सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: बुधवार, 10 मार्च 2021 (17:24 IST)

कोरोना परीक्षा : मला परीक्षा काळातच कोव्हिड-19ची लागण झाली तर..."

दीपाली जगताप
"मॅडम आमचा काहीच अभ्यास झालेला नाही. ऑनलाईनमध्ये काहीच कळालेलं नाही. त्यात मला कोरोनाची लागण झाली आणि मी नापास झालो तर..." बारावी विज्ञान शाखेचा विद्यार्थी असलेल्या शिवम पालने बीबीसी मराठीशी बोलताना आपल्या मनातील भीती व्यक्त केली.
शिवम पाल मुंबईतील झुनझुनवाला कनिष्ठ महाविद्यालयात विज्ञान शाखेत शिकतो. अकरावीतून बारावीत प्रवेश घेण्याआधीच गेल्यावर्षी लॉकडॉऊन लागू झाला. महाविद्यालयातून बारावीत प्रवेश तर मिळाला पण वर्षभर केवळ मोबाईलच्या माध्यमातून शिक्षण घेतल्याने विषयांचं पुरेसं आकलन करता आलेलं नाही, अशी त्याची तक्रार आहे.
 
तो म्हणाला, "आम्ही परीक्षेसाठी तयारच नाही. ऑनलाईनमध्ये काहीही कळालेलं नाही. कोणत्याही विषयाचं प्रात्यक्षिक वर्षभरात झालेलं नाही. त्यात कोरोनाची लागण होण्याची भीती. मी नापास झालो तर ही भीती सतत मनात आहे."
औरंगाबादमध्ये सैनिक शाळेत बारावीत शिकणारा गजानन बिमरोत याचीही अशीच प्रतिक्रिया आहे.
 
बीबीसी मराठीशी बोलताना त्याने सांगितलं, "ग्रामीण भागात राहत असल्याने ऑनलाईन शिक्षण व्यवस्थित झालेलं नाही. गुणवत्ता शिक्षण मिळू शकलेलं नाही. नेटवर्कमुळे शिकण्यात सारखा व्यत्यय येत होता. त्यामुळे अभ्यासक्रमही पूर्ण झालेला नाही."
"कुटुंबालाही आमची खूप काळजी वाटते. परीक्षा देताना कोरोनाची लागण झाली तर याला कोण जबाबदार असेल? आमची शिक्षणमंत्री मॅडमला विनंती आहे की त्यांनी परीक्षा पुढे ढकलावी."
 
"आताच्या परिस्थितीत परीक्षा दिली तर नापास होण्याची खूप भीती आहे. टक्केवारी कमी होण्याची भीती आहे. प्रत्यक्षात कॉलेजमध्ये शिकणे आणि ऑनलाईन शिकणे यात खूप फरक आहे. जिथे आम्हाला विषयाची जाण नाही तिथे परीक्षा कशी द्यायची," असा प्रश्नही गजानन यांनी उपस्थित केला.
बारावी बोर्डाची परीक्षा देणाऱ्या धनश्री जाधवने सांगितलं, "कोरोनामुळे खूप नुकसान झालंय आमचं. परीक्षेच्या वेळेला आम्हाला कोरोना झाला तर आमचे पेपर कोण लिहिणार? अनेक चॅप्टर्स शिकवलेले नाहीत. तसंच शिक्षण विभागाकडून सरावासाठी प्रश्नपत्रिका दिल्या जाणार होत्या त्या अद्याप आमच्यापर्यंत पोहचलेल्या नाहीत."
 
धनश्री औरंगाबादमध्ये राहते. ती सांगते याठिकाणी रुग्णांची संख्या वाढते आहे. पण तरीही लोकांमध्ये गांभीर्य नाही. घराबाहेर लोकांची खूप गर्दी असते. लोक मास्क वापरत नाहीत. त्यामुळे आम्हालाही बाहेर जायला भीती वाटते. पण परीक्षेसाठी बाहेर पडावेच लागेल.
 
ही भीती केवळ मोजक्या विद्यार्थ्यांच्या मनात नाही तर सध्या राज्यातील लाखो विद्यार्थी आणि पालकांना हीच काळजी आहे.
 
एप्रिल ते मे या दोन महिन्यात SSC, HSC, CBSE, ICSE बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा आहेत. पण महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रम आहे.
तेव्हा महाराष्ट्रात बोर्डाच्या परीक्षा कशा होणार? लाखो विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची काळजी कशी घेतली जाणार? कोरोना रुग्णसंख्या वाढत असताना परीक्षा घेणं योग्य आहे का? लेखी परीक्षेसाठी लाखो विद्यार्थी एकाच वेळी घराबाहेर पडतील त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी कोणाची? असे अनेक प्रश्न विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांकडून उपस्थित केले जात आहेत.
 
बोर्डाच्या परीक्षांवर कोरोनाचे सावट
1 फेब्रुवारीपर्यंत राज्यात जवळपास 2 हजार नवीन कोरोना रुग्णांची नोंद होत होती. पण हीच संख्या 1 मार्चपर्यंत 8 हजार नवीन रुग्ण एवढी झाली. म्हणजेच पाच पटींनी वाढली. त्यामुळे बोर्डाच्या परीक्षांवरही आता कोरोना आरोग्य संकटाचं सावट आहे.
 
मुंबई, ठाणे, नवी मुंबई, औरंगाबाद, पुणे, नागपूर अशा जिल्ह्यांमध्ये आजही शाळा बंद आहेत. नववी ते बारावीचे वर्गही या जिल्ह्यांमध्ये सुरू झालेले नाहीत. अमरावती, यवतमाळ, ठाणे अशा काही जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
 
एकाबाजूला कोरोना रुग्णसंख्या वाढते आहे आणि दुसऱ्या बाजूला महाविकस आघाडीचं सरकार बोर्डाची परीक्षा घेण्याबाबत ठाम आहे.
 
विद्यार्थ्यांनी वर्षभर ऑनलाईन शिक्षण घेतलं आहे. त्यामुळे बोर्डाची परीक्षाही ऑनलाईन घ्यावी अशी काही विद्यार्थी आणि पालकांची मागणी आहे. पण ग्रामीण भागाचा विचार करता ऑनलाईन परीक्षा हा व्यवहार्य पर्याय नसल्याचं शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी बीबीसी मराठीशी बोलताना स्पष्ट केलं.
 
बोर्डाच्या परीक्षा ऑफलाईनच होतील असं सीबीएसई बोर्डानेही स्पष्ट केले आहे.
 
राज्यात यंदा बोर्डाची परीक्षा देणारे जवळपास 30 लाख विद्यार्थी आहेत. कोरोना आरोग्य संकट काळात एवढ्या मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांची परीक्षा घेणे प्रशासकीय यंत्रणेसाठीही आव्हानात्मक ठरणार आहे.
 
'सरकारने 'या' प्रश्नांचीही उत्तरं द्यावी'
इंडिया वाईड पॅरेंट असोसिएशनने महाराष्ट्रात 1.50 लाख विद्यार्थी आणि पालकांचं सर्वेक्षण केल्याचा दावा केलाय. परीक्षा देताना कोरोनाची लागण होण्याची भीती विद्यार्थी आणि पालकांच्या मनात असल्याचं या सर्वेक्षणातून समोर आल्याचं संघटनेच्या प्रमुख अनुभा सहाय सांगतात.
 
बीबीसी मराठीशी बोलताना त्यांनी सांगितलं, "कोरोनाचा प्रादुर्भाव महाराष्ट्रात वाढतोय. अनेक भागांत निर्बंध लागू केले आहेत. परीक्षा केंद्रापर्यंत पोहचण्यासाठी वाहतूक व्यवस्थेच्या अडचणी आहेत. विद्यार्थ्याला परीक्षेदरम्यान कोरोना झाला तर काय करणार? याचं उत्तर सरकार देत नाही."
 
"परीक्षेआधी सर्व विद्यार्थ्यांच्या कोरोना चाचण्या बंधनकारक असणार आहेत का? हे सुद्धा स्पष्ट केलेलं नाही. एका वर्गातील विद्यार्थी किंवा शिक्षकाला कोरोनाची लागण झाल्यास संपूर्ण वर्ग धोक्यात येऊ शकतो. त्या विद्यार्थ्यांना पुन्हा संधी दिली जाणार का? असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत."
 
"ज्या जिल्ह्यांमध्ये शाळा बंद ठेवल्या आहेत त्याठिकाणी प्रात्यक्षिक सुद्धा होत नाहीत. मग परीक्षा कशा घेणार?" असाही प्रश्न अनुभा सहाय यांनी उपस्थित केला.
 
'विद्यार्थ्यांसाठी कोरोनाची लसही उपलब्ध नाही'
राज्यात कोरोनाची लागण झालेल्या नवीन रुग्णांची संख्या ही एप्रिल महिन्यापर्यंत आणखी वाढेल असा अंदाज वैद्यकीय तज्ज्ञांनी वर्तवला आहे.
 
इंडियन मेडिकल असोसिएशनचे महाराष्ट्राचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे सांगतात, "मार्चमध्ये कोरोनाच्या नवीन रुग्णांची संख्या पाच पटींनी वाढली. त्यामुळे एप्रिलमध्ये हा आकडा यापेक्षाही मोठा असेल. आरोग्यमंत्र्यांनीही गंभीर परिस्थिती असल्याचं मान्य करत लॉकडॉऊन करण्याची वेळ येऊ शकते असं म्हटलं."
"अशा परिस्थितीत राज्यात लाखो विद्यार्थ्यांची परीक्षा घेणं धोक्याचं ठरेल. कारण या विद्यार्थ्यांसाठी कोरोनाची लसही उपलब्ध नाही. त्यांची परीक्षा एप्रिलमध्ये सुरू होत आहे आणि तोपर्यंत नवीन रुग्णांची संख्या 20-24 हजारापर्यंत जाऊ शकते. अशावेळेला परीक्षा घेणं म्हणजे विद्यार्थ्यांना तोफेच्या तोंडी देण्यासारखं आहे,"
 
ते पुढे सांगतात, "विद्यार्थी जसे घराबाहेर पडतील तसा कोरोना संसर्गाचा धोका सुरू होतो. वाहतूकी दरम्यान कोरोनाची लागण होण्याची शक्यता आहे. परीक्षा केंद्रांवर काळजी घेतली तरी एकाच ठिकाणी मोठ्या संख्येने विद्यार्थी जमा होणार आहेत. तेव्हा धोका कायम आहे. पालक मुलांना परीक्षेसाठी पाठवण्याचं धाडस करणार नाहीत असंही वाटतं."
 
"वर्गातील एका विद्यार्थ्याला जरी कोरोनाची लागण झाली तरी संपूर्ण परीक्षा केंद्राला कोरोनाचा धोका निर्माण होऊ शकतो. यापेक्षा परीक्षा पुढे ढकलावी असं मला वाटतं. मुलांना कोरोनाची लागण झाली आणि एखादा विद्यार्थी गंभीर झाला तर सरकारला पालकांच्या रोषाला सामोरं जावं लागेल,"असंही डॉ. भोंडवे सांगतात.
 
राज्य शिक्षण मंडळाची भूमिका
राज्य शिक्षण मंडळाने एसएससी आणि एचएससी परीक्षांची तयारी सुरू केली आहे. केंद्रीय आरोग्य विभाग आणि राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार बोर्ड काम करत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
राज्य शिक्षण मंडळाच्या एका अधिकाऱ्याने बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, "परीक्षेला अजून दीड महिना बाकी आहे. तेव्हा तयारीसाठी पुरेसा वेळ आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी योग्य ती खबरदारी घेतली जाईल. विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षित अंतर असेल."
 
परीक्षेआधी विद्यार्थ्यांना कोरोना चाचणी करावी लागेल का? या प्रश्नाचे उत्तर देताना त्यांनी सांगितलं,
 
"सरकारकडून अद्याप अशा कोणत्याही सूचना आलेल्या नाहीत. शासनाच्या निर्णयानंतरच योग्य त्या सूचना विद्यार्थ्यांना देण्यात येतील."
 
बोर्डाच्या परीक्षा सुरू होण्यासाठी अद्याप दीड महिन्याचा वेळ आहे. तोपर्यंत कोरोना रुग्णांची संख्या आणि संसर्ग याचा आढावा घेतला जाऊ शकतो. सध्यातरी ठाकरे सरकार बोर्डाच्या परीक्षांबाबत ठाम असून परीक्षा लेखी होणार असल्याचंही शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केलं आहे.