कोरोना संसर्गामुळे आईच्या कुशीत जाता येईना, मायलेकीची भेट व्हीडिओ कॉलवर
मयांक भागवत
कोव्हिड-19च्या संकटाने अनेकांची ताटातूट झाली आहे. आपल्यांपासून, कुटुंबापासून, जवळच्यांपासून दूरवर लोक अडकून पडलेत. राज्य, जिल्हे आणि शहरांच्या सीमा सील झाल्याने आपल्या घरी परतण्याची इच्छा असूनही अनेकांना घरी जाता येत नाही. अशा परिस्थितीत लोक एकमेकांना तंत्रज्ञानाचा आधार घेऊन एकमेकांना भेटण्याचा प्रयत्न करत आहेत.
लॉकडाऊनमुळे आपली माणसं प्रत्यक्षात दिसत नाहीत. त्यामुळे सध्या व्हीडिओ कॉल हे सगळ्यात सोयीचं माध्यम आहे. गुरुवारी (23 एप्रिल) औरंगाबादमध्ये झालेल्या एका घटनेमुळे अनेकांचे डोळे पाणावले आणि व्हीडिओ कॉलचं महत्त्व अधोरेखित झालं.
औरंगाबादमध्ये एका महिलेनं मुलीला जन्म दिला. दुर्दैवाने, आईला कोव्हिडची लागण झाली होती आणि तिला आपल्या मुलीला पाहता आलं नाही, कुशीत घेता आलं नाही. नऊ महिने पोटात वाढवल्यानंतर मायलेकींची अशी विचित्र ताटातूट झाली.
मुलीला कुशीत घेण्यासाठी आई आतूर होती. तिचा जीव कासावीस झाला होता. अशावेळी रुग्णालयातील डॉक्टरांनी या तान्हुलीची आईसोबत भेट घडवून आणली.
आई आणि तान्हुलीची भेट
आई कोरोनाग्रस्त असल्यामुळे मुलीला तिच्याजवळ नेणं शक्य नव्हतं. त्यामुळे रुग्णालयातील डॉक्टरांनी माय-लेकींची भेट व्हीडिओ कॉलच्या माध्यमातून करण्याचं ठरवलं. या जगात आल्यानंतर तंत्रज्ञानाच्या मदतीने पहिल्यांदाच मुलीची आईबरोबर भेट झाली.
या संपूर्ण प्रसंगाबाबत औरंगाबाद जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाले, "आईला कोरोना झाल्यामुळे मुलीला तिच्यापासून लांब ठेवण्यात आलं आहे. आई आणि बाळ दोघंही वेगवेगळ्या कक्षात आहेत. पण, आईची आपल्या मुलीला पाहायची खूप इच्छा होती. ही भेट घडवण्यासाठी आम्ही व्हीडिओ कॉलिंगची मदत घेतली. व्हीडिओ कॉलद्वारे आईला पहिल्यांदा आपल्या मुलीला पाहता आलं."
डॉक्टरांच्या माहितीनुसार, आईने मुलीला पहिल्यांदा पाहिल्यानंतर तिचे डोळे भरून आले होते. मुलीला कधी एकदा भेटते अशी आईची अवस्था आहे. मात्र, कोरोनाग्रस्त असल्याने मुलीला तिच्याजवळ पाठवण्यात येत नाही.
या चिमुकलीची काळजी घेणाऱ्या बालरोगतज्ज्ञ डॉ. भारती नागरेंनी म्हटलं, "आईचा आवाज ऐकलाच मुलीने लगेचच मान डोलावली. आईचा आवाज या चिमुरडीने ओळखला. बेटा आप कैसे हो? अच्छे हो ना? आपको कोई तकलीफ तो नहीं? असं आईने विचारलं. आईने मुलीबरोबर काही वेळ गप्पा मारल्या. आईच्या चेहऱ्यावरील आनंद गगनात मावेनासा होता. हा आनंद मीसुद्धा शब्दात व्यक्त करू शकत नाही."
"आई एकटक आपल्या मुलीकडे पाहत होती. काही दिवसांच्या या मुलीनेही आईच्या हाकेला उत्तम प्रतिसाद दिला. बाळंही एकटक मोबाईलकडे पहात होतं. हेच खरं आई-मुलीचं नातं म्हणावं लागेल. कोरोनाने दोघींना एकमेकींपासून दूर केलंय. पण, पाहा, आईच्या एका हाकेला या मुलीने कसा प्रतिसाद दिला. हे नातं वेगळं आहे. कोणीच शब्दात सांगू शकणार नाही, असं डॉ. नागरे पुढे म्हणाल्या. डॉक्टरांकडून काय उपाययोजना?
नवजात बाळासाठी आईचं दूध सर्वात पौष्टिक आणि महत्त्वाचं आहे. आईचं दूध बाळाच्या शरीरात रोगप्रतिकारक शक्ती निर्माण करण्यासाठी आणि वाढीसाठी फार गरजेचं आहे.
डॉ. कुलकर्णी म्हणतात, "आई आणि बाळाला जरी दूर ठेवण्यात आलं असलं, तरी आईचं दूध बाळाला दिलं जात आहे. आईचं दूध बाळासाठी अमृतच. मुलीची काळजी घेत असलेल्या डॉक्टर आईचं दूध मिळावं यासाठी सर्व उपाययोजना करत आहेत. आईचं दूध काढून बाळाला देण्यात येत आहे." महिलेचीप्रसूतीकशी झाली?
डॉक्टरांच्या माहितीप्रमाणे, ही महिला 16 एप्रिलला मुंबईहून औरंगाबादला प्रसुतीसाठी आली होती. मात्र, औरंगाबादच्या सीमेवर पोलिसांनी त्यांना अडवल्यानंतर थेट रुग्णालयात आणलं. ज्याठिकाणी त्यांची कोरोनाची तपासणी करण्यात आली.
डॉ. कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीनुसार, "कोरोनाच्या तपासणी महिला पॉझिटिव्ह आली. ती 9 महिन्याची गर्भवती होती. त्यामुळे तिची प्रसूती खूप आव्हानात्मक होती. सिझेरिअन डिलिव्हरीनंतर या महिलेने मुलीला जन्म दिला. सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजे, आई कोरोनाग्रस्त असली तरी, या मुलीला कोरोनाची लागण झालेली नाही."
"आमच्या माहितीप्रमाणे देशातील ही दुसऱ्या कोरोनाग्रस्त महिलेची डिलीव्हरी आहे. या आधी दिल्लीतील एम्समध्ये कोरोना पॉझिटिव्ह महिलेची प्रसुती करण्यात आली होती," अशी माहिती डॉ. कुलकर्णी यांनी दिली आहे.