शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: बुधवार, 24 जून 2020 (14:48 IST)

कोरोना मुंबई : बाळासाहेब ठाकरेंचे डॉक्टर जलील पारकर यांनी कोरोनाविरोधातली लढाई अशी जिंकली

मयांक भागवत
"मी मृत्यूला अगदी जवळून पाहिलंय..खरंतर मृत्यूला स्पर्श केलाय असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. त्यादिवशी मी हॉस्पिटलमध्ये योग्यवेळी पोहोचलो नसतो तर…कदाचित...मला वाटतं माझा मृत्यू झाला असता...मी जगलोच नसतो..."
 
हे शब्द आहेत कोरोनातून बरं झालेल्या डॉ. जलील पारकर यांचे. सामान्य मुंबईकरांना डॉ. पारकर यांची ओळख आहे ती म्हणजे दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे डॉक्टर म्हणून.
 
न दिसणाऱ्या शत्रूविरोधात डॉ. पारकर ढाल बनून सामान्य मुंबईकर आणि कोरोना व्हायरसच्या मध्ये उभे होते. या कालावधीत त्यांनी 200 पेक्षा जास्त रुग्णांवर त्यांनी उपचार केले. पण रुग्णांवर उपचार करताना त्यांनाही कोरोनाची लागण झाली. पाच दिवस आयसीयूमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते.
 
'मी मृत्यूला स्पर्श केलाय…' त्यांच्या या शब्दांनीच अंगावर काटा येतो. एका डॉक्टरचा जीवन-मरणाशी सुरू असलेला संघर्ष कोरोनाच्या भयानकतेची प्रचिती देतो. डॉ. पारकर आता कोरोनामुक्त होऊन मरणाच्या दाढेतून घरी परतले आहेत, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
 
बीबीसी मराठीशी बोलताना डॉ. पारकर म्हणतात, 'मी कोरोनाला दोन्ही बाजूंनी पाहिलंय. एक डॉक्टर म्हणून रुग्णांवर उपचार करताना आणि आता स्वत: रुग्ण म्हणून आयसीयूमध्ये. कोव्हिडने मला बदललंय. माझा संपूर्ण दृष्टिकोनच बदललाय.'
 
फोनवरही डॉक्टरांचा आवाज किती खोल गेलाय हे जाणवत होतं. कोव्हिडमुळे आलेला अशक्तपणा आणि बोलताना लागणारी धाप यावरून कोरोनाने त्यांच्या शरीरावर केलेला आघात स्पष्ट जाणवत होता.
 
देशाचं आर्थिक सत्ताकेंद्र आणि कोट्यवधी लोकांचं स्वप्न असणारी मुंबई. देशात कोरोनाचा सर्वांत मोठा हॉट-स्पॉट बनली आहे. दिवसागणिक वाढणाऱ्या कोरोनाग्रस्तांच्या संख्येमुळे, देशातील कोरोनाची राजधानी अशी नवी ओळख मुंबईची होऊ लागली आहे.
 
'मुंबईत कोरोनाग्रस्तांची संख्या वाढू लागल्यानंतर रुग्णालयात येणाऱ्यांची संख्या वाढू लागली. दिवसाला 100 पेक्षा जास्त रुग्णांची तपासणी करावी लागायची. सुरक्षेच्या सर्व उपाययोजना करूनच रुग्णांची तपासणी करायचो..पण, मला कोरोनाची लागण कशामुळे झाली याबाबत काहीच सांगू शकत नाही,' असं ते सांगतात.
 
मधुमेह असल्याने 'हाय रिस्क' गटातील रुग्ण
 
लिलावती रुग्णालयात कार्यरत असणारे 62 वर्षांचे डॉ. जलील पारकर यांना डायबिटीस आहे. मधुमेह आणि कोरोना हे कॉम्बिनेशन जीवघेणं आहे. महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूमागे अनियंत्रित मधुमेह हे प्रमुख कारण म्हणून पुढे आलं आहे. मधुमेह असल्याने ते एक 'हाय रिस्क' गटातील रुग्ण होते. ते स्वतः चेस्ट फिजीशिअन असल्याने त्यांनादेखील हा धोका माहिती होता.
 
डॉ. जलील पारकर सांगतात, '11 जूनला मला थोडा अशक्तपणा जाणवू लागला. पाठीत खूप दुखू लागलं. ताप किंवा श्वास घेण्यात अडचण नव्हती. मी आयव्हरमॅक्टिन आणि डॉक्सि-सायक्लिन नावाचं अँटीबायोटीक घेण्यास सुरूवात केली. पाच दिवसांचा कोर्स पूर्ण केला. पण, खरा त्रास नंतर सुरू झाला.'
 
'13 जूनच्या रात्री प्रचंड त्रास होऊ लागला. मला जाणवलं, मी आता रुग्णालयात पोहोचलो नाही..तर मी जगणार नाही. माझा मृत्यू निश्चित आहे.'
 
'मी रुग्णालयात कसा पोहोचलो..कधी पोहोचलो.. मला काहीच आठवत नाही. मला हे देखील आठवत नाही की मी आयसीयूत कसा पोहोचलो. शरीरातील ऑक्सिजनची पातळी खूप कमी झाली होती,' असं डॉ. पारकर पुढे सांगतात.
 
बोलताना डॉ. पारकर यांना खोकला येत होता.
 
ते म्हणतात, 'रुग्णालयात अॅडमिट झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी माझं आयुष्य खऱ्या अर्थाने बदललं. तो दिवस मी कधीच विसरू शकणार नाही. माझ्या बाजूच्या बेडवर माझी पत्नी होती. तिला श्वास घेण्यास त्रास होत होता. परिस्थिती गंभीर होती. तो दिवस खरंच भयानक होता. मनात हजारो विचार सुरू होते..पत्नीचं काही बरं-वाईट झालं तर? मी मुलाला काय उत्तर देऊ? त्याला सामोरा कसा जाऊ? मनात या प्रश्नांचं काहूर माजलं होतं,'.
 
'प्रत्येक सेकंद काळासारखा वाटत होता'
लॉकडाऊनच्या 3 महिन्यात त्यांना मुलाला भेटता आलं नाही. बोलणं होतं ते फोनवरून तर कधी व्हीडिओ कॉलने.
 
'आयसीयूमध्ये असताना प्रत्येक सेकंद एक मोठ्या काळासारखा वाटत होता. या दिवसात मी मृत्यूला डोळ्यांनी पाहिलंय..त्याला स्पर्श केलाय. आताही तुमच्याशी बोलताना सर्व स्पष्ट दिसतंय. रॅमडेसिव्हिर, टोसिलोझुमॅब यांसारख्या औषधांमुळे लवकर रिकव्हर झालो. पण याचं खरं श्रेय डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय यांना दिलं पाहिजे. त्यांनी प्रचंड काळजी घेतली,' असं त्यांचं म्हणणं आहे.
 
मधुमेह आणि कोरोना एकत्र येणं म्हणजे मोठा धोका मानला जातो. मधुमेहींनी काय केलं पाहिजे. यावर डॉक्टर म्हणतात, 'आपल्याला कोरोनासोबत जगणं शिकावं लागेल. 2-3 महिने घरी बसलो. कायमचं घरी बसणार का? हे शक्य नाही. घाबरून, लपून बसून चालणार का? योग्य काळजी घेतली पाहिजे,'.
 
ते म्हणतात, 'रुग्णालयातील डॉक्टर, नर्सेस, वॉर्डबॉय आणि इतर कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून काम करतायत. पीपीईमध्ये सहा तास अन्न-पाण्याशिवाय राहात आहेत. आपलं सर्वस्व पणाला लावून लोकांसाठी लढत आहेत."
 
त्याचसोबत, सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी घरकाम करणारे, दूधवाले यांच्याबाबत चुकीची धारणा ठेऊ नये. आपल्या अधिकारांचा गैरवापर करू नये. असं कोणी केल्यास सरकारने त्यांच्यावर योग्य कारवाई करावी, अशी पारकर यांची अपेक्षा आहे.
 
डॉ. पारकर यांना कोव्हिडमुक्त होऊन चार दिवस झालेत. तब्येत सुधारतेय, पण स्वत:वर लक्ष ठेवण्यासाठी उसंत मात्र नाहीये. सध्या ते घरी असले तरी काम त्यांचं संपलेलं नाही. "मी घरातून कन्सल्टेशन सुरू केलंय. रुग्णांशी फोनवरून बोलतोय. माझं काम लोकांचे जीव वाचवणं आहे. मला खात्री आहे, लवकरच बरा होईन, विकनेस जाईल आणि पुन्हा जोमाने कोव्हिड वॉर्डमध्ये परतेन. माझी खरी गरज तिथेच आहे."