शुरैह नियाजी
मध्यप्रदेशची राजधानी असलेल्या भोपाळमधल्या रेल्वे प्रोटेक्शन फोर्सच्या एका कॉन्स्टेबलचं सगळीकडे कौतुक होतंय. या जवानाने आपल्या जीवाची पर्वा न करता एका अशा लहानगीसाठी दूध पोहचवलं जिला दोन दिवसांपासून दूध मिळत नव्हतं.
ही घटना 31 मे रोजी घडली. आरपीएफचे कॉन्स्टेबल इंद्र यादव तेव्हा स्टेशनवर ड्युटी करत होते. त्यावेळी बेळगावहून गोरखपूरला जाणारी एक श्रमिक स्पेशल ट्रेन भोपाळला थांबली होती. याच ट्रेनमध्ये 23 वर्षीय साफिया हाशमी आपल्या चार महिन्यांच्या चिमुरडीसह प्रवास करत होत्या.
त्यांनी इंद्र यादव यांना गाडीत चढलेलं पाहिलं आणि त्यांच्याकडे मदत मागितली. त्यांच्या मुलीला दूध मिळत नव्हतं, म्हणून ती लहानगी सतत रडत होती.
त्यांना आधीच्या स्टेशनवरही दूध मिळालं नव्हतं. हे ऐकल्यावर इंद्र यादव लगेच गाडीतून उतरून धावत सुटले. धावतच ते स्टेशनवरच्या एका दुकानात गेले आणि बाळासाठी एक दुधाची पिशवी घेतली.
नेमकी त्याच वेळेस गाडी स्टेशनवरून सुटली. इंद्र यादव यांनी गाडी सुटलेली पाहिली तरीही ते दुधाची पिशवी घेऊन त्या ट्रेनच्या मागे जोरात पळत गेले. शेवटी अथक प्रयत्नांनंतर त्यांनी ती दुधाची पिशवी साफिया यांच्या हातात दिली.
आई दिलेले मनापासून धन्यवाद
या घटनेनंतर त्या चिमुरडीच्या आईने इंद्र यादव यांचे आभार मानले. साफिया यांनी गोरखपूरला पोहोचल्यानंतर या बहादूर जवानासाठी एक व्हीडिओ संदेश पाठवला ज्यात त्यांनी आपल्या मुलीसाठी केलेल्या मदतीसाठी इंद्र यादव यांना धन्यवाद दिले.
त्या व्हीडिओत त्या म्हणाल्या, "जसं जसं ट्रेनचा वेग वाढत होता तसं तसं माझ्या मुलीसाठी दूध मिळण्याच्या आशा कमी कमी होत गेल्या. पण इंद्र माझ्या मदतीसाठी भावासारखे धावून आले. त्यांनी वेगाने धावून खिडकीतून दुधाची पिशवी माझ्या हातात दिली. माझ्या या मानलेल्या भावासारखेच लोक आमचे हिरो आहेत."
ही घटना रेल्वे स्टेशनच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेली आहे आणि याचा व्हीडिओ खूप व्हायरल झाला आहे. लोक इंद्र यादव याच्या या कृतीचं कौतुक करतायत. रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी इंद्र यादव यांची ट्विटरवर स्तुती केली आहे. त्यांना रोख रक्कम बक्षीस दिली जाईल, अशीही घोषणा केली आहे.
त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये लिहिलं, " रेल्वे कुटुंबाने हाती घेतलेला हा उपक्रम कौतुकास्पद आहे. आरपीएफ कॉन्स्टेबल इंद्र यादव यांनी अतिशय योग्य रितीने आपलं कर्तव्य बजावलं. त्यांनी चार महिन्यांच्या मुलीला दूध मिळावं म्हणून चालत्या गाडीमागे धाव घेतली. मला त्यांच्या या कृतीचा गर्व आहे. मी त्यांना रोख रकमेचा पुरस्कार देण्याची घोषणा करतो."
साफिया यांच्या मुलीला दूध मिळत नव्हतं त्यामुळे त्या आपल्या मुलीला बिस्किटं पाण्यात भिजवून, त्याचं पातळ मिश्रण खायला घालत होत्या.
इंद्र यादव यांनी याविषयी बोलताना सांगितलं की, "मी या महिलेला भेटलो तेव्हा त्यांनी त्यांची समस्या मला सांगितली. मी त्यांना म्हटलं आहे तिथेच बसा, मी करतो काही व्यवस्था. या बोलण्यात पाच मिनिटं निघून गेले. मी पटकन बाहेर आलो, दुकानात गेलो आणि दुधाची पिशवी घेतली."
पण तोपर्यंत ट्रेन चालू लागली होती, त्यामुळे दुधाची पिशवी साफिया यांना कशी द्यायची हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला.
"मला लक्षात आलं की जोरात पळत जाऊन त्यांच्या हातात दुधाची पिशवी मला द्यावी लागेल. सुदैवाने प्लॅटफॉर्म संपायच्या आधीच साफिया यांच्या बोगीत दूध पोहोचवू शकलो. मी जे केलं ते माझं कर्तव्यचं होतं."