Women’s T20 World Cup 2020: ऑस्ट्रेलिया पाचव्यांदा विश्वविजेता
महिलांच्या ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत भारताला 85 धावांनी पराभव पत्करावा लागला. ऑस्ट्रेलियाने भारताचा दणदणीत पराभव करत पाचवे टी २० विश्वविजेते पटकावले.
शफाली वर्मा, स्मृती मानधना, हरमनप्रीत कौर, जेमायमा रॉड्रीग्ज या फलंदाजांनी दडपणाखाली आपल्या विकेट्स बहाल केल्या. धमाकेदार फलंदाजी करणारी एलिसा हेली सामनावीर ठरली.
नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी केली. ऑस्ट्रेलियन सलामीवीर एलिसा हिलीने विश्वचषकाच्या अंतिम फेरीत सर्वात जलद अर्धशतक झळाकावण्याचा विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे. धडाकेबाज अर्धशतकी खेळीनंतर एलिसा हेली झेलबाद झाली आणि भारताला पहिले यश मिळाले. तिने ३९ चेंडूत ७ चौकार आणि ५ षटकारांसह ७५ धावा केल्या.
त्यानंतर सलग तीन सामन्यांत चांगली कामगिरी करणाऱ्या सलामीवीर बेथ मूनीने या सामन्यात संयमी अर्धशतक केले. बेथ मूनीने नाबाद ७८ धावांची खेळी करत ऑस्ट्रेलियाला १८४ धावसंख्या गाठून दिली. संपूर्ण स्पर्धेत दर्जेदार कामगिरी करणाऱ्या भारतीय गोलंदाजांनी अंतिम सामन्यात प्रचंड धावा खर्च केल्या.
या आव्हानाचा पाठलाग करताना भारताला चांगली सुरुवात करता आली नाही. आतापर्यंत फॉर्मात असलेली भारताची सलामीवीर शेफाली वर्मा ही फक्त दोन धावांवर बाद झाली. त्यानंतर भारताचे फलंदाज सातत्याने बाद होत राहीले आणि ऑस्ट्रेलियाने भारतावर सहज विजय मिळवला.