शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: गुरूवार, 2 एप्रिल 2020 (19:02 IST)

कोरोना व्हायरस : कम्युनिटी ट्रान्सफरच्या तिसऱ्या टप्प्यात महाराष्ट्र गेलाय का?

कोरोना व्हायरस संक्रमणाच्या तिसऱ्या टप्प्यात महाराष्ट्र किंवा भारताने प्रवेश केलाय का, ताचण्या किती वेगानं होत आहेत, हे सर्व कधी अटोक्यात येईल याबाबत नॅशनल इंस्टिट्युट ऑफ वायरोलॉजीचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. बाबासाहेब तांदळे यांच्याशी मुक्त पत्रकार मयांक भागवत यांनी बीबीसी मराठीसाठी केलेली ही बातचित.
 
1. कम्युनिटी ट्रान्सफरच्या थर्ड फेजमध्ये भारत/महाराष्ट्र गेलाय का?
 
आरोग्य मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, भारतात कम्युनिटी ट्रान्समिशन सुरू झाल्याचा पुरावा नाही. परदेशी प्रवासाचा इतिहास, कोरोनाबाधित रुग्णांशी थेट संपर्क किंवा आरोग्य कर्मचाऱ्यांशी संबंध आला नसतानाही काही कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे याचा ठोस पुरावा अजूनही मिळालेला नाही.
 
मात्र, काही परिसरामध्ये थोड्या प्रमाणात कम्युनिटी ट्रान्समिशन झालं असण्याची शक्यता आहे. आरोग्य अधिकारी हे कम्युनिटी ट्रान्समिशन शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.
 
2. भारतात आलेला कोरोना व्हायरस अशक्त आहे, असे रिपोर्ट्स काही वृत्तपत्रांनी दिले होते. त्यात काही तथ्य आहे का?
 
असं झालं असल्याचा काही ठोस पुरावा मिळालेला नाही. याबाबत अजूनही संशोधन सुरू आहे.
 
3. आपल्याकडे पुरेसे टेस्टिंग किट्स नाहीयेत म्हणून टेस्टिंग होत नाहीये का?
 
नाही. भारतात मोठ्या संख्येने प्रयोगशाळांची साखळी आहे. ज्यामध्ये तपासणी केली जातेय. तपासणीसाठी उपलब्ध किट्स टेस्टींगसाठी खास रणनीतीप्रमाणे वापरले जात आहेत. केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वीच तपासणीसाठी आणखी काही प्रयोगशाळांना परवानगी दिली आहे.
 
4. भारतातील कोरोना व्हायरसच्या सद्य स्थिताबाबत तुमचं मत काय?
 
भारतात, कोरोनाबाधितांची संख्या वाढत असली तरी सद्यस्थिती पूर्णत: नियंत्रणात आहे. याचं कारण म्हणजे, भारतात कोविड-१९ चा संसर्ग रुग्णांच्या जवळच्यांना झाल्याचं पाहायला मिळतंय.
 
भारतात १५ लाख प्रवाशांना स्क्रीन करण्यात आलं आहे. सद्यस्थितीत रुग्णांची संख्या याच्या तुलनेत आहे. कोरोनामुक्त झालेल्या ४४ रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. अनेक कोरोनाबाधितांना सौम्य स्वरूपाची लक्षणं दिसून येत आहेत. भारतात प्रवाशांना स्क्रिन करण्यात आलं, होम क्वारंटाईन करण्यात आलं, रुग्णालयात किंवा घरी आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं. कोरोनाबाधिताच्या संपर्कात आलेल्यांना शोधून तपासणी करण्यात आली. लोकांपर्यंत सोशल डिस्टंसिंगचं महत्त्व आणि कोरोनाबाबतची माहिती पोहोचवण्यात आली. याचा परिणाम आपल्याला पाहायला मिळतोय.
 
5. समाजात कोरोना व्हायरस पसरू नये यासाठी सरकारने २१ दिवस भारतात लॉकडाऊन केलं आहे. पण ICMRचा संशोधन अहवाल सांगतो की 'कोरोनाची लक्षणं असलेल्या सर्वांना शोधून त्यांना आयसोलेट केलं तरी देखील, भारतात कोरोनाचा प्रसार फक्त काही दिवस पुढे ढकलणं शक्य होईल.' याबाबत तुमचं मत काय?
 
समाजात या आजाराला परसण्यापासून थांबवण्यासाठी लॉकडाऊन हा एकच पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहे. कोरोनाबाधित अनेक देशांमध्ये याचा फायदा झाल्याचं दिसून आलं आहे. कोरोनाचा संसर्ग हा प्रामुख्याने लक्षणं दिसून येत असलेल्या रुग्णांकडून होतो. त्यामुळे कोरोनाची लक्षणं दिसत असलेल्या रुग्णांना शोधून, त्यांना आयसोलेशनमध्ये ठेवणं, आजाराचा प्रसार रोखण्यासाठी एक महत्त्वाचं पाऊल आहे.
 
त्याचसोबत परदेशी प्रवास करून आलेल्या ज्या व्यक्तींमध्ये कोणतीही लक्षणं आढळून येत नाहीत, त्यांना होम क्वारंटाईन करणं महत्त्वाचं आहे. पण होम क्वारंटाईनलाही मर्यादा आणि आव्हानं आहेत. त्यामुळे काही प्रमाणात समाजात हा आजार पसरल्याची शक्यता नाकारता येत नाही. लॉकडाऊनमुळे गर्दी होणार नाही. मोठ्या संख्यने लोकं एकत्र येणार नाहीत. त्यामुळे आजाराचा प्रसार कमी होण्यास मदत होईल. यांसारख्या प्रयत्नांमुळे रुग्णांची संख्या खूप जास्त वाढणार नाही आणि याचा परिणाम मोठ्या प्रमाणावर जाणवणार नाही.
 
योग्य काळ गेल्यानंतर याचा किती परिणाम काय झाला, यावर अभ्यास करावा लागेल. लॉकडाऊन करण्याच्या आधी समाजात आजाराचा प्रसार झाला असण्याची शक्यता आहे. त्यामुळे काही रुग्ण आपल्याला आढळून येतील.
 
लॉकडाऊनचा फायदा सामूहिक संसर्ग पुढे ढकलण्यासाठी आणि याचा प्रभाव कमी करण्यासाठी निश्चित दिसून येईल. आजाराचा प्रसार पुढे ढकलला गेल्याने आरोग्य व्यवस्थेला मजबूत करण्यासाठी वेळ मिळेल. जेणेकरून रुग्णांची योग्य काळजी घेण्यासाठी आरोग्य व्यवस्था सुसज्ज होण्यास मदत मिळेल.
 
6. कोरिया आणि इटलीच्या तुलनेत भारतात खूप कमी प्रमाणात तपासणी केली जातेय. आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या डॉक्टरांच्या मते, भारतात तपासणीवर भर देण्यात येत नाहीये?
 
भारतात प्रवाशांचं स्क्रिनिंग, कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांचं होम क्वारंटाईन, त्यांचा शोध, आयसोलेशन, रुग्णांची योग्य काळजी यावर योग्य पद्धतीने भर दिला जात आहे. भारतात योग्य वेळी रुग्णांची ओळख, तपासणी करण्यात आली. ज्या व्यक्तींमध्ये लक्षण दिसून येत होती, त्यांचा प्रवासाचा इतिहास आणि संपर्क याची माहिती घेऊन वैद्यकीय चाचणी करण्यात आली.
 
जागतिक स्तरावर तपासणीबाबत सांगण्यात आलेल्या सर्व निकषांचं, सूचनांचं पालन करून वैद्यकीय चाचणी करण्यात आली. परदेशातून भारतात आणण्यात आलेल्यांची १४ दिवसात दोन वेळा वैद्यकीय तपासणी करण्यात आली. ज्या प्रवाशांना लक्षणं नव्हती, त्यांना घरी सोडण्याआधी त्यांची पुन्हा तपासणी करण्यात आली. जेणेकरून त्याच्यामुळे कोणालाही इन्फेक्शन होणार नाही. इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्चने तपासणीसंख्या वाढवण्यासाठी खासगी लॅबला परवानगी दिली आहे. त्यामुळे, भारतात बदलत्या परिस्थितीप्रमाणे तपासणी करण्यात आली आहे.
 
7. कोरोना व्हायरस किती काळ जिवंत राहू शकतो? जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, तापमानाचा यावर परिणाम होत नाही.
 
हा व्हायरस ड्रॉपलेट्समध्ये (शिंक किंवा खोकल्यातून बाहेर पडणारे थेंब) ३-४ तास राहू शकतो ज्यामुळे संसर्ग होण्याची शक्यता असते. कार्डबोर्ड, लाकूड यांसारख्या वस्तूंवर हा व्हायरस २४ तास राहतो. स्टिलवर ३-५ दिवस तर काही प्लॅस्टिकच्या वस्तूंवर यापेक्षाही जास्तकाळ राहतो. त्यामुळे शिंक किंवा खोकल्यातून बाहेर पडणाऱ्या थेंबापासून खबरदारी घेणं सर्वांत महत्त्वाचं आहे. कारण, यामुळे जवळच्या व्यक्तींना संसर्ग होण्याची शक्यता जास्त असते.
 
रुग्णाच्या जवळच्या व्यक्तींना होणाऱ्या संसर्गात, शिंक किंवा खोकल्यातून बाहेर पडणारे थेंब, व्यक्तीच्या थेट चेहऱ्यावर जावू शकतात. नेहमी वापरात येणाऱ्या वस्तूच्या संपर्कात आल्यानेही आजार पसरू शकतो. उष्ण तापमानाचा आजाराचा संसर्ग कमी होण्यावर किंवा परिणाम कमी होण्याची शक्यता नाही.
 
8. मुंबई, पुण्यासाख्या शहरात मोठ्या प्रमाणावर लोक झोपडपट्टीत राहतात. शहरी आणि ग्रामीण भागात याचा प्रसार होवू नये, यासाठी काही ठोस रोड मॅप आहे?
 
कोरोनाचा संसर्ग रुग्णाच्या संपर्कात येणाऱ्या लोकांमध्ये जास्त असतो. त्यामुळे आजाराचा संसर्ग कमी करण्यासाठी शहरातील झोपडपट्या आणि ग्रामीण भागात सोशल डिस्टंसिंगचं महत्त्व फार जास्त आहे.
 
ग्रामीण भागात लोकांचा एकमेकांशी संपर्क जास्त नसतो. मात्र, शहरातील झोपडपट्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग होण्यापासून खबरदारी घेणं खरं आव्हानात्मक आहे. आरोग्य व्यवस्थेची तयारी आणि शहरी भागातील झोपडपट्यांमध्ये कोरोनाबाबतची जनजागृती हा प्रसार रोखण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं पाउल आहे.
 
9. भीतीपोटी लोक हायड्रो-क्लोरिक्विन गोळी घेतायत. खरंतर, ही गोळी प्रतिबंधात्मक म्हणून फक्त डॉक्टर आणि रुग्णाच्या जवळच्यांनी घेतली पाहिजे.
 
रुग्णांच्या सतत संपर्कात येणारे डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी ही गोळी प्रतिबंधात्मक म्हणून आहे. या औषधाचा फायदा होत असल्याचं दिसून आलं आहे.
 
10. कोरोनाच्या तपासणीसाठी किती किट्स मंजूर करण्यात आले आहेत? हे किट्स आजाराचं योग्य निदान करण्यासाठी उपयुक्त आहेत का?
 
इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्चने सरकारी आणि खासगी अनेक किट्सचा अभ्यास केलाय. अशा प्रकारचे नऊ किट्स आहेत. ज्या किट्समध्ये १०० टक्के True Positive आणि True Negative सॅम्पल्स आढळले त्यांचा विचार करण्यात आला. हे किट्स नक्कीच चांगले आहेत.