मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: बुधवार, 22 एप्रिल 2020 (11:51 IST)

रॅपिड ऍन्टीबॉडी टेस्ट म्हणजे काय, केंद्राने त्याला स्थिगिती का दिली?

कोरोना व्हासरसचा नेमका किती प्रसार झाला आहे हे शोधण्यासाठी रॅपिड ऍन्टीबॉडी टेस्ट उपयोगी ठरू शकते का, याची चर्चा सुरू असतानाच केंद्र सरकारनं त्यावर 2 दिवसांची बंदी घातली आहे.
 
त्याच्या आदल्या दिवशीच म्हणजे सोमवारी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महाराष्ट्र सरकार राज्यात 75 हजार 'रॅपिड टेस्ट' करणार असल्याचं जाहीर केलं होतं.
 
आरोग्यमंत्री म्हणाले होते, "केंद्र सरकारने 'रॅपिड टेस्ट' मान्य केल्याने राज्यात 75 हजार टेस्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत केंद्राने काही गाईडलाइन्स दिल्या आहेत. ज्यांना 100 ते 104 ताप आहे, कफ असेल. 5-6 दिवस खोकला थांबत नाहीये. अशा ठिकाणी रॅपिड टेस्ट करावं अशी गाईडलाईन आहे."
 
राजस्थानने घातली बंदी
एकीकडे महाराष्ट्र सरकार रॅपिड ऍन्टी बॉडी टेस्ट करण्याचा निर्णय घेत असताना दुसरीकडे राजस्थानच्या अशोक गेहलोत सरकारने ही टेस्ट बॅन केली आहे. या टेस्टची कार्यक्षमता योग्य नाही, असं राजस्थान सरकारचं म्हणणं आहे.
 
आजतक वृत्तवाहिनीशी बोलताना राजस्थानचे आरोग्यमंत्री रघु शर्मा म्हणाले, "या टेस्टमुळे 90 टक्के योग्य माहिती मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र, फक्त 5.4 टक्के योग्य माहिती मिळाली. ही टेस्ट सुरू ठेवायची का नाही, याबाबत आम्ही इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्चशी चर्चा करत आहोत."
 
राजस्थान सरकारने रॅपिड टेस्ट किट्सबाबत प्रश्न उपस्थित केल्यानंतर इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्चने पुढील दोन दिवस रॅपिड टेस्ट किटचा वापर करू नका, अशी सूचना राज्यांना दिलीये.
 
ICMRची राज्यांना सूचना
मंगळवारी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलताना आयसीएमआरचे प्रमुख डॉ. रमण गंगाखेडकर म्हणाले, "रॅपिड टेस्ट किट्स राज्यांना देण्यात आले. काल एका राज्यातून कमी डिटेक्शन झाल्याची तक्रार मिळाली आहे. आज तीन राज्यांसोबत चर्चा झाली. त्यातून एक समजलं की RT-PCRच्या पॉझिटिव्ह सॅम्पल्समध्ये आणि रॅपिड टेस्टमध्ये खूप जास्त व्हेरिएशन्स आहेत. ६ टक्क्यांपासून ७१ टक्क्यांपर्यंत RT-PCR सॅम्पल्सची रक्त चाचणी पॉझिटिव्ह आहे. ही चांगली गोष्ट नाही. हे व्हेरिएशन जास्त असल्याने आम्हाला तपासावं लागेल."
 
"हे व्हेरिएशन सापडल्यानंतर पुढील दोन दिवसात आम्ही आमच्या आठ इन्स्टिट्युट्सना फिल्डवर पाठवू. किट्सचं पुन्हा व्हॅलिडेशन करण्याचा आम्ही प्रयत्न करू. सर्व राज्यांना पुढील दोन दिवस टेस्ट किट वापरू नये अशी सूचना देण्यात आली आहे. दोन दिवसानंतर याबाबत पुढील सूचना दिली जाईल. किट्सच्या बॅचमध्ये त्रुटी असतील तर कंपनीकडून रिप्लेस करावी लागेल. त्यामुळे पुढील दोन दिवस या किट्सचा वापर करू नये," असं डॉ. गंगाखेडकर पुढे म्हणाले.
 
ऍन्टीबॉडी म्हणजे काय?
 
शरीरात कोणत्याही विषाणू किंवा जीवाणूचा शिरकाव झाल्यानंतर, आपलं शरीर त्याचा प्रतिकार करण्यासाठी काही प्रथिनं (प्रोटीन) तयार करतं. या प्रथिनांना ऍन्टी बॉडी म्हणतात. इन्फेक्शन झाल्यानंतर ७ ते १० दिवसात शरीरात ऍन्टीबॉडी तयार होतात.
 
रॅपिड ऍन्टी बॉडी टेस्टचा वापर कशासाठी?
रॅपिड ऍन्टीबॉडी टेस्टमध्ये कोरोनाची लागण झाली आहे का हे थेट कळत नाही. पण त्याचा फैलाव किती झालेला असू शकतो किंवा ए-सिम्प्टोमॅटिक लोकांमध्ये त्याचा फैलाव होत आहे का याची कल्पना येते.
 
याविषयी ICMR चे प्रमुख डॉ. रमण गंगाखेडकर यांनी सविस्तर सांगितलं आहे.
 
ते सांगतात, "ऍन्टीबॉडी म्हणजे इन्फेक्शन विरोधात लढण्यासाठी शरीराने तयार केलेलं हे शस्त्र आहे. ऍन्टीबॉडी विषाणूच्या विरुद्ध असते, त्याला चिकटून बसते, ज्यामुळे विषाणू नाकाम होतो. सर्वांत पहिल्यांदा IGM ऍन्टीबॉडी तयार होतं. यावरून आपल्याला कळतं की इन्फेक्शन ताजं आहे. शरीरात IGG ऍन्टीबॉडी तयार झाल्यानंतर कळतं की प्रतिकारशक्ती चांगली आहे. शरीरात फक्त IGG ऍन्टीबॉडी दिसून आल्या तर समजावं की इन्फेक्शन जुनं आहे."
 
"रॅपिड ऍन्टीबॉडी टेस्ट लवकर निदान होण्यासाठी करण्यात येत नाहीत. याचा उपयोग सर्व्हेलन्ससाठी करण्यात येतो. हॉटस्पॉटमध्ये इन्फेक्शन कमी होतंय, का वाढतंय हे जाणून घेण्यासाठी काही नियमित अंतराने ऍन्टीबॉडी टेस्ट करता येईल. शरीरात ऍन्टीबॉडी तयार झाल्यानंतर पुन्हा इन्फेक्शन होणार नाही असं अजिबात नाही," असं गंगाखेडकर स्पष्ट करतात.
 
म्हणजेच ऍन्टीबॉडी टेस्ट इन्फेक्शन झालं आहे का नाही हे शोधून काढण्याचा अप्रत्यक्ष मार्ग आहे.
 
ऍन्टीबॉडी टेस्टचा उपयोग किती?
ऍन्टीबॉडी टेस्ट नेमकी किती परिणामकारक आहे, त्याचा नेमका किती उपयोग होऊ शकतो याबाबत आम्ही मुंबईतल्या काही पॅथॉलॉजी तज्ज्ञांशी चर्चा केली.
 
याबाबत बोलताना महाराष्ट्र पॅथोलॉजी असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. संदीप यादव म्हणाले, "ही टेस्ट कोव्हिड-19चं इन्फेक्शन ओळखू शकते याचा ठोस पुरावा नाही. मात्र, राजस्थान आणि महाराष्ट्रातील परिस्थिती वेगळी आहे. त्यामुळे राजस्थानशी तुलना योग्य नाही. मुंबईची लोकसंख्या खूप जास्त आहे. कोव्हिड-19चा फैलावही मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे धारावी, वरळीसारख्या हॉटस्पॉटमध्ये संसर्ग कोणापर्यंत पोहोचलाय हे शोधण्यासाठी याचा वापर होवू शकेल. मात्र, इतर ठिकाणी त्याचा वापर केला जावू नये, नाहीतर याचा काही उपयोग होणार नाही."
 
पण नवी मुंबईतले पॅथॉलॉजिस्ट डॉ. हेमंत भालेकर यांचं मात्र मत वेगळं आहे. त्याच्यामते RT-PCR टेस्टच कोव्हीड-19साठी महत्त्वाची आहे. शिवाय रॅपिड ऍन्टीबॉडी टेस्टनंतरही RT-PCR टेस्ट करावीच लागणार असं ते सांगतात.
 
"RT-PCR आणि रॅपिड ऍन्टीबॉडी टेस्ट दोन्ही महत्त्वाच्या आहेत. पण, कोव्हिड-19च्या निदानासाठी RT-PCR टेस्ट ही गोल्ड स्टॅडर्ड मानली जाते. ऍन्टीबॉडी टेस्टच्या निदानाचा योग्य अर्थ समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. ऍन्टीबॉडी टेस्टचे रिझल्ट्स RT-PCR टेस्ट करून पुन्हा प्रमाणित करावे लागतील. नक्की इन्फेक्शन केव्हा झालं याची ठोस माहिती नसल्याने RT-PCR आणि ऍन्टीबॉडी टेस्टचं कॉम्बिनेशन रोगाचं अचून निदान सुधारण्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. ICMR टेस्ट किट्सचं प्रमाणीकरण करण्याचा निर्णय ऍन्टीबॉडी टेस्ट रिझल्ट्स योग्य अर्थ लावण्यासाठी घेतला असावा," असं डॉ. भालेकर सांगतात.
 
मुंबईतले आणखी एक पॅथॉलॉजिस्ट डॉ. प्रसाद कुलकर्णी यांना राजस्थान सरकारला आलेले अनुभव महत्त्वाचे वाटतात.
 
ते सांगतात, "राजस्थान सरकारने रॅपिड टेस्ट बॅन केलीये. त्यामुळे, राजस्थानमध्ये वापरण्यात आलेले किट्स जर आपल्याकडे येणार असतील, तर खात्रीकरून वापरण्यात यावेत. या किट्सच्या तांत्रित बाबी, त्रुटी आणि राजस्थान सरकारचा अनुभव विचारात घेऊन मगच महाराष्ट्र सरकारने रॅपिड टेस्टिंग करावं. काही चुका राहील्या असतील तर त्या दुरूस्त करून राज्य सरकारने याबाबत पुढचं पाउल उचलावं."
 
जागात रॅपिड ऍन्टीबॉडी टेस्टची स्थिती काय?
इटलीमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांची रॅपिड ऍन्टीबॉडी टेस्ट करण्यात आली. मात्र, संपूर्ण देशात इटलीच्या सरकारने याला परवानगी दिलेली नाही.
 
तर, ब्रिटन सरकारने ही टेस्ट संपूर्णत योग्य असल्याचे पुरावे मिळत नाहीत तोपर्यंत करणार नाही, असा निर्णय घेतलाय. आरोग्य मंत्री मॅट हॅन्कॉक यांच्यानुसार, "आतापर्यंत 15 ऍन्टीबॉडी टेस्ट घेण्यात आल्या आहेत. पण, त्यापैकी कोणतीही योग्य नव्हती."
 
ब्रिटनमधील प्रोफेसर जॉन न्यूटन यांच्या माहितीनुसार, "चीनमधून आणण्यात आलेल्या टेस्टच्या माध्यमातून रुग्णांच्या शरीरातील ऍन्टीबॉडी शोधणं शक्य झालं जे कोरोनामुळे गंभीर आजारी होते. मात्र, माईल्ड लक्षणं या टेस्टमध्ये आढळून आली नाहीत."
 
तर, जागतिक आरोग्य संघटनेच्या टेक्निकल हेड डॉ. मारिया वॅन केरकोव्ह म्हणतात, "या टेस्टच्या माध्यमातून रक्तात निर्माण होणाऱ्या ऍन्टीबॉडीची मात्रा मापता येते. मात्र, अशा व्यक्तींना पुन्हा इन्फेक्शन होणार नाही याचा काही पुरावा नाही."