शोधलेला सूक्ष्मजीव
 
मलेरियाला आळा घालणाऱ्या या सूक्ष्मजंतूचं नाव आहे मायक्रोस्पोरिडिया एमबी (microsporidia MB). केनियामधल्या व्हिक्टोरिया तळ्याच्या काठावर आढळणाऱ्या डासांचा अभ्यास करताना हे सूक्ष्मजंतू आढळून आले. किटकांच्या जननेंद्रिय आणि जठरांमध्ये हे सूक्ष्मजंतू (microbes) असतात.
मायक्रोस्पोरिडिया जंतू असणाऱ्या एकाही डासाच्या शरीरात मलेरियाचे पॅरासाईट आढळले नाही. पुढे प्रयोगशाळेत करण्यात आलेल्या संशोधनातही मायक्रोस्पोरिडिया जंतू डासांचा मलेरियाच्या पॅरासाईट्सपासून रक्षण करत असल्याचं सिद्ध झालं.
 
हे संशोधन 'नेचर' या विज्ञानविषयक जर्नलमध्ये प्रसिद्ध करण्यात आलं आहे.
 
मायक्रोस्पोरिडिया एक प्रकारची बुरशी किंवा बुरशीसदृश्य सूक्ष्मजंतू आहे आणि बहुतांश मायक्रोस्पोरिडियासुद्धा परजीवी आहेत.
 
डासांचं मलेरियाच्या संसर्गापासून बचाव करणारे हे सूक्ष्मजंतू 5 टक्के किटकांमध्ये नैसर्गिकरीत्या आढळतात.
 
किती मोठं यश म्हणता येईल?
केनियातल्या इंटरनॅशनल सेंटर ऑफ इनसेक्ट फिजिऑलॉजी अँड ईकॉलॉजी संस्थेतले डॉ. जेरेमी हेरेन यांनी बीबीसीशी यासंबंधी बातचीत केली. त्यांच्या मते, "आमच्याजवळ आतापर्यंत जी माहिती आहे, त्यावरून असं दिसतं की, हे सूक्ष्मजंतू डासांचा मलेरियापासून 100 टक्के बचाव करतात. हे एक आश्चर्य आहे आणि मलेरिया आजारावर नियंत्रण मिळवण्याच्या मार्गातला एक महत्त्वाचा टप्पा आहे."
जगभरात दरवर्षी मलेरियामुळे जवळपास 4 लाख लोकांचा मृत्यू होतो. यात पाच वर्षांपेक्षा लहान मुलांची संख्या मोठी आहे.
 
मात्र, गेल्या काही वर्षात बेडवर लावण्यासाठीच्या नेट आणि घर आणि परिसरात होणारी जंतुनाशकांची फवारणी, यामुळे मलेरियावर मोठ्या प्रमाणावर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे. असं असलं तरी मलेरियाचा मुकाबला करण्यासाठी नव्या पर्यायांची गरज असल्याचं जाणकारांना वाटतं.
 
सूक्ष्मजीव मलेरियाला आळा कसा घालतो?
 
मायक्रोस्पोरिडिया एमबी हे सूक्ष्मजंतू डासांचा मलेरियाच्या संसर्गापासून बचाव नेमका कसा करतात, यासंबंधी अजून सखोल संशोधन करण्याची गरज आहे. मात्र, आतापर्यंत जे संशोधन झालं आहे त्यावरून असं दिसतं की, हे सूक्ष्मजीव डासांची मलेरियाच्या संसर्गाप्रतीची रोगप्रतिकारक शक्ती वाढवत असावेत.
किंवा मग हे सूक्ष्मजीव डासांच्या मेटॅबॉलिझमवर परिणाम करत असावे, ज्यामुळे डासाच्या शरिरात मलेरियाचे सूक्ष्मजीव तग धरू शकत नाहीत.
 
आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मलेरिया पॅरासाईट्सचा मुकाबला करण्याची ताकद असणाऱ्या मायक्रोस्पोरिडिया या सूक्ष्मजीवाचा परिणाम कायमस्वरूपी असतो. म्हणजेच डासांना एकदा मायक्रोस्पोरिडिया एमबी सूक्ष्मजीवाचा संसर्ग झाला की तो डास कधीच मलेरियाचा वाहक बनत नाही.
 
मलेरियावरील उपचार म्हणून कधी अंमलात येईल?
मलेरियावर नियंत्रण मिळवायचं असेल तर किमान 40 टक्के डासांना मायक्रोस्पोरिडिया एमबी सूक्ष्मजीवांची लागण व्हायला हवी. पूर्ण वाढ झालेल्या डासांमध्ये हे सूक्ष्मजंतू सोडले जाऊ शकतात. शिवाय, मादी डासाकडून तिच्या पिल्लांमध्येही हे जंतू पसरतात.
 
डासांना मायक्रोस्पोरिडिया एमबीची लागण करण्यासाठी संशोधक सध्या दोन मुख्य पर्यायांवर विचार करत आहेत.
 
• मायक्रोस्पोरिडिया ही एक प्रकारची बुरशी आहे. बुरशी बिजाणू तयार करते. असे बिजाणू मोठ्या प्रमाणावर पसरवल्यास डासांना त्यांची लागण होईल.
 
• प्रयोगशाळेत नर डासांमध्ये (नर डास चावत नाहीत) मायक्रोस्पोरिडिया एमबी सोडता येईल. असे संक्रमित नर डास मोकाट सोडल्यास त्यांचा ज्या मादी डासांशी संबंध येईल, त्याही संक्रमित होतील.
 
एमआरसी युनिव्हर्सिटी ऑफ ग्लासग्लो सेंटर फॉर व्हायरस रिसर्चमध्ये प्राध्यापक असलेले स्टिव्हन सिनकिन्स म्हणतात, "हे नवीन संशोधन आहे. मलेरियावर नियंत्रण मिळवण्याची याची क्षमता आश्चर्यचकित करणारी आहे."
 
सूक्ष्मजंतूच्या माध्यमातून एखाद्या आजारावर नियंत्रण मिळवण्याची ही संकल्पना नवीन नाही. वोल्बाचिया नावाच्या एक प्रकारच्या जीवाणूंमुळे डेंग्यूच्या फैलावाला आळा बसल्याचं चाचण्यांमधून सिद्ध झालं आहे.
पुढे काय?
मायक्रोस्पोरिडिया एमबी या सूक्ष्मजंतूंचा फैलाव कसा होतो, हे कळणं महत्त्वाचं आहे आणि म्हणूनच केनियामध्ये अधिकाधिक चाचण्या घेण्याचा शास्त्रज्ञांचा विचार आहे.
अशाप्रकारचे जंतू डासांमध्ये नैसर्गिकरीत्या आढळत असतात. त्यामुळे नव्याने काही करण्यात येतंय, अशातला भाग नाही आणि म्हणूनच अशा प्रकारच्या प्रयोगांवरून सहसा वाद होत नाहीत.
 
शास्त्रज्ञ सांगतात की, डास संपवून आजार संपवायचा, अशी ही प्रक्रिया नाही. या प्रक्रियेत डास नष्ट केले जात नाहीत. त्यामुळे डासांवर अवलंबून असणाऱ्या जीवांचं अन्न हिरावून घेण्याचा प्रश्नच नाही. परिणामी इकोसिस्टिमचा समतोल अबाधित