बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: सोमवार, 23 मार्च 2020 (14:07 IST)

कोरोना व्हायरस: हे संकट कधी शमणार?

जेम्स गॅलघर
आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याला ग्रासून टाकणारं कोरोनाचं संकट कधी दूर होणार?
 
सगळं जग ठप्प झालंय. काहीच दिवसांपूर्वी लोकांनी गजबजलेली आणि घड्याळ्याच्या काट्यावर जगणाऱ्या शहरात शुकशुकाट झाला आहे. जगण्यावरच निर्बंध आलेयत...शाळा बंद, प्रवासावर निर्बंध, जमावाने एकत्र येण्यावर बंदी...काही ठिकाणी तर सारंच 'लॉकडाऊन'
 
सगळ्या जगाने या आजाराला तोंड द्यायला ही पावलं उचलली आहेत.
 
पण हे सगळं संपणार कधी? आपलं आयुष्य पूर्वपदावर कधी येणार?
 
पुढच्या 12 आठवड्यांमध्ये या साथीचा संसर्ग रोखण्यात आपल्याला यश येईल असं युकेचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी म्हटलंय.
 
पण पुढच्या तीन महिन्यांमध्ये संसर्गाच्या प्रकरणांचं प्रमाण कमी व्हायला लागलं, तरी याला या साथीचा अंत म्हणता येणार नाही.
 
ही साथ पूर्णपणे जायला बराच वेळ लागणार आहे...कदाचित काही वर्षं.
 
कामकाज बंद करण्याची वा संपूर्ण शहर वा देशच लॉकडाऊन करण्याची सध्या अंमलात आणलेली पद्धत ही दीर्घकाळ अवलंबता येणार नाही, हे स्पष्टच आहे. यामुळे प्रचंड मोठं आर्थिक आणि सामाजिक नुकसान होईल.
 
म्हणूनच आता देशांनी 'एक्झिट स्ट्रॅटेजी' आखण्याची गरज आहे. म्हणजे निर्बंध उठवून आयुष्य पूर्वपदावर परत कशाप्रकारे आणण्यात येईल यासाठीचं धोरण आखायला हवं.
 
पण हा कोरोना व्हायरस इतक्यात जाणार नाही. विषाणूचं संक्रमण रोखून धरण्यासाठी घालण्यात आलेले निर्बंध उठवले तर संसर्गाचं प्रमाण वाढणं अटळ आहे.
 
"एक्झिट स्ट्रॅटेजी नेमकी कशी असावी आणि यातून बाहेर कसं पडायचं हे खूप मोठं कोडं आहे, फक्त युकेच नाही तर जगातल्या कोणत्याच देशाकडे एक्झिट स्ट्रॅटेजी नाही." एडिंबर्ग विद्यापीठातले 'संसर्गजन्य आजारां'विषयीच्या अभ्यासाचे प्राध्यापक मार्क वुलहाऊस सांगतात.
 
हे एक प्रचंड मोठं वैज्ञानिक आणि सामाजिक आव्हान असणार आहे.
 
या संकटातून बाहेर पडण्याचे तीन मार्ग असू शकतात.
 
- लसीकरण
 
- संसर्गामुळे लोकसंख्येतल्या काही जणांमध्ये या आजारासाठीची रोग प्रतिकारशक्ती निर्माण होईल.
 
- किंवा या साथीमुळे आपल्यात आणि समाजाच्या सवयींमध्ये कायमचा बदल होईल.
 
कोव्हिड -19वरची लस
 
विषाणूचा संसर्ग झाला तरी त्यामुळे आजारी न पडण्याची - रोगाचा प्रतिकार करण्याची क्षमता या लसीमुळे निर्माण होईल.
 
जर एकूण लोकसंख्येच्या पुरेशा प्रमाणात म्हणजे साधारण ६०% जणांना ही लस देता आली तर मग या विषाणूमुळे अशी प्रचंड मोठी साथ उद्भवणार नाही.
 
कोणत्याही लसीची चाचणी करण्यासाठी आधी ही लस प्राण्यांना देऊन पाहिली जाते. पण सध्या हा नियम बाजूला ठेवत अमेरिकेमध्ये प्रायोगिक लसीच्या चाचण्या माणसांवर सुरू करण्यात आलेल्या आहेत. याच आठवड्यात अमेरिकेमध्ये पहिल्या व्यक्तीला ही लस देऊन चाचणी करण्यात आलेली आहे.
 
अतिशय जलदगतीने आता या लसीविषयीचं संशोधन करण्यात येतंय, पण याला यश येईलच याची खात्री नाही शिवाय लस मिळाली तरी जागतिक पातळीवर ही लसीकरण मोहीम राबवली जाणं गरजेचं आहे.
 
सगळंकाही सुरळीत पार पडलं तरी लस यायला आणखी १२ ते १८ महिने लागण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय. कोरोना विषाणूचा हा संसर्ग जगभरामध्ये भयावह वेगाने पसरत असताना आणि सगळीकडे वावरावरच निर्बंध आलेले असताना हा कालावधी फार मोठा आहे.
 
"लसीची वाट पाहणं याला 'स्ट्रॅटेजी' म्हणता येणार नाही, ही स्ट्रॅटेजी नाही," प्राध्यापक वुलहाऊस यांनी बीबीसीला सांगितलं.
 
नैसर्गिक रोगप्रतिकार क्षमता
या बाबत काळानुसार टप्पे ठरवणं कठीण आहे. पण संक्रमणाच्या या लाटेमधलं संसर्गाचं प्रमाण कमी झालं तर निर्बंध उठवता येतील. आणि या प्रकरणांचं प्रमाण पुन्हा वाढलं तर मग पुन्हा निर्बंध लादता येतील. पण हे सगळं अनिश्चित आहे.
 
पण याचा दुसरा परिणाम म्हणजे अनेक लोकांमध्ये याचं संक्रमण झाल्याने कदाचित समाजामध्ये याविषयीची रोग-प्रतिकारक्षमता निर्माण होईल. याला 'हर्ड इम्युनिटी' (Herd Immunity) म्हणतात.
 
"आपण हे संक्रमण आता समाजातल्या एका गटापर्यंत वा देशाच्या भागापर्यंतच थांबवण्याचा प्रयत्न करतोय. समजा जर आपण हे दोन वा जास्त वर्षं करत राहिलो तर मग देशातल्या पुरेशा प्रमाणातल्या लोकसंख्येमध्ये हा संसर्ग होऊन गेलेला असेल आणि परिणामी यामुळे काही प्रमाणात रोग प्रतिकारशक्ती निर्माण होईल." पण ही रोग प्रतिकारशक्ती टिकेल का, याविषयी मात्र शंका आहेत.
 
इतर पर्याय
"तिसरा पर्याय म्हणजे आपल्या वागण्यामध्ये वा सवयींमध्ये काही कायमचे बदल घडतील ज्यामुळे संक्रमणाचं प्रमाण कमी होईल," प्राध्यापक वुलहाऊस म्हणतात.
 
याचाच अर्थ आता उचलण्यात आलेल्या पावलांपैकी काही निर्बंध कायम राहतील किंवा परत इतकी मोठी लाट येऊ नये म्हणून पेशंट्सच्या अधिक चाचण्या वा आयसोलेशनचा पर्याय अवलंबला जाईल.
 
कोव्हिड -१९ च्या आजारावर यशस्वी उपचार करणाऱ्या औषधांचा शोध लागला तर इतर पर्यायांना हातभार लागेल.
 
एखाद्या व्यक्तीमध्ये संक्रमणाची लक्षणं दिसू लागताच त्यांच्याकडून हा संसर्ग इतरांना होऊ नये म्हणून या व्यक्तींना ही औषधं देता येतील. यामुळे 'लॉकडाऊन'ची गरज कदाचित कमी होईल.