बच्चे पार्टीच्या सर्वाधिक आवडत्या चित्रपटांमध्ये यंदा ‘अॅव्हेंजर्स एंडगेम’ पहिला
‘अॅव्हेंजर्स एंडगेम’ हा सुपरहिरोपट इतिहासातील सर्वाधिक गाजलेल्या चित्रपटांपैकी एक होता. या चित्रपटात एकाच वेळी जवळपास ३३ सुपरहिरो धमाकेदार अॅक्शन करताना दिसले. परंतु शेकडो कोटींची कमाई करणाऱ्या या चित्रपटाला ऑस्करमध्ये मात्र जागा मिळवता आली नव्हती. परिणामी सुपहिरो चाहते नाराज होते. परंतु आनंदाची बाब म्हणजे यंदाच्या किड्स च्वॉईस पुरस्कारावर ‘अॅव्हेंजर्स एंडगेम’ने नाव कोरले आहे. म्हणजेच लहान मुलांच्या सर्वाधिक आवडत्या चित्रपटांमध्ये यंदा ‘अॅव्हेंजर्स एंडगेम’ पहिल्या क्रमांकावर आहे.
करोना विषाणूच्या वाढत्या प्रभावामुळे यंदाचा किड्स चॉईस पुरस्कार सोहळा वर्चुअली साजरा करण्यात आला. वर्षभरात ज्या चित्रपटांना लहान मुलांनी सर्वाधिक प्रतिसाद दिला अशा चित्रपटांना आणि कलाकारांना हा पुरस्कार प्रदान केला जातो. ‘अॅव्हेंजर्स एंडगेम’ सोबतच ‘स्पायडमॅन: फार फ्रॉम होम’मध्ये स्पायडरमॅनची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या अभिनेता टॉम हॉलंडला यंदाचा सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून पुरस्कार मिळाला. तसेच स्ट्रेंजर्स थिंग्स यंदाची सर्वाधिक लोकप्रिय कौटुंबिक मालिका ठरली.