सोमवार, 13 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: मेलबर्न , शनिवार, 1 फेब्रुवारी 2020 (17:21 IST)

जेतेपदासाठी थिएम जोकोविचशी भिडणार

ऑस्ट्रियाच्या डॉनिक थिएमने एक सेट गमावल्यानंतर पुनरागन करताना जर्मनीच्या अ‍ॅलेक्झांडर झ्वेरेवला पराभूत करत शुक्रवारी येथे पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस टुर्नामेंटच्या अंतिम फेरीत धडक मारली. आता त्याचा सामना सातवेळचा चॅम्पियन सर्बियाचा दिग्गज नोवाक जोकोविचशी होणार आहे.
 
ऑस्ट्रियाच्या या 26 वर्षीय व पाचव्या मानांकित थिएमने सातव्या स्थानी असलेल्या झ्वेरेवचा 3-6, 6-4, 7-6 (7/3), 7-6 (7/4) ने पराभव केला. आता त्याला जोकोविचच्या कडव आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. ज्याने गुरुवारी दुसर्‍या मानांकित रॉजर फेडररचा सरळ सेटमध्ये पराभव केला आहे. थिएमला सर्बियाच्या खेळाडूविरुध्द दमदार कामगिरी करावी लागेल. जोकोविच मागील 12 सामन्यांमध्ये पराभूत झालेला नाही. त्याने आतापर्यंत कधीही ऑस्ट्रेलियन ओपनचा अंतिम सामना गमावलेला नाही.
 
थिएमने सामन्यानंतर सांगितले की, हा अविश्वसनीय सामना होता. दोन टायब्रेकर झाले. त्यामुळे हे कडवे आव्हान होते. या प्रतिस्पर्धी खेळाडूची सर्व्हिस तोडणे खूपच अवघड होते. या स्पर्धेची अंतिम फेरी गाठणे अविश्वसनीय आहे. ही सत्रातील चांगली सुरुवात आहे. यापूर्वी थिएम दोनवेळा फ्रेंच ओपनच्या अंतिम फेरीत पोहोचला होता. मात्र, दोन्ही वेळा त्याला स्पेनचा स्टार खेळाडू राफेल नदालने पराभूत केले होते.