बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: सोमवार, 6 एप्रिल 2020 (15:34 IST)

कोरोना व्हायरस : 'सरकार आमच्या जिवाची किंमत फक्त 30 रुपये करतंय'

श्रीकांत बंगाळे
"सरकारनं आम्हाला कोरोनाच्या कामासाठी 1 हजार रुपये महिना द्यायचं ठरवलंय. म्हणजे दिवसाला 30 रुपये. दररोज जीवावर उदार होऊन काम करण्याचे आम्हाला 30 रुपये मिळणार आहेत. सरकार आमच्या जिवाची किंमत फक्त 30 रुपये करतंय."
 
कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी जसे देशभरातील डॉक्टर सज्ज झाले आहेत, त्याचप्रकारे आशा वर्कर्सही पदर खोचून कामाला लागल्या आहेत. शहर असो की गाव, घरोघरी जाऊन प्रत्येक कुटुंबातील सदस्याच्या आरोग्याची माहिती गोळा करण्याचं काम आशा वर्कर करत आहेत.
 
हे करत असतानाच कर्नाटकमध्ये एका आशा वर्करवर हल्ला झाला, तर महाराष्ट्रातल्या एका आशा वर्करच्या हातावरील होम क्वारंटाईनचा शिक्का पाहून त्यांना गावाबाहेर थांबावं लागल्याचा प्रकार समोर आला.
 
त्यामुळे या आशा वर्कर्स कोरोनाच्या काळात कोणत्या परिस्थितीत काम करत आहेत, हे जाणून घ्यायचा प्रयत्न बीबीसी मराठीनं केला आहे.
 
'जीवाची किंमत फक्त 30 रुपये'
ग्रामीण तसंच शहरी भागातल्या आशा वर्कर्सला दरदिवशी 25 घरांचा सर्व्हे करण्यास सरकारनं अनिवार्य केलं आहे.
 
मुंबई-पुण्याहून कुणी गावात आलं आहे का, त्यांना कोरोनाची काही लक्षणं दिसत आहेत का, कुटुंबातील सदस्यांपैकी कुणाला ताप, सर्दी, खोकला आहे का... या अशा प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी राज्यातील जवळपास 70 हजार आशा वर्कर्स दररोज घरोघरी फिरत आहेत.
 
यापैकी एक आहेत अलका नलावडे. अलकाताई पुणे जिल्ह्यातल्या पवारवाडीत 10 वर्षांपासून आशा सेविका म्हणून काम करत आहेत.
 
कोरोनासंबंधीच्या अनुभवाविषयी विचारल्यावर त्यांनी बीबीसीला सांगितलं, "कोरोनाचं काम करण्यासाठी सरकार आम्हाला 1 हजार रुपये महिन्याला देणार आहे. म्हणजे दिवसाला फक्त 30 रुपये. आम्ही दररोज आमचा जीव धोक्यात घालून काम करतोय. असं असतानाही सरकार आमच्या जीवाची किंमत फक्त 30 रुपये करतंय. त्याऐवजी शेतात मजुरीला गेलो तरी दिवसाला 300 रुपये मिळतात. त्याशिवाय 8 दिवसांचा भाजीपाला आणि 2 शेळ्याही सांभाळता येतात. सरकार देत असलेल्या या 30 रुपयात घरखर्च कसा चालवायचा तुम्हीच सांगा?"
 
अलकाताई या परित्यक्ता आहेत. त्या आणि त्यांची मुलगी असा दोघींचा त्यांचा परिवार आहे. कोरोनाची लागण झाल्यास, आमच्याकडे कोण पाहणार, 30 रुपयात मी बरी होईल का, असे त्यांचे प्रश्न आहेत.
 
"कोरोनाचं काम करण्याऱ्यांना सरकारनं 50 लाखांचा आरोग्य विमा जाहीर केलाय. पण, आशा वर्कर मेल्यावर काय करणार ती त्या 50 लाखांचं. जिवंत आहे तोवर पुरेसं मानधन द्यायला सरकार तयार नाही. मेल्यावर काय आशा वर्कर मागे वळून पाहणार आहे का, 25 लाखांचा दिला की 50 लाखांचा दिला विमा?," अलकाताई त्यांचं म्हणणं मांडत राहतात.
 
दरम्यान, राज्य सरकारनं एप्रिल, मे आणि जून या कालावधीत कोरोना व्हायरससंबंधीच्या कामासाठी आशा वर्कर्सला महिना 1 हजार रुपये प्रमाणे एकूण 3 हजार रुपये द्यायचं जाहीर केलं आहे. तसा शासन निर्णयही काढण्यात आला आहे. राज्य सरकार देत असलेल्या या मोबदल्याबाबत आशा वर्कर्सना आक्षेप आहे.
 
तुच्छ वागणूक
गावात माहिती गोळा करताना अलकाताईंना वाईट अनुभवाला सामोरं जावं लागलं.
 
"तू गावभर फिरती, तुझ्यामुळे आम्हाला कोरोना होईल, तुझ्यामुळे इथली माहिती बाहेर जाते, तू आमच्या घरी येऊ नको, असं काही जण म्हणतात. तेव्हा खूप वाईट वाटतं. मला पण जीव आहे, मला पण मरणाची भीती वाटते. आम्ही कुणासाठी काम करतोय तर जनतेसाठी. पण हीच जनता आम्हाला अशी वागणूक देत असेल, तर काय करायचं?," अलकाताईंच्या आवाजातील दाहकता स्पष्टपणे जाणवते.
 
याही परिस्थितीत अलकाताई दररोज घरोघरी जाऊन माहिती गोळा करतात आणि त्यांच्या कामाचा अहवाल पायी 4 किलोमीटर अंतर गाठून 'वाल्हे प्राथमिक आरोग्य केंद्रा'त दाखल करतात.
 
एकच मास्क धुवून वापरायचा...
सरकारनं आशा वर्कर्सला सुरक्षेसाठी काहीच साधनं दिली नाहीत, असा आक्षेप अलकाताई आणि इतर आशा वर्कर्सनी बीबीसीशी बोलताना व्यक्त केला.
 
छाया गायकवाड यवतमाळ जिल्ह्यातील दूधगावमध्ये आशा वर्कर म्हणून काम करतात.
 
सरकारनं सुरक्षेसाठी काय दिलं, असं विचारल्यावर त्या सांगतात, "गेल्या 12-13 दिवसांपासून आम्ही कोरोनाचा सर्व्हे करत आहोत. त्यासाठी आम्हाला एक सुती मास्क दिलाय. सध्या आम्ही तोच मास्क वापरतोय. सर्व्हे करून घरी आलो की आम्ही तो धुतो आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी वापरतो. याशिवाय 10 मिलीची एक स्पिरिटची बाटली दिलीय. त्यात थोडंथोडं पाणी टाकून आम्ही ती हात निर्जंतुक करण्यासाठी वापरतो."
 
जालना जिल्ह्यातल्या पाचणवडगावमधील आशा वर्कर करूणा शिंदे स्वत:चाच स्कार्फ वापरून कोरोनाचा सर्व्हे करत आहेत. सरकारनं सुरक्षेसाठी काहीच दिलं नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे.
 
घरच्यांचा काळजीपोटी विरोध
कोरोनाचा सर्व्हे करायला जात असल्यामुळे या आशा वर्कर्सना घरच्यांनाही तोंड द्यावं लागत आहे.
 
यापैकी एक आहेत यवतमाळमधील अंजना वानखेडे.
 
त्या सांगतात, "आम्ही कोरोनाचा सर्व्हे करायला जातो. त्यामुळे घरच्यांना भीती वाटते. तुला कोरोना झाला तर घरच्यांना होईल, गावाला होईल, अशी काळजी घरच्यांना वाटते. तुला पगार नाही आणि काही नाही, नुसती चालली जीवावर उदार होऊन सर्व्हे करायला, असंही घरचे म्हणतात."
 
निदान सरकारनं आम्हाला कोरोनाची सुरक्षा कीट द्यायला हवी, अशी अपेक्षा त्या व्यक्त करतात.
 
तर जालन्यातील करुणाताई सांगतात, "कोरोनाच्या भीतीमुळे सर्व्हे करायला जाऊ नको, असा माझ्या पतीचा आग्रह आहे. बाकीच्यांना (तलाठी, आरोग्य सेवक, नर्स, डॉक्टर) पगार मिळतो, तर त्यांनाच करू दे, असंही ते म्हणतात."
 
'आमचा उल्लेख कुठेच नाही'
पंतप्रधान असो की मुख्यमंत्री सगळे जण डॉक्टर आणि पोलिसांच्या योगदानाविषयी बोलत आहेत. पण, आशावर्कर्सच्या कामाबद्दल कुणीच काही बोलत नसल्याची खंत आशा वर्कर्सच्या मनात आहे.
 
अंजनाताई म्हणतात, "कोरोनाविषयीचं खरं काम गावपातळीवर आशा वर्कर करत आहेत. पण, आमच्या कामाचा उल्लेख करायला कुणी तयार नाही. पंतप्रधानांपासून मुख्यमंत्र्यांपर्यंत सगळे जण डॉक्टर आणि पोलिसांच्याच कामाचं कौतुक करत आहेत.
 
"खरं तर सरकार दररोज जी आकडेवारी देतं, तो डेटा कुठून येतो. आम्हीच त्यासाठी घरोघरी हिंडतो आणि सरकारला आकडेवारी पुरवतो. त्या आकडेवारीवर सरकार बोलतंय, पण, ती पुरवणाऱ्या आशा वर्करचं मात्र नाव घेत नाही."
 
सरकार काय म्हणतं?
आशा वर्कर्सची स्थिती जाणून घेतल्यानंतर आम्ही आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र यड्रावकर यांच्याशी संपर्क साधला.
 
आशा वर्कर्स सुरक्षेच्या साधनांविना काम करत आहेत, यावर ते म्हणाले, "मागील दीड महिन्यांपासून आशा वर्कर अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करत आहेत. जिथं जिथं सुरक्षेच्या साधनांची कमतरता आहे, तिथं तिथं स्थानिक प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. आशा वर्कर जीव धोक्यात घालून तुटपुंज्या पगारावर काम करत आहेत. त्यामुळे त्यांच्या जीवाला संरक्षण मिळालं पाहिजे, त्यांना आधार देण्याची जबाबदारी सरकारची आहे."
 
आशा वर्करच्या कामाला काही ठिकाणी विरोध होत असल्याच्या प्रकरणांविषयी ते म्हणाले, "राज्यात एक-दोन ठिकाणी अशी प्रकरणं घडली आहेत. आशा वर्कर प्रत्यक्षात फिलड्वर काम करत आहेत. पुढचा माणूस कोरोना पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह हे माहिती नसताना प्रत्येक घरात जाऊन माहिती संकलित करत आहेत. त्या महत्त्वाची जबाबदारी पार पाडत आहे. त्यांना विरोध न करता सहकार्य केलं पाहिजे."
 
कोरोनाच्या कामाबाबत मिळणाऱ्या मानधनाविषयी आशा वर्कर्स तक्रार करत आहेत, यावर यड्रावकर म्हणाले, "सध्याच्या परिस्थितीत कोरोनाचा विषय आपल्याला महत्त्वाचा आहे. या परिस्थितीत ज्या-ज्या लोकांनी जीव ओतून काम केलंय, त्यांना निश्चितपणे न्याय मिळणार. त्यासाठी मी प्रयत्न करणार."