शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: बुधवार, 10 मार्च 2021 (16:57 IST)

सचिन वाझेंची बदली, त्यांच्यावर मनसुख हिरेन यांची हत्या केल्याचा आरोप का होतोय?

मयांक भागवत
मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झालेत. सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधकांमध्ये विधिमंडळात आणि बाहेर जोरदार बाचाबाची सुरू आहे.
 
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधिमंडळात सांगितले आहे की क्राइम ब्रांचमधून हटवणार असल्याची माहिती दिली.
 
आज विधिमंडळात सचिन वाझेंच्या निलंबनाच्या मागणीवरून गदारोळ झाला. सचिन वाझे यांच्या संदर्भात पुरावे दिले. त्यांना पदावरून दूर करण्याचा निर्णय घोषित केला गेला पाहिजे, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली. तर त्यांना उत्तर देताना परिवहन मंत्री अनिल परब म्हणाले "सचिन वाझेंची CIU मधून त्यांची बदली केली जाईल. आपण सभागृह चालू द्यावं. जे पुरावे विरोधी पक्षनेत्यांकडे आहेत ते त्यांनी द्यावेत."
 
हिरेन यांच्या पत्नीच्या जबाबानंतर विरोधक आक्रमक
मनसुख हिरेन यांच्या पत्नी विमला यांनी एटीएसला दिलेल्या जबाबात सचिन वाझेंनी खून केल्याचा संशय व्यक्त केला.
 
त्यानंतर "मनसुख हिरेन हत्येप्रकरणी सचिन वाझेंना अटक करा," अशी मागणी फडणवीसांनी केली. तर, "अर्णब गोस्वामींना अटक केली म्हणून वाझेंना टार्गेट केलं जातंय," असा आरोप सत्ताधाऱ्यांनी केला.
 
सचिन वाझेंच्या मुद्यावर विधिमंडळाचं अधिवेशन तब्बल 9 वेळा तहकूब करण्यात आलं.
 
मनसुख यांच्या पत्नीचे आरोप
मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यूनंतर सरकारने तपास एटीएसला दिला. एटीएसला दिलेल्या जबाबात विमला यांनी सचिन वाझेंवर खळबळजनक आरोप केले.
 
"सचिव वाझे माझ्या पतीला ओळखत होते. नोव्हेंबर महिन्यात माझ्या पतीने गाडी वाझे यांना वापरण्यासाठी दिली होती. वाझेंनी फेब्रुवारी महिन्यात गाडी परत दिली," असा आरोप विमला यांनी केला.
विमला पुढे म्हणतात, "26 फेब्रुवारीला सचिन वाझेंनी माझ्या पतीला चौकशीसाठी नेलं. संध्याकाळी ते त्यांच्यासोबतच घरी आले. पुढे दोन दिवस माझे पती सचिन वाझेंसोबत जात होते आणि येत होते."
 
"वाझेंनी माझ्या पतीला या प्रकरणात अटक हो. तुला 2-3 दिवसात जामिनावर बाहेर काढतो," असं माझ्या पतीने मला सांगितल्याचा जबाब एटीएसला दिलाय.
 
या जबाबात विमला पुढे आरोप करतात, "माझे पती मनसुख यांचा खून झाला असावा अशी माझी खात्री आहे. हा खून सचिन वाझेंनी केल्याचा मला संशय आहे."
 
एटीएसने मनसुख हिरेन यांच्या पत्नी विमला यांच्या तक्रारीवर अज्ज्ञातांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केलाय.
 
काय म्हणाले अनिल देशमुख?
शुक्रवारी 5 मार्चला मनसुख हिरेन यांचं प्रकरण देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात उपस्थित केलं. हिरेन यांचा मृतदेह सापडल्यानंतर ठाणे पोलिसांनी प्राथमिकदृष्ट्या ही आत्महत्या असल्याचा संशय व्यक्त केला होता.
 
गृहमंत्री अनिल देशमुख विधीमंडळात निवेदन करताना म्हणाले होते, "मनसुख हिरेन यांच्या मृतदेहावर जखमा नाहीत. त्यांचे हात बांधलेले नव्हते. या प्रकरणाची चौकशी केली जात आहे."
 
त्यानंतर सोमवारी 8 मार्चला गृहमंत्र्यांनी मनसुख हिरेन प्रकरणाची चौकशी एटीएसला दिल्याची माहिती दिली होती.
 
मंगळवारी 9 मार्चला अनिल देशमुख म्हणाले "मनसुख हिरेन यांनी आत्महत्या केली का त्यांची हत्या झाली याचा तपास पोलीस करत आहेत. पत्नीच्या जबाबावरून गुन्हा दाखल करण्यात आलाय. एटीएस या प्रकरणाची चौकशी करून सत्य बाहेर आणेल. राज्य सरकार कोणालाही पाठीशी घालणार नाही."
 
10 मार्च रोजी अनिल देशमुख यांनी विधिमंडळात सांगितले की वाझेंना क्राइम ब्रांचमधून हटवणार, त्यांची बदली केली जाईल.
 
आरोपाच्या केंद्रस्थानी सचिन वाझे
मनसुख हिरेन यांच्या पत्नी विमला यांनी वाझेंवर खूनाचा संशय व्यक्त केल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधीमंडळात वाझंच्या अटकेची मागणी केली.
 
"सचिन वाझेंना कोण वाचवण्याचा प्रयत्न करत आहे? पुरावे असतानाही सरकार वाझेंवर का कारवाई करत नाही? ते एका पक्षात होते म्हणून? असं म्हणत सचिन वाझेंना अटक करा," ही मागणी फडणवीस यांनी लावून धरली.
 
तर, शिवसेनेचे मंत्री अनिल परब यांनी "अर्णब गोस्वामी यांना सचिन वाझेंनी अटक केली म्हणून त्यांना टार्गेट करण्यात येतंय," अशी प्रतिक्रिया दिली.
 
"सचिन वाझे साधे पोलीस अधिकारी आहेत. ते आयुक्त नाहीत, कोणत्या संस्थेचे प्रमुख नाही. मग विरोधीपक्ष या अधिकाऱ्याला का घाबरतं?" असा सवाल परब यांनी विरोधीपक्षाला विचारलाय.
 
भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये म्हणाले, "आमचा मुद्दा सचिन वाझेंच्या चौकशीचा आहे. पुरावे असताना त्यांच्यावर सरकार कारवाई का करत नाही? राजकारणासाठी ज्या मुद्यांचा संबंध नाही असे मुद्दे सत्ताधाऱ्यांकडून उकरून काढले जात आहेत. आमचा मुद्दा सचिन वाझेंवर कारवाईचा आहे. सरकार या प्रश्नाचं उत्तर देत नाही."
 
वाझेंवर कारवाई होणार?
सचिन वाझेंच्या अटकेची मागणी विरोधकांनी करताच. सत्ताधारी शिवसेनेने अपक्ष खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्येचा मुद्दा उपस्थित केला. त्यानंतर विधीमंडळात गोंधळ सुरू झाला.
 
विरोधकांनी "सरकार खूनी है" अशी घोषणाबाजी सुरू केली.
 
पण, सरकारने सचिव वाझेंवर कारवाईबाबत एकही शब्द उच्चारला नाही. त्यामुळे मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणी सरकार सचिन वाझेंवर कारवाई करेल असे संकेत दिसून येत नाहीत.
 
बीबीसीशी बोलताना सचिन वाझेंवर तुर्तास कारवाई होणार नाही असे संकेत संसदीय कार्यमंत्री अनिल परब यांनी दिले. ते म्हणाले, "तपास एटीएसकडे आहे. यात वाझेंचा संबंध नाही. पण, वाझेंना निलंबित करा अशी मागणी होतेय. ते म्हणतील तसं करा, असं होत नाही."
 
"निःपक्षपातीपणे चौकशी झाल्यानंतर कारवाई होईल. फक्त ते म्हणतात म्हणून निलंबित केलं जाणार नाही. चौकशीनंतर वाझे काय, इतर मोठे अधिकारी असतील तर सरकार पाठीशी घालणार नाही," असं अनिल परब पुढे म्हणाले.
 
वाझे-हाय प्रोफाईल प्रकरणाचे तपास अधिकारी
सचिन वाझे शिवसेनेत होते. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या ते अत्यंत जवळचे मानले जातात.
 
अन्वय नाईक आत्महत्येप्रकरणी अर्णब गोस्वामींच्या अटकेमागे वाझेंची महत्त्वपूर्ण भूमिका होती. अर्णब गोस्वामींच्या कथित TRP घोटाळ्याचा तपास सचिन वाझे करत होते. या प्रकरणात बार्कचे माजी प्रमुख पार्थो दासगुप्ता यांना अटक करण्यात आली होती.
त्याचसोबत, अभिनेता हृतिक रोशन आणि कंगना रनौत यांच्या ई-मेल प्रकरणाची चौकशी वाझेंचं युनिट करत होतं.
 
राजकीय विश्लेषक सांगतात, अर्णब प्रकरणी वाझेंचा वापर ठाकरे सरकारने विरोधकांना कोंडीत पकडण्यासाठी केला होता.