रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: मंगळवार, 5 मे 2020 (15:23 IST)

कोरोना लॉकडाऊन: घरातलं अन्न संपलं म्हणून तिच्यावर मुलांसाठी दगड शिजवण्याची वेळ आली

कोरोना व्हायरसमुळे केनियेतल्या एका महिलेवर अतिशय बिकट प्रसंग ओढवला.मुलांना खायला घालण्यासाठी काहीच नसल्यामुळे या महिलेला मुलांच्या समाधानासाठी दगडं शिजवण्याचं नाटक करावं लागलं. आठ मुलांची आई असलेल्या या महिलेचं नाव आहे पेनिना बहाती कित्साओ.
 
पेनिना निरक्षर आणि विधवा आहेत. त्या लोकांचे कपडे धुतात आणि त्याद्वारे कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. पण, कोरोना व्हायरसच्या उद्रेकामुळे त्यांचं काम थांबलं.
 
पेनिना यांच्यावर अशी परिस्थिती ओढवली की मुलांना खाऊ घालायला त्यांच्याकडे काहीच नव्हतं. त्यामुळे मग मुलांच्या समाधानासाठी त्यांनी दगडं शिजवायला सुरुवात केली.
 
आई जेवण बनवत आहे, हे बघून बघून शेवटी मुलं झोपी जातील, असा विचार पेनिना यांनी केला.
 
त्यांची शेजारी प्रिस्का मोमानी यांनी या प्रकाराचा व्हीडिओ बनवला आणि तो सोशल मीडियावर शेअर केला. पेनिना यांच्या मुलांच्या रडण्याचा ऐकून प्रिस्का तिथं गेल्या होत्या.
 
केनियातून मदतीचा हात
 
पेनिना यांच्याविषयी माहिती कळताच लोकांनी त्यांच्यासाठी पैसे जमा केले आणि त्यांना सगळीकडून फोन यायला लागले.
 
केनियातल्या NTVला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितलं, "लोकांनी मला मोबाईल अपच्या माध्यमातून पैसे पाठवले. एका शेजाऱ्यांना माझं बँकेत खातं काढून दिलं."
 
"केनियातील लोक इतक्या मोठ्या प्रमाणावर मदत करतील असं वाटलं नव्हतं. हे सगळं माझ्यासाठी एका चमत्कारासारखं आहे," असं त्या सांगतात.
 
त्यांनी केनियातल्या टुको न्यूज वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं, "मी दगडं शिजवून मुलांचं समाधान करण्याचा प्रयत्न करत होते, हे माझ्या मुलांना समजलं होतं. पण माझ्याकडे दुसरा कोणता पर्यायही नव्हता."
 
पेनिना या केनियातल्या मोम्बासा शहरात राहतात. त्यांच्या घरात ना लाईटचं कनेक्शन आहे, ना त्यांच्याकडे पाणी येतं.
 
आफ्रिकेत काय चाललंय?
 
आफ्रिका सेंटर फॉर डिसीज कंट्रोलनं (ACDC) कोरोनावरील उपचारासाठी औषधं आणि लशींची ट्रायल सुरू केली आहे. आफ्रिका खंडातल्या 52 देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत आणि 37 हजारांहून अधिक रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
 
आफ्रिका CDC मते, इतर जगाची तुलना केल्यास आफ्रिका खंडातील कोरोनाच्या रुग्णांचं प्रमाण कमी आहे. तसंच अनेक देशांमध्ये कोरोनावरील उपचारासाठी औषधं आणि लशींची ट्रायल घेतली जात आहे.
 
झाम्बियामध्ये सध्या अँटी-मलेरिया औषध असलेल्या हायड्रोक्सीक्लोरोक्विनचं ट्रायल सुरू आहे. दक्षिण आफ्रिकेत जागतिक आरोग्य संघटनेसोबत मिळून इबोलावरील अँटी-व्हायरल ड्रग रेमडेसिव्हिरचं ट्रायल सुरू आहे. नायजेरियातही एका औषधाचं ट्रायल सुरू आहे.