रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: सोमवार, 6 एप्रिल 2020 (15:38 IST)

कोरोना व्हायरस: लॉकडाऊन 2005 साली झालं असतं तर...?

रोरी सिलॅन जोन्स
अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या आजच्या युगात कोरोना व्हायरससारखं संकट आपल्यापुढे उभं राहील, याची कल्पनादेखील कुणी केली नव्हती. कोरोनामुळे आज अनेक देशात लॉकडाऊन आहे, लोक आपापल्या घरांमध्येच कैद झाले आहेत.
 
मात्र या जागतिक आरोग्य संकटकाळात तंत्रज्ञान वरदान ठरतंय. लोकांकडे स्मार्टफोन्स आहेत, इंटरनेट आहे, नवनवीन स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म आहेत, ज्यामुळे वेळ काढला जातोय.
 
मात्र हीच परिस्थिती 2005 मध्ये ओढवली असती तर…?
 
इतिहासात डोकावलं तर अशी भीषण परिस्थिती अख्ख्या जगावर गेल्या शतकातच आली होती, म्हणजेच दुसऱ्या महायुद्धावेळी. मात्र तेव्हापासून अनेक मोठ्या घटना देशादेशांमध्ये घडल्या... बर्लिनची भिंत कोसळली, अमेरिकेवरचा 9/11चा हल्ला, सोव्हिएत रशियामध्ये चर्नोबिलचा आण्विक अपघात, वगैरे.
 
याच काळात भारतालाही स्वातंत्र्य मिळालं. फाळणीनंतर झालेला रक्तपात, संसदेवरील दहशतवादी हल्ला आणि 2008 साली मुंबईवर झालेला दशतवादी हल्ला यात मोठी जीवितहानी झाली.
 
मात्र यातल्या कोणत्याही एका घटनेने आपल्या दैनंदिन आयुष्यावर एवढा मोठा परिणाम केलेला नाही, जेवढा कोरोना या जागतिक आरोग्य संकटाने केला आहे.
 
आज प्रत्येकजण घरात बंद आहे. ऑफिसचं काम करायचं तर घरात बसून, कुटुंबातील इतर सदस्यंना, आप्तेष्टांना, मित्रमंडळींना भेटायचं तर तेही ऑनलाईन. तुमचाही असाच शेवटचा कॉल नुकताच आटोपला असेल, नाही का?
 
मग प्रश्न पडतो, हीच परिस्थिती 2005 मध्ये उद्भवली असती तर…?
 
ना फेसबुक होतं, ना ट्विटर
 
एकमेकांशी कनेक्टेड राहण्यासाठी जी काही चांगली-वाईट डिजिटल माध्यमं आपण वापरतो ती तेव्हा एकतर अस्तित्वातच नव्हती किंवा जी होती तीसुद्धा फारच कमी जणांना उपलब्ध होती.
 
अमेरिकेत फेसबुकचा जन्म होऊन जेमतेम वर्ष झालं होतं. मात्र फेसबुक ब्रिटनमध्ये पोहोचण्यासाठीसुद्धा सप्टेंबर 2006चा हिवाळा उजाडावा लागला होता. भारतातही जवळपास त्याच सुमारास फेसबुकची एन्ट्री झाली. तेव्हा मात्र आपल्याकडे ऑरकुटची रेलचेल होती.
 
मग तर इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअॅपचा विचारही केलेला नव्हता. आणि सोशल मीडिया हा शब्दही तेव्हा कुणाला माहिती नव्हता.
 
त्या काळी ब्रिटनमध्ये Friends Reunited ही एक वेबसाईट लोकप्रिय होती. या वेबसाईटच्या माध्यमातून अनेकजण जुन्या मित्रांना शोधून त्यांच्याशी ऑनलाईन कनेक्टेड होती.
 
त्याचवर्षी यूट्युबचा जन्म झाला. पुढच्या वर्षी ट्विटर नावाचं लुडबुड करणारं बाळ जन्माला आलं. अगदी अॅपलचा आयफोनही तेव्हा नव्हता, तोच लॉन्च झाला 2007 साली.
 
010 साली भारतात ब्रॉडबँड वापराला वेग
 
आज छोट्याशा स्मार्टफोनच्या माध्यमातून आपण घरबसल्या जगाशी संपर्क साधू शकतो. मात्र पंधरा वर्षांपूर्वी हा स्मार्टफोन आजच्या इतका ‘स्मार्ट’ नव्हता. तो प्रत्येकाच्या हातातही नव्हता.
 
ब्रिटनमधल्या 80 लाख घरांमध्ये ब्रॉडबँड कनेक्शन होतं. या ब्रॉडबँड कनेक्शनचं स्पीड होता 10 मेगाबाईट्स पर सेकंड (Mbps). म्हणजे एक अल्बम डाऊनलोड करण्यासाठी जवळपास दीड मिनीट लागायचा.
 
भारत तर त्याहून मागे होता. भारत सरकारने 2004 मध्ये ब्रॉडबँड धोरण आखलं. त्यावेळी भारतात ब्रॉडबँडची स्पीड होती 256 Kbps. या स्पीडने एक अॅल्बम डाऊनलोड करण्यासाठी जवळपास 15 मिनिटांचा वेळ लागायचा.
भारतात 2005 नंतर ब्रॉडबँड क्षेत्राचा विस्तार झाला असला तरी वायरलाईन असल्याने त्यात अनेक अडचणी होत्या आणि हे सगळं प्रकरण सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरचं होतं. भारतात ब्रॉडबँडच्या वापराने वेग धरला तो 2010 नंतर, म्हणजेच आज आपल्याला ज्या गोष्टी महत्त्वाच्या वाटतात त्यावेळी त्याची जेमतेम सुरुवात झालेली होती.
 
तेव्हा ‘वर्क फ्रॉम होम’ शक्य झालं असतं?
 
स्काईप 2003 साली लॉन्च झालं. मात्र त्याचा वापर इंटरनेटच्या माध्यमातून फोन करण्यासाठी आणि कॉन्फरन्स कॉल करण्यासाठी व्हायचा. व्हीडिओ कॉलिंगची सोय फार नंतर म्हणजे 2006 साली सुरू झाली.
 
शिवाय, व्हीडिओ कॉल करण्यासाठी महागडी उपकरणं लागायची. आज व्हॉट्सअॅप आणि फेसटाईमच्या माध्यमातून आपण जेवढ्या सहजपणे एकमेकांना व्हीडिओ कॉल करू शकतो, तशी परिस्थिती तेव्हा नव्हती.
 
आज कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी अनेक देशांनी लॉकडाऊन लागू केलेला असताना ही ब्रॉडबँड सेवा एखाद्या दूतासारखी आपल्या मदतीला हजर आहे. अनेकांची ऑफिसची कामं घरी बसून होऊ शकतात, ती याच ब्रॉडबँडच्या भरवशावर.
 
अशा प्रकारे घरी बसून किंवा प्रत्यक्ष ऑफिसमध्ये न जाता तुम्हाला सोयीच्या असलेल्या ठिकाणावरून ऑफिसचं काम करणं याला टेलिवर्किंग फिनॉमिनन म्हणतात. अशा या टेलिवर्किंगचं स्वप्न गेली दोन दशकं बघितलं जातंय. आज प्रत्येकाकडे असलेली डिजिटल उपकरणं आणि कनेक्टिव्ही यामुळे, हे स्वप्न अखेर प्रत्यक्षात उतरलं आहे.
 
आज घरबसल्या परदेशात असलेल्या आपल्या बॉसशी आपण बोलू शकतो, ऑफिसची मिटिंग घरून अटेंड करू शकतो.
 
घरबसल्या सगळी कामं झाली असती?
 
लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्थेचं मोठं नुकसान होतंय. मात्र आज जी संपर्क क्रांती झाली आहे ती नसती तर काय झालं असतं, याचा विचार केलेलाच बरा.
 
आज घरी बसल्या आपण ऑनलाईन शॉपिंग किती सहजरीत्या करतो. 2005 मध्ये तर आपण हे स्वप्नातही बघितलेलं नव्हतं.
 
क्लाउड कॉम्प्युटिंगमुळे आज ऑनलाईन बिझनेस करणं सुलभ झालं आहे. लॉकडाउनच्या काळात तर किराणा सामान, भाजी आणि दूधसुद्धा लोक घरीच मागवणं पसंत करत आहेत.
 
लॉकडाउनमुळे लाखो मुलंही घरी आहेत. शाळा बंद असल्या तरी शिक्षण बंद नाही. अनेक शाळांनी ऑनलाईन क्लासेस सुरू केले आहेत.
 
2005 सालीसुद्धा शैक्षणिक क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून घेण्यावर चिंतन सुरू होतं. मात्र तेव्हा भर होतो तो शाळेतील आयटी व्यवस्था सुधारण्यावर. रिमोट लर्निंग म्हणजे घरबसल्या शिक्षण घेता येईल, याची कल्पनाही तेव्हा कुणी केलेली नव्हती.
 
आरोग्य क्षेत्रात तंत्रज्ञानाचा हवा तसा वापर होत नाही, असं आपण म्हणतो. मात्र कोरोना विषाणूची लक्षणं दिसायला लागल्यावर आज एका फोनकॉलवर तज्ज्ञांचा सल्ला मिळतो, हवी ती वैद्यकीय मदत मिळू शकते, तशी ती त्या काळी शक्य होती का? या सर्व वैद्यकीय सुविधांसाठी आज कॉल सेंटरसारखी एक संपूर्ण यंत्रणा उभारण्यात आलेली आहे.
 
आता मनोरंजनासाठी अनेक माध्यमं
 
मनोरंजनाचा विचार केला तर फ्लॅट-स्क्रीन आलेत. स्टँडर्ड डेफिनेशन जाऊन हाय डेफिनेशन टेक्नॉलॉजी आली. आता तर त्याहीपुढे जात 4K तंत्रज्ञानामुळे उत्तम पिक्चर क्वालिटी मिळते.
 
आपला टिव्हीसुद्धा इंटरनेटशी जोडला गेला. टीव्हीवर नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राईम, हॉटस्टार यासारख्या अनेक स्ट्रीमिंग सर्व्हिसेस मिळू लागल्या. इतकंच नाही तर लहान मुलांसाठीसुद्धा त्यांच्या मनोरंजनापासून ते अभ्यासापर्यंत अनेक गोष्टींसाठी वेगवेगळी अॅप्स थेट टीव्हीशी जोडून बघता येतात.
 
मात्र 2005 साली हे शक्य होतं का? त्यावेळी फार फार तर एखाद्याच्या घरी व्हीसीआर असायचा आणि एक कॅसेट टाकून शेजारी-पाजाऱ्यांसह सगळे मिळून एखादा सिनेमा बघायचे.
 
लॉकडाउन सुरू झाल्यापासून गेल्या काही आठवड्यात लंडनमध्ये ’Nextdoor’ सारखे अॅप्सही लोकप्रिय झाले आहेत. शेजारी आणि स्थानिक समुदायासाठी असलेलं हे अॅप कोरोनाच्या काळात लोकांसाठी उपयोगी ठरतंय.
 
कुणाला कुठल्याही प्रकारची अडचण असेल, मदतीची गरज असेल तर या अॅपवर ते टाकायचं आणि तुमचे शेजारी किंवा स्थानिक लोकांकडून त्यावर उत्तर मिळतं. सामाजिक सद्भावना जोपासण्यास आणि ती अधिक बळकट करण्यातही एका अर्थाने आधुनिक तंत्रज्ञानाचा हातभार लागतोय.
 
सोशल मीडिया आणि स्मार्टफोनने आयुष्य कसं बदललं आहे, यावर गेली काही वर्ष चिंता व्यक्त होत होती. ऑनलाईन मित्र खरे मित्र नसतात, समोरा-समोर बोलण्यासारखं संवादाचं दुसरं उत्तम साधन नाही आणि दिवसभर स्क्रीनला खिळून बसणं आरोग्याला घातक आहे, असंच सांगितलं जात होतं.
 
मात्र, कोरोना व्हायरससारख्या महाभयंकर संकटकाळात स्मार्टफोन आणि सोशल मीडियाचा योग्य पद्धतीने वापर केला तर हेच तंत्रज्ञान केवळ उपयुक्तच नाही तर आयुष्य वाचवणारंही ठरू शकतं, यात शंका नाही.