मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: सोमवार, 6 एप्रिल 2020 (15:30 IST)

कोरोना व्हायरस : 'निझामुद्दीनला मी गेलो होतो, ही खबर गुजरात पोलिसांना कशी मिळाली?'

मेहुल मकवाना
माझं निझामुद्दीन इथं झालेल्या तबलीगी जमातच्या कार्यक्रमाशी काही कनेक्शन आहे का? हे पोलिसांनी कसं शोधून काढलं?
 
31 मार्चला संध्याकाळी 7 वाजता बीबीसीच्या कार्यालयात काम करत होतो. कोरोना व्हायरसमुळे 21 दिवसांचं लॉकडाऊन सुरू आहे.
 
यादरम्यान, नवी दिल्लीच्या निझामुद्दीन परिसरातील एका मर्कजमध्ये मोठ्या संख्येने कोव्हिड-19 चे पॉझिटीव्ह रुग्ण आढळून येत असल्याच्या बातम्या येऊ लागल्या.
 
खरंतर मी ऑफिसमध्ये ऑफिसच्याच फोनचा वापर करतो. माझा वैयक्तिक मोबाईल पूर्णवेळ बंद असतो.
 
पण त्यादिवशी मी माझा फोन सुरू केला. फोन चालू करताच काही मिनिटांनी माझा फोन वाजू लागला.
 
मी फोन उचलला, पलीकडून आवाज आला, "हॅलो, मेहुलभाई बोलत आहात का? मी अहमदाबाद क्राईम ब्रँचमधून पोलीस इन्स्पेक्टर डी. बी. बराड बोलतोय. तुम्ही नुकतेच नवी दिल्लीच्या निझामुद्दीनला गेला होता. तुम्ही आता कसे आहात आणि कुठे आहात?"
 
हा कॉल मला कशासाठी आला होता, हे कळायला मला वेळ लागला नाही.
 
मी त्यांना सांगितलं, मी अहमदाबादचा आहे. सध्या दिल्लीत राहतोय आणि बीबीसीच्या गुजराती वेबसाईटसाठी काम करतो.
 
मी त्यांना पुढे सांगितलं, ज्या परिसरातून इतक्या लोकांना संसर्ग झाल्याच्या बातम्या येत आहेत, तो परिसर माझ्या येण्या-जाण्याच्या मार्गातच आहे. मी नेहमीच तिथं बिर्याणी पार्सल घेण्यासाठी थांबत असतो.
 
माझ्या उत्तरानं इन्स्पेक्टर बराड यांचं समाधान झालं. ही बातचीत याच ठिकाणी संपली.
 
त्यांच्याशी बोलताना मला आठवलं की मार्च महिन्याच्या सुरुवातीला कार्यालयातलं काम संपवून मी निझामुद्दीन दर्ग्याजवळच्या बाजारात थांबलो होतो.
 
त्या दिवशी मी मास्क घातला नव्हता आणि बिर्याणी घेऊन लगेच मी तिथून निघालो, हेसुद्धा माझ्या लक्षात आलं.
 
पण यात मोठा ट्विस्ट काय असेल तर माझा मोबाईल नंबर. बराड यांनी कॉल केलेला हा नंबर मी गेल्या दीड वर्षापासून जास्त वापरत नाही. फक्त ऑनलाईन व्यवहारांचा ओटीपी मिळवण्यापुरताच याचा वापर आहे.
 
संसर्गाचा केंद्रबिंदू निझामुद्दीन मर्कज आणि सतर्क गुजरात पोलीस
गुजरात पोलिसांचा फोन कॉल माझ्यासाठी एक सरप्राईज होतं. गुजरात पोलीस निझामुद्दीन मर्कजमध्ये पसरलेल्या कोरोना व्हायरसबाबत प्रचंड गंभीर असल्याचं पाहून मला बरं वाटलं.
 
पण मला आश्चर्य वाटलं. अखेर गुजरात क्राइम ब्रँचला माझा फोन निझामुद्दीन भागात असल्याची माहिती इतक्या लवकर कशी मिळाली?
 
2 एप्रिलपर्यंत निझामुद्दीन मर्कजमधून 2,361 जणांची ओळख पटवण्यात आली होती. यामध्ये 617 लोकांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याचा संशय आहे. त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.
 
तर बाकीच्या लोकांना वेगवेगळ्या ठिकाणी क्वारंटाइन करण्यात आलं आहे.
 
2 एप्रिलपर्यंत देशभरात कोरोनाची 2,000 प्रकरणं समोर आली होती. यापैकी 378 प्रकरणं निझामुद्दीन मर्कजशी संबंधित आहेत.
 
मर्कज 1 एप्रिलला रिकामं करण्यात आलं. तसंच 36 तासांचं सर्च ऑपरेशन करावं लागल्याचं दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी सांगितलं आहे.
 
केंद्र सरकारच्या आदेशानंतर निझामुद्दीन परिसर किंवा मर्कजला गेलेल्या प्रत्येक व्यक्तीचा शोध पोलीस घेत आहेत.
 
निझामुद्दीनला भेट दिलेल्या सुरतच्या 72 जणांची ओळख पटवण्यात आली आहे. यातल्या 42 जणांना क्वारंटाइन करण्यात आलं आहे. यातील काही लोक मर्कजला गेले नव्हते. काही जण व्यापारी आहेत. जसं मी एक पत्रकार आहे आणि मर्कजला गेलो नव्हतो.
 
गुजरात पोलिसांनी मला कसं शोधलं
 
मी बराड यांना कॉल केला. गुजरात पोलिसांना माझा नंबर कसा मिळाला, हे विचारलं.
 
त्यांनी सांगितलं, आम्ही परिसरातील मोबाईल टॉवरमार्फत इथल्या लोकांचे मोबाईल नंबर मिळवले. यापैकी सुमारे 230 नंबर अहमदाबादचे आहेत. हे सगळे नंबर 31 मार्च संध्याकाळी 5 पर्यंत ट्रेस करण्यात आले.
 
माझे सहकारी रॉक्सी गागाडेकर छारा यांनी अहमदाबादचे पोलीस आयुक्त आशीष भाटिया यांच्याशी संपर्क साधला.
 
आशीष भाटिया यांनी सांगितलं, निझामुद्दीन मर्कज प्रकरणानंतर दिल्ली पोलिसांनी त्यांना मदत केली. तसंच साइबर-क्राइम डिपार्टमेंटने अॅक्टिव नंबर्सची यादी तयार केली. याच्या आधारे लोकांची ओळख पटवण्यात आली.
 
ते सांगतात, दिल्लीत तबलीगी जमातमधील 27 जण गुजरातचे होते. दिल्लीतून परतण्यापूर्वी हे लोक उत्तर प्रदेश आणि इतर ठिकाणी गेले.
 
नंतर ते अहमदाबादला आले. खरं तर या सगळ्यांचा कोरोनाबाबतचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.
 
पोलिसांनंतर महापालिकेचा कॉल
 
गुजरात पोलिसांचा कॉल आल्यानंतर 1 एप्रिल संध्याकाळी 5 वाजता पुन्हा माझ्या नंबरवर कॉल आला. यावेळी कॉल अहमदाबाद महापालिकेचे डॉक्टर चिराग यांनी केला होता.
 
ते माझ्याशी बोलले. माझ्या कुटुंबीयांबाबत विचारलं. मी शेवटी अहमदाबाद कधी आलो होतो याबाबत विचारलं.
 
नंतर 2 एप्रिलला डॉक्टर हेमल यांचा फोन आला. त्यांनीही माझ्या तब्येतीची विचारपूस केली.
 
सर्व्हिलन्सचं महत्त्व
पोलिसांकडे माझ्या मोबाईलचं लोकेशन ट्रेस करण्याची इतकी क्षमता कशी आहे, याबाबत मला उत्सुकता निर्माण झाली. पोलीस नेहमीच असं करतात की विशेष प्रसंगी हे केलं जातं?
 
मी निवृत्त आयपीएस रमेश सावानी यांच्याशी याबाबत बातचीत केली.
 
रमेश सावानी यांनी मला सांगितलं, पोलिसांकडे कायदा आणि सुव्यवस्था, सार्वजनिक आरोग्य समस्या या परिस्थितीत मोबाईल सर्विलन्सचा अधिकार असतो.
 
पोलीस आयुक्त, इंटेलिजन्स ब्यूरो, क्राइम ब्रँच इत्यादी संस्थांकडे याचा आदेश देण्याचे अधिकार असतात.
 
टॉवरच्या मदतीने पोलीस लोकेशन ट्रेस करू शकतात. पोलीस टेलिकॉम कंपनीकडून कॉल डिटेल मागू शकतात.
 
रमेश सावानी यांच्या मते, प्रायमरी मोबाइल सर्व्हिलन्स सध्याच्या काळात खूप सोपं आहे. पोलिसांकडे महत्त्वाची माहिती लवकर पोहोचू शकते.
 
ज्येष्ठ पत्रकार प्रशांत दयाल सांगतात, मोबाइल सर्व्हिलन्ससाठी अधिकाऱ्यांच्या रँकनुसार अधिकार असतात.
 
महासंचालक रँकच्या अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार 15 दिवसांच्या सर्व्हिलन्सवर ठेवण्यात येऊ शकतं. एका महिन्याच्या सर्व्हिलन्सचे आदेश होम सेक्रेटरी देऊ शकतात.
 
प्रशांत दयाल यांच्या मते, लोकांना क्वारंटाइनमध्ये पाठवण्यासाठी सर्व्हिलन्सचा जितका उपयोग होत आहे, तेवढाच उपयोग गुन्हेगारांना पकडण्यासाठी होतो.
 
हेक्झागॉन आणि त्रिकोणाचं जग
प्रशांत दयाल सांगतात, ही माहिती प्रत्येक राज्याला देण्यात आलेली असू शकते. पोलिसांनी फक्त ट्रेसिंगसाठी याचा वापर केला असेल.
 
पोलीस हे कसं करतात, याचं उत्तर शोधण्यासाठी मी सायबर एक्सपर्ट आणि टेक डिफेन्सचे सीईओ सनी वाघेला यांच्याशी चर्चा केली.
 
वाघेला सांगतात, मोबाइल फ़ोनच्या जगात एक परिसर हेक्झागॉन म्हणजेच सहा भागात विभागलेला असतो.
 
एका हेक्झागॉनच्या केंद्रस्थानी एक मोबाइल टॉवर असतो.
 
हेक्झागॉन मध्ये सहा त्रिकोण बनतात. एखादा गुन्हा घडल्यास त्याचं ठिकाण सर्वप्रथम शोधलं जातं.
 
दिल्ली प्रकरणात टेलिकॉम सर्विस कंपनीकडून इथे उपस्थित मोबाईल नंबरची माहिती राज्य सरकारला देण्यात आली असेल. तुमचा नंबर या भागात असल्यामुळे तुमची चौकशी करण्यात आली.