शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: मेलबर्न , शनिवार, 7 मार्च 2020 (15:52 IST)

स्मृती-शफालीला पॉवरप्लेमध्ये मी गोलंदाजी करणार नाही : मेगन श्चटचा बचावात्मक पवित्रा

मला भारताविरोधात खेळायला आवडत नाही, भारतीय फलंदाज सध्या चांगल्याच फॉर्मात आहेत. स्मृती मंधाना आणि शफाली वर्मा माझ्या गोलंदाजीवर चांगल्या खेळतात. या दोघींविरोधात आम्ही रणनीती आखत आहोत, पण माझ्या मते मी या दोघांविरोधात गोलंदाजी करण्यासाठी योग्य नाही, निदान पॉवर प्लेमध्ये नाहीच नाही. दोन्ही फलंदाज माझी गोलंदाजी व्यवस्थित खेळतात, असे ऑस्ट्रेलियन संघाची प्रमुख गोलंदाज मेगन श्चटने प्रसिध्दी माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत सांगितले.
 
हरनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला संघाने ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या महिला टी-20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे. दुसरीकडे यजमान ऑस्ट्रेलियन महिलांनी दक्षिण आफ्रिकेवर मात करत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला असला तरी मेगन भारताच्या अघाडीच्या फलंदाजांना चांगलीच घाबरलेली आहे. स्मृती आणि शफाली समोर मी पॉवरप्लेमध्ये गोलंदाजीच करणार नसल्याचे तिने म्हटले आहे. तिरंगी मालिकेत शफालीने माझ्या गोलंदाजीवर ठोकलेला षटकार हा माझ्या दृष्टीने सर्वोत्तम होता. माझ्या गोलंदाजीवर कोणत्याही फलंदाजाने आजवर मला इतका उंच षटकार मारलेला नाही, असेही ती म्हणाली.
 
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या उपान्त्य फेरीच्या सामन्यात श्चटने 17 धावांत 2 बळी घेत महत्त्वाची भूमिका  बजावली होती. दुसरीकडे भारतीय संघाच्या सलामीवीर सध्या आक्रमक खेळ करत आहेत. शफाली वर्मा आणि स्मृती मंधाना या सुरुवातीच्या षटकांमध्ये करत असलेली फटकेबाजी पाहून अनेक गोलंदाजांना घाम फुटला होता. 8 मार्च म्हणजेच जागतिक महिला दिनी मेलबर्न क्रिकेट मैदानावर महिला विश्वचषकाचा अंतिम सामना रंगणार आहे. हरनप्रीतच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला सध्या चांगला खेळ करत आहेत. दुसरीकडे ऑस्ट्रेलियन संघ आपल्या घरच्या मैदानावर खेळत असल्यामुळे त्यांचे पारडे जड असणार आहे. त्यामुळे अंतिम फेरीत कोणता संघ बाजी मारतो हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.