शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: शुक्रवार, 30 एप्रिल 2021 (17:26 IST)

कोरोना महाराष्ट्र : नंदूरबारचं ऑक्सिजन मॉडेल काय आहे? जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांची मुलाखत

मयांक भागवत
कोव्हिड-19 च्या त्सुनामीने भारतात थैमान घातलंय. शहरी आणि ग्रामीण भागाला कोरोना संसर्गाने विळखा घातलाय. दररोज तीन लाखांपेक्षा जास्त कोरोना रुग्णांची नव्याने नोंद केली जातेय.
कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत देशाची आर्थिक राजधानी, दिल्ली ऑक्सिजनच्या प्रत्येक थेंबासाठी विनवण्या करताना पहायला मिळतेय. महाराष्ट्रातही ऑक्सिजन संकटात कोरोना रुग्णांचा श्वास कोंडला गेला.
ऑक्सिजन बेड्स नसल्याने रिक्षा, गाडी, एवढंच नाही तर रस्त्यावर रुग्णांना ऑक्सिजन देण्यात आला. तडफडणाऱ्या कोरोना रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी ऑक्सिजन ट्रेनही धावताना दिसून आली.
देशात ऑक्सिजनची आणीबाणी सुरू असताना. महाराष्ट्रातील आदिवासी जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नंदूरबारमध्ये 200 पेक्षा जास्त ऑक्सिजन बेड्स रिकामे आहेत. या जिल्ह्याने स्वत:चे तीन ऑक्सिजन प्लांट उभे केले.
हे कसं शक्य झालं? नंदूरबारचं ऑक्सिजन मॉडेल काय आहे? नंदूरबारचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांच्याशी बीबीबी मराठीचे प्रतिनिधी मयांक भागवत यांनी चर्चा केली.
प्रश्न - संपूर्ण राज्य आणि देश ऑक्सिजन टंचाईचा सामना करतोय. मग, नंदूरबारला ऑक्सिजनची चणचण का भासली नाही?
 
डॉ. राजेंद्र भारूड - नंदूरबार हा आदिवासी बहुल जिल्हा आहे. कोरोना संसर्ग पसरला तेव्हा जिल्ह्यात एकही लिक्विड ऑक्सिजन प्लांट नव्हता, आजही नाही. ऑक्सिजन रिफिल करण्याची सुविधा नव्हती. त्यामुळे आम्ही तीन ऑक्सिजन PSA प्लांट उभे केले. हवेतून नायट्रोजन आणि कार्बन डायऑक्साईड वेगळा करून मिळणारा ऑक्सिजन रुग्णालयांना पुरवला.
आम्ही नंदूरबारमध्ये खासगी रुग्णालयांना हे प्लांट बसवण्यासाठी सांगितलं. दोन मोठ्या खासगी रुग्णालयांनी प्लांट बसवले. आता जिल्ह्यात पाच ऑक्सिजन प्लांट आहेत.
 
प्रश्न - या प्लांटची क्षमता किती आहे? लोकांना याचा कसा फायदा होतोय?
 
डॉ. राजेंद्र भारूड - या प्लांटच्या माध्यमातून दर मिनिटाला हवेतून 2000 लीटरपेक्षा जास्त ऑक्सिजन तयार होतोय. दिवसाला 48 लाख लीटर ऑक्सिजनची निर्मिती होत आहे. रुग्णालयात ऑक्सिजनची गरज असलेल्या प्रत्येक रुग्णाला पाईपद्वारे ऑक्सिजन पुरवला जातोय.
एका प्लांटची क्षमता दिवसाला 125 जंबो सिलेंडर भरण्याची आहे. त्यामुळे दिवसाला 425 पेक्षा जास्त जंबो सिलेंडर भरले जातात. याला कोणताही कच्चा माल लागत नाही.
 
प्रश्न - मुंबई, पुणे, नाशिक आणि दिल्ली सारख्या शहरांमध्ये ऑक्सिजन बेड्स उपलब्ध नाहीयेत. रुग्णांची फरफट होतेय. बेड न मिळाल्याने रुग्णांचा जीव जातोय. पण, नंदूरबारमध्ये ऑक्सिजन बेड्स रिकामे आहेत. हे कसं शक्य झालं?
 
डॉ. राजेंद्र भारूड - नंदूरबारमध्ये 6 एप्रिलला एका दिवसात 1200 लोक पॉझिटिव्ह आढळून आले. दुसऱ्या लाटेत सहा पटीने रुग्णसंख्या वाढली. आम्ही ग्रामीण रुग्णालयं, उपजिल्हा रुग्णालय आणि वसतीगृहात ऑक्सिजन बेड्स तयार केले. दुर्गम भागात ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्सचा वापर केला.
 
प्रश्न - नंदूरबारचं ऑक्सिजन नर्स मॉडेल काय आहे? ऑक्सिजनचा अपव्यय कसा कमी केला?
 
डॉ. राजेंद्र भारूड - ऑक्सिजन बेड्स तयार करत असताना लिकेजवर लक्ष दिलं. प्रत्येक 50 बेड्समागे एका नर्सची नेमणूक केली. या नर्सचं काम दर तीन तासांनी प्रत्येकाचा ऑक्सिजन तपासणं, ऑक्सिजनचं लिकेज रोखणं, रुग्णाची ऑक्सिजन लेव्हल तपासणं आहे.
काही रुग्णांना ऑक्सिजनची गरज कमी असते. पण, त्यांना जास्त ऑक्सिजन दिला जातो. ज्यामुळे त्यांच्या फुफ्फुसांवर गंभीर परिणाम होतो.
शाळा, समाजमंदीर, हॉस्टेल, धर्मशाळेत बेड्स तयार केले. कोरोना संक्रमित आदिवासी व्यक्ती घरी न रहाता. त्याला क्वॉरेन्टाईन सेंटरमध्ये ठेवलं. जेणेकरून त्यांचा ऑक्सिजन कमी झाला तर, लगेचच देता येईल.
 
प्रश्न - राज्यात दुसरी लाट येईल याचा अंदाज कसा आला? ऑक्सिजन प्लांट बनवण्याचा निर्णय का घ्यावा लागला?
 
डॉ. राजेंद्र भारूड - जिल्ह्यात एकही ऑक्सिजन प्लांट नव्हता. अशा परिस्थितीत दुसरी लाट आली. या लाटेची तीव्रता जास्त असली तर आपल्याला लिक्विड ऑक्सिजन मिळणार नाही. ऑक्सिजन सिलेंडर बाहेरून मिळणार नाही.
हाच विचार डोळ्यासमोर ठेऊन सप्टेंबरमध्ये पहिला प्लांट उभारला. त्यानंतर फेब्रुवारी आणि मार्चमध्ये दोन प्लांट उभे केले. आम्हाला बॅकअप सपोर्ट मिळाला. दुसऱ्यांवर आम्ही अवलंबून राहिलो नाही.
आता आमच्याकडे गुजरातमधील 15 टक्के रुग्ण उपचार घेत आहेत.
 
प्रश्न - एक डॉक्टर म्हणून तुम्हाला दुसरी लाट आली तर आरोग्यसुविधा कमी पडतील असं कधी जाणवलं?
 
डॉ. राजेंद्र भारूड - पाश्चिमात्य देशांमध्ये गेल्यावर्षी कोरोना संसर्गाचा पीक आल्यानंतर भारतात आला. दुसऱ्या लाटेतही तसंच झालं. तेव्हाच सर्व रुग्णालयात पाईपलाईन तयार करणं, डॉक्टरांची ट्रेनिंग, कंट्रोलरूम तयार करणं यांसारखी कामं करण्यात आली.
जगभरात महामारीचा पॅटर्न सारखाच आहे. आजाराचा पॅटर्न समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. एक डॉक्टर म्हणून मला कोव्हिडचा पॅटर्न समजून घेण्यास खूप मदत झाली.
 
प्रश्न - तिसऱ्या लाटेचा सामाना कसा करायचा?
 
डॉ. राजेंद्र भारूड - कोरोनासाठी आपल्याला नेहमीच तयार रहावं लागेल. पहिल्या लाटेत 200, दुसऱ्या लाटेत 1200 आणि तिसऱ्या लाटेत 2000 रुग्ण येऊ शकतात. असा विचार करू आपल्याला कायम अलर्ट रहावं लागेल. त्यासाठी आमची तयारी आहे का? याचा आपल्याला विचार करून काम करावं लागेल.
लोकांना त्यांच्या गावात कसे उपचार मिळतील. यावर आम्ही लक्ष केंद्रीत करतोय.
आरोग्य सुविधा, डॉक्टर याकडे आपल्याला लक्ष द्यावं लागेल. जेणेकरून तिसऱ्या लाटेचा सामना आपण करू शकू.
 
प्रश्न - महामारीशी लढताना काय उपाययोजना कराव्या लागतील?
 
डॉ. राजेंद्र भारूड - कोव्हिडशी लढणं एकट्या माणसाचं काम नाही. यासाठी अधिकाऱ्यांची टीम असावी लागते. ज्यामुळे खूप प्रेशर कमी होतं. कंट्रोलरूम सर्वात महत्त्वाची आहे. लोकांना कोरोना, रेमडेसिवीरचा वापर, सीटी स्कॅन याबाबत माहिती द्यायला हवी. लसीकरणाबाबत लोकांपर्यंत पोहोचलो पाहिजे. लोकांना घरपोच सुविधांवर लक्ष दिलं पाहिजे.
नंदूरबारमध्ये लसीकरणासाठी कॅम्प लावले जातात. 50-50 लोकांना बोलावून त्यांना लस दिली जाते. जास्तीत-जास्त लोकांना लस दिली पाहिजे. प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्राचा वापर कोरोनासाठी करण्यात आला पाहिजे. लोकांना बेड मिळणं ही आपली प्राथमिकता असली पाहिजे.
लशी निर्यात करण्यापेक्षा भारतातच वापरण्यात आली पाहिजे. काही देशांनी लसीकरणाने कोरोनावर नियंत्रण मिळवलं.