बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: सोमवार, 26 एप्रिल 2021 (16:32 IST)

कोरोना : दुसऱ्या लाटेसाठी केवळ निवडणूक आयोग जबाबदार - मद्रास हायकोर्ट

कोरोना काळात निवडणूक प्रचारसभांना परवानगी दिल्यासाठी मद्रास उच्च न्यायालयाने निवडणूक आयोगावर जोरदार टीका केली आहे.
 
सोमवारी (26 एप्रिल) मद्रास उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती संजीब बॅनर्जी यांनी निवडणूक आयोगाची बाजू मांडणाऱ्या वकिलांना सांगितलं की, "कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसाठी केवळ निवडणूक आयोगच जबाबदार आहे."
 
"निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांवर हत्येचा आरोप लावला पाहिजे," अशा शब्दात हायकोर्टानं नाराजी व्यक्त केली.
"न्यायालयाचा स्पष्ट आदेश असूनही निवडणूक प्रचारादरम्यान मास्क, सॅनिटायझर आणि सुरक्षित अंतर या नियमांची अंमलबजावणी आयोग करू शकलं नाही," असंही न्यायमूर्ती संजीब बॅनर्जी म्हणाले.
 
"निवडणूक प्रचारसभा होत असताना तुम्ही दुसऱ्या ग्रहावर होता का?" असा प्रश्नही त्यांनी निवडणूक आयोगाच्या वकिलांना विचारला.
"कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर नमूद करण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन मतमोजणीच्या दिवशी कसे केले जाईल याचे पूर्ण नियोजन न्यायालयात सादर करण्यात यावे असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. नाहीतर न्यायलय 2 मे रोजी होणाऱ्या मतमोजणीला स्थगिती देऊ शकतं," असंही न्यायायाने म्हटलं आहे.
 
सरन्यायाधीश संजीब बॅनर्जी यांच्या अध्यक्षतेखालील दोन न्यायाधीशांच्या खंडपीठाने निवडणूक आयोगाला यासंदर्भात निर्देश दिले आहेत.
 
राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी आणि आरोग्य विभागाचे सचिव यांनी चर्चा करून मतमोजणीच्या दिवसासाठी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रोटोकॉल तयार करावा, असे निर्देश न्यायालयाने दिले. यासाठी 30 एप्रिलपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.
केरळ, तामिळनाडू, आसाम आणि पुद्दुचेरीमध्ये नुकत्याच विधानसभा निवडणुका पार पडल्या.
 
पश्चिम बंगालमध्ये अद्याप मतदान संपलेले नाही. सोमवारी (26 एप्रिल) सातव्या टप्प्याचे मतदान होत असून त्यानंतर आठव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान पार पडेल.
 
2 मे रोजी सर्व राज्यांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर होतील.