मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Updated : शुक्रवार, 24 एप्रिल 2020 (11:24 IST)

महाराष्ट्र देशा; शायलॉकच्या देशा?

काल रात्री पत्रकार आणि रिपब्लिक चॅनलचे संपादक ह्यांच्यावर अहिंसावादी कॉंग्रेसच्या गुंडांनी हल्ला केला. राहुल गांधी एका भाषणात भाजपला उद्देशून म्हणाले होते की सावरकर तुमचे आणि गांधी आमचे. राहुल अतिशय अभिमानाने म्हणतात की आम्ही (म्हणजे कॉंग्रेसने) शस्त्राशिवाय स्वातंत्र्य मिळवलं आहे. स्वातंत्र्य युद्धातील इतरांचं श्रेय हिसकावून घेण्याची कॉंग्रेसची जुनी परंपरा आहे. राहुल ह्यांना वाटतं की ते व त्यांचा पक्ष अहिंसावादी आहे आणि भाजपा ही सावरकरांच्या मार्गाने चालणारी असल्यामुळे ती हिंसावादी आहे. पण वेळोवेळी घडलेल्या घटना काय सांगतात? शीखांची कत्तल काय सांगते? 
महाराष्ट्रामध्ये सध्या जनतेने नाकारलेले तीन घटक कपटाने एकत्र आले असून त्यांनी सरकार स्थापन केले आहे. वंदनीय हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेबांचे सुपुत्र उद्धव ठाकरे हे आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. उद्धवजी ह्यांची संयमी भूमिका सध्या प्रचलित आहे. पण ते बाळासाहेबांचे सुपुत्र आहेत हे दाखवण्याची वेळ आता आली आहे. कवी गोविंदाग्रजांनी महाराष्ट्राचे सुंदर वर्णन केले होते. 
राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा
नाजुक देशा, कोमल देशा, फुलांच्याही देशा

परंतु गोविंदाग्रजांचे शब्द खोटे ठरवण्यासाठी एक घटक प्रकर्षाने प्रयत्न करत आहे. महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून राजकीय पक्षांच्या गुंडांची दडपशाही प्रचंड वाढली आहे. ठाण्यातील अनंत करमुसे प्रकरण हे लोकशाहीला काळीमा फासणारे होते. नरेंद्र मोदींना जनतेने बहुमताने निवडून दिल्यावर जे लोक खालच्या पातळीवर टिका करत होते व त्यांना व्यक्तिसातंत्र्याचे उमाळे फुटत होते तेच लोक आता व्यक्तिस्वातंत्र्यावर गदा आणू पाहत आहेत. मुळात सत्तेचा वापर सज्जनांच्या विरोधत करण्याची त्यांची जुनी परंपरा आहे. वांद्रे येथे अफवेवरुन हजारो लोक जमा झाले. पालघरमध्ये साधू संतांची निर्घृण हत्या झाली. महाराष्ट्रात कोरोना योद्ध्यांवर होणारे हल्ले आणि काल रात्री झालेला अर्णब गोस्वामी ह्यांच्यावर झालेला हल्ला हा शाहू, फुले व आंबेडकरांच्या महाराष्ट्राला काळिमा फासणार आहे. महाराष्ट्र देश हा गुडांचा देश करण्यासाठी कुणीतरी प्रयत्न करत आहे. महाराष्ट्राचे मंत्री डॉ. नितीन राऊत ह्यांनी ट्विट करुन सोनिया गांधींविरोधात अर्णब ह्यांनी केलेल्या विधानाबद्दल निषेध केला. त्यांना पक्षाची बाजू सांभाळून घेणे स्वाभाविक आहे. पण सोनिया गांधी ह्यांनी नरेंद्र मोदिंबद्दल कोणकोणते शब्द वापरले होते याचे अध्ययन त्यांनी करायला हरकत नाही. सरकारवर टिका करणर्‍यांना मारहाण होत आहे किंवा त्यांच्यावर गुन्हे नोंदवले जात आहेत. आता कुठे आहे व्यक्तिस्वातंत्र्य?

नरेंद्र मोदी ह्यांना गुजरात दंगलीत अडकवण्याचा प्रयत्न केला. कोर्टाने निर्दोष मुक्तता करुनही त्यांच्यावर गलिच्छ आरोप केले. अमित शहांवर गलिच्छ आरोप केले. पण त्यांनाही बाबासाहेब आंबेडकरांच्या कायद्याने न्याय मिळवून दिला. पण आंबेडकरांचं नाव राजकीय फायद्यासाठी घेणार्‍यांनी मात्र आपल्या मर्जीच्या विरोधात निकाल लागला तर कोर्टावरच संशय घेतला. म्हणजे त्यांना जो चोर वाटतो तोच चोर असला पाहिजे. मग खरा चोर मोकाट फिरला तरी चालतो. हा कोणता न्याय आहे? अर्णब गोस्वामींचा कार्यक्रम मी पाहत नाही. त्यांचे ओरडणे मला आवडत नाही. पण निखिल वागळे वेगळं काय करतात? ते तर त्यांच्या कार्यक्रमात अरेरावी करायचे. पण स्वतःला सेक्युलर म्हणवून घेणार्‍यांनी वागळे सरांना निर्भिड पत्रकार म्हटले आहेच. मग या न्यायाने अर्णब सुद्धा निर्भिड पत्रकार ठरतात.

लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आवाज उठवण्याचा अधिकार आहे. सरकार आणि विरोधी पक्ष अशी लोकशाहीची रचना आहे. पण हे सरकार आल्यापासून सरकारवर टिका करणार्‍यांना एकतर मारले जाते किंवा कायद्याच्या कचाट्यात अडकवले जात आहे. उद्धव ठाकरेंवर टिका केली तर टिकाकारांचे टक्कल केले जाते. राष्ट्रवादीच्या नेत्यांवर टिका केली तर त्यांना मारहाण केली जाते. पण हेच उद्धवजी कन्हैया कुमारला बोलण्याचा अधिकार आहे असं म्हणाले होते. मग तो अधिकार आता इतरांपासून का हिरावून घेत आहेत? जिग्नेश मेवानी टिव्हीवरील चालू चर्चेत म्हणाले होते की मोदी आता बुढ्ढे झालेत, उन्हे हड्डीया गलानेके लिये हिमायल में जाना चाहिये. पण त्यावर सेक्युलर म्हणवणार्‍यांनी कधीच टिका नाही केली. नरेंद्र मोदींची प्रेतयात्रा कोणी काढली होती?  नरेंद्र मोदींच्या सत्तेच्या काळात आजही त्यांच्यावर लोक उघडपणे, बिनधास्त टिका केली जाते. तरीही त्यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न होतोय असा खोटा प्रचार केला गेला. पण इथे मात्र सरळसरळ मोघलाई आल्याप्रमाणे कारभार होत आहे. राजा तो चांगला ज्याच्याबद्दल सज्जनांच्या मनात आदर आणि दूर्जनांच्या मनात भिती असते. पण इथे दूर्जन माजले आहेत. ते उघडपणे गुंडगिरी करत आहेत आणि सज्जन प्रचंड घाबरलेले आहेत. 
ही दडपशाही कधी थांबणार आहे? जनतेवरचे हल्ले कधी बंद होणार आहे? या हल्ल्यांच्या विरोधात तथाकथिक सेक्युलर, मानवतावादी आवाज का उठलत नाहीत? राज ठाकरे मागे एका भाषणात म्हणाले होते की माझ्यावर टिका करणार्‍यांना घरात घुसून मारा... यापेक्षा मोठे दुःख कोणते असू शकते. ज्या नेत्याचा झेंडा आमच्या पिढीने एकेकाळी उचलला होता, तो नेता इतका घसरला... ही भावना या अशा नेत्यांच्या मनात कशी निर्माण होते. पॉवरचा वापर जनतेच्या सुरक्षेसाठी न करता, जनतेला मारण्यासाठी का केला जातो? ही कोणती संस्कृती आहे. स्वामी विवेकानंदांनी सांगितलेली ही शायलॉक संस्कृती तर नाही ना? लोकांची पिळवणूक करणार्‍या संस्कृतीला स्वामी विवेकानंद शायलॉक संस्कृती म्हणायचे. शायलॉक हा शेक्सपियरच्या नाटकातला व्हिलन आहे. सध्या पॉवरचा वापर करुन सामान्य जनतेची, आवाज उठवणार्‍यांची जी पिळवणूक होत आहे ती लोकशाहीला लाजवणारी आहे, बाबासाहेबांच्या संविधानाची हत्या करणारी आहे. हे थांबलं पाहिजे, त्यासाठी सज्जनांचा धाक निर्माण झाला पाहिजे. लोकशाही मार्गाने आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या संवैधानिक मार्गाने हा धाक निर्माण करता येईल. ही लढाई स्वतःला अहिंसक म्हणवून घेणार्‍या क्रूर संस्कृतीच्या विरोधात आहे. ही लढाई शायलॉक संस्कृतीच्या विरोधातली आहे आणि ही लढाई बाबासाहेब आंबेडकरांच्या मार्गाने जिंकता येणार आहे. आपण संविधानाची एक प्रत हातात घेऊन "निषेध" असं एकसुरात म्हणालो तरी या शायलॉक संस्कृतीला हादरे बसू शकतात. पण (सध्या लॉकडाऊनचे नियम पाळून) एकसुरात म्हणण्याची गरज आहे... गोविंदाग्रजांनी महाराष्ट्राचे जे वर्णन केले होते त्या वर्णनाला धक्का पोहोचू न देण्याची जबाबदारी आपल्या हातात आहे. अर्णब गोस्वामी ह्यांच्यावर झालेल्या क्रूर हल्ल्याचा "निषेध"... 
 
लेखक: जयेश शत्रुघ्न मेस्त्री