औरंगाबादच्या हर्सूल परिसरात 90 वर्षांच्या वृद्ध महिलेच्या मृत्यूनंतर मुलींनीच खांदा देत अंत्यसंस्काराचे सर्व विधी केल्याची घटना सोशल मीडियावर व्हायरल झाली. या घटनेची चर्चाही सुरू झाली.
चंद्रभागाबाई आनंदा साकळे यांचं 1 जानेवारी रोजी वृद्धापकाळानं निधन झालं. त्या 90 वर्षांच्या होत्या. सिल्लोड तालुक्यातील लिहाखेडी येथील या आजी औरंगाबादेत मुलगी सुभद्रा आणि जावई श्रीकृष्ण टाकसाळे यांच्याकडे राहत होत्या.
चंद्रभागाबाई यांना 3 मुलं आणि 3 मुली होत्या. मात्र, निधनानंतर त्यांच्या मुलींनीच त्यांना पाणी पाजलं, खांदा दिला आणि मुखाग्नीही मुलींनीच दिला. त्यामुळं याबाबत सगळीकडे चर्चा झाल्याची पाहायला मिळालं.
भाऊ आईचा सांभाळ करत नसल्यामुळं आम्ही आईला सांभाळलं. मात्र, त्यांनी अखेरच्या क्षणीही पुढाकार घेतला नाही. त्यामुळे आम्हीच ही जबाबदारीही पार पाडल्याचा दावा या आजींच्या मुलींनी केला आहे.
चंद्रभागाबाई यांच्या मुलाच्या कुटुंबीयांनी मात्र अशा प्रकारचे आरोप खरे नसल्याचं सांगत ते फेटाळून लावले आहेत. बीबीसीनं टाकसाळे यांच्या घरी भेट देत नेमकं काय घडलं हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
आठवणींनी अश्रू थांबेना!
औरंगाबादच्या हर्सूल परिसरातील बालाजी नगरमध्ये श्रीकृष्ण टाकसाळे यांचं घर आहे. याच घरामध्ये चंद्रभागाबाई त्यांची मुलगी सुभद्रा आणि जावई श्रीकृष्ण टाकसाळे यांच्याबरोबर राहत होत्या. इथंच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
सोमवारी आम्ही त्यांच्या घरी याबाबत जाणून घेण्यासाठी पोहोचलो, तेव्हा घरामध्ये चंद्रभागाबाई यांच्या मुली, जावई यांच्यासह काही नातेवाईक आणि भेटायला आलेली मंडळी होती.
सकाळीच रक्षाविसर्जनाचा विधी करून आल्यामुळं घरात काही नातेवाईकांची गर्दी होती. या घटनेनंतर अनेक माध्यमांनी बातम्या दिल्या. आम्ही पोहोचलो त्यावेळी सगळे त्या बातम्याच टीव्हीवर पाहत होते.
चंद्रभागाबाई यांच्या तिन्ही मुली सुभद्रा टाकसाळे, जिजाबाई टाकसाळे आणि सुनिता सोन्ने यांच्यासह उपस्थितांचे डोळे ते सर्व पाहताना पाणावलेले होते.
काही वेळात भावनांना आवर घालत मग नेमकं काय घडलं याबाबत मुली, जावई आणि इतर नातेवाईकांनी आम्हाला याबाबत माहिती द्यायला सुरुवात केली.
20 वर्षांपासून केला आईचा सांभाळ
चंद्रभागाबाई यांना तीन मुलं आणि तीन मुली. त्यांच्या तीन मुलांपैकी दोघं सरकारी नोकरीमध्ये तर एक मुलगा खासगी नोकरी करतो. तिन्ही मुलं औरंगाबादेतच राहतात, असं सुभद्रा यांनी सांगितलं.
मात्र, चंद्रभागाबाई या जवळपास गेल्या 20 वर्षांपासून मुलगी सुभद्रा आणि जावई श्रीकृष्ण टाकसाळे यांच्याबरोबर राहत होत्या. मुलांनी सांभाळण्यास टाळाटाळ केली, एकमेकांकडे बोटं दाखवली, असं सुभद्रा यांनी सांगितलं.
भाऊ आईची जबाबदारी घेत नसल्यामुळं सुभद्रा आणि श्रीकृष्ण टाकसाळे यांनी त्यांनी जबाबदारी घेत त्यांना सांभाळायला सुरुवात केली. या दरम्यानच्या काळात मुलं आईला काही दिवसांसाठी घेऊन जात होते, मात्र आई राहत नाही असं सांगत परत आणून सोडायचे असंही सुभद्रा यांनी सांगितलं.
प्रत्यक्षात चंद्रभागाबाई यांना आपण जावयाकडे राहत असल्याची लाज वाटायची, मुलांनी आपल्याला घेऊन जावं अशी त्यांची मनापासून इच्छा होती, असं जावई श्रीकृष्ण टाकसाळे यांनी सांगितलं.
नेमकं काय घडलं?
चंद्रभागाबाई यांचं 31 डिसेंबरच्या मध्यरात्रीनंतर म्हणजे 1 जानेवारी रोजी पहाटे 12.40 च्या सुमारास निधन झालं. त्यानंतर श्रीकृष्ण टाकसाळे यांनी सर्व नातेवाईकांना कळवलं. मात्र, मुलांनी जबाबदारीच घेतली नसल्यामुळे आम्ही त्यांना कळवलं नाही, असं त्यांनी सांगितलं.
असं असलं तरी इतर नातेवाईकांच्या माध्यमातून त्यांच्या मुलांपर्यंत घटनेबाबत माहिती कळवली. स्थानिक नेते विजय औताडे यांनी स्वत: फोन केले असं श्रीकृष्ण टाकसाळे यांनी सांगितलं.
रात्री चारच्या सुमारास मृत चंद्रभागाबाई यांची सर्वात लहान सून आणि नातू आले. त्याशिवाय कोणीही आलं नाही. सकाळी अंत्यविधी सुरू होण्यापूर्वी त्यांची दोन मुलंही आली. मात्र, मोठा मुलगा आला नव्हता असंही ते म्हणाले.
मात्र, आल्यानंतरही आम्हाला आईचा अंत्यविधी करू द्या किंवा आम्ही करतो अशी त्यांची तयारी न दिसल्यामुळं अखेर आम्ही मुलींनाच त्यांचे सर्व अत्यंविधी करू द्यायचे असा निर्णय घेतला, असं सुभद्रा यांच्या जाऊबाई छाया टाकसाळे यांनी सांगितलं.
मुलींनीच दिला खांदा, मुखाग्नी
नातेवाईकांसह परिसरातील नागरिकांनी याबाबत चर्चा करून निर्णय घेतला आणि सुभद्राबाई यांनीच त्यांचा सांभाळ केल्यामुळं त्यांच्या हातूनच आईला पाणी पाजून इतर विधी करण्याचा निर्णय घेतला.
मग, खांदेकरी कोण अशी चर्चा झाली तेव्हा खांदाही मुलीच देतील असं ठरलं. त्यानुसार जिजाबाई टाकसाळे आणि सुनिता सोन्ने यांनी त्यांना खांदा दिला.
त्यांच्याबरोबर सुभद्रा यांच्या जाऊबाई छाया टाकसाळे आणि नणंद मंगला अमृते याही खांदेकरी बनल्या आणि या चार महिलांच्या खांद्यावर चंद्रभागाबाई यांची अंत्ययात्रा सुरू झाली.
स्मशानामध्येही तिन्ही मुलींनी मिळून आईच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला. तसंच इतर विधीही मुलींनीच पूर्ण केले.
भावांनी जर म्हटलं असतं किंवा इच्छा व्यक्त केली असती तर, आम्ही त्यांना अंत्यविधी करू दिले असते. तो त्यांचाच अधिकार होता. मात्र त्यांची तशी इच्छाच दिसली नाही, असं सुभद्रा टाकसाळे यांनी सांगितलं.
मुलांना भेटण्याची इच्छा अपूर्ण!
चंद्रभागाबाई यांची मोठी मुलगी जिजाबाई टाकसाळे या सध्या साठीमध्ये आहेत. त्यांनीही यावेळी भावांनी आईकडे दुर्लक्ष केल्याचं सांगितलं.
"आम्ही गावाकडे राहतो, मात्र आमच्या बहिणीनं 20 वर्षांपासून आईचा सांभाळ केला. गेल्या दोन वर्षामध्ये कोरोनाच्या काळामध्ये भावांनी आईची चौकशीही केली नाही," असं जिजाबाई यांनी सांगितलं.
अखेरच्या दोन महिन्यांमध्ये तर चंद्रभागाबाई यांना मुलांना भेटण्याची तीव्र इच्छा होती. त्यासाठी अनेकदा भावांना संपर्क साधून आईला भेटायला येण्यास सांगितलं. पण त्यांनी प्रतिसादच दिला नाही, असं सुभद्रा यांनी म्हटलं.
महिला जर अशा पद्धतीनं सगळं काही आई वडिलांचं करत असतील तर पाणी पाजण्याचा हक्क मुलांनाच का मुलींना का नाही, असा विचार करत हा निर्णय घेतल्याचं, सुभद्रा यांच्या जाऊ छाया टाकसाळे म्हणाल्या.
मुलाचे कुटुंबीय म्हणतात, ऐनवेळी समजलं
या संपूर्ण प्रकरणामध्ये चंद्रभागाबाई यांच्या मुलांची नेमकी काय बाजू आहे हे जाणून घेण्यासाठीत्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला.
चंद्रभागाबाई यांचा नातू म्हणजे हनुमंता साकळे यांचा मुलगा विजेंद्र साकळे यांनी त्यांच्या वडिलांवर किंवा कुटुंबावर होणारे आरोप खरे नसल्याचं सांगितलं आहे.
"आजीच्या निधनाबाबत अगदी ऐनवेळी कळवण्यात आलं. त्यानंतर माझे वडील आणि आई पोहोचण्याआधीच सर्व-काही उरकलेलं होतं," असं विजेंद्र यांनी सांगितलं.
त्याचबरोबर दोन महिन्यांपासून कोणीही संपर्क केला नव्हता. शिवाय इतर काही कौटुंबीक आणि न्यायालयीन वाद असल्याचा उल्लेखही विजेंद्र यांनी यांनी केला. आमच्या विरोधात सांगितल्या जाणाऱ्या अशा या गोष्टी खोट्या असल्याचा दावा त्यांनी केला.
विजेंद्र यांनी याबाबत वडिलांची प्रतिक्रिया घ्या, त्यांचा नंबर पाठवतो असंहीसांगितलं. नंतर मात्र त्यांनी मॅसेज किंवा कॉलला प्रतिसाद दिला नाही, त्यामुळं चंद्रभागाबाई यांच्या मुलाशी संपर्क होऊ शकला नाही.