शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: शुक्रवार, 15 जानेवारी 2021 (12:59 IST)

धनंजय मुंडे प्रकरण : हिंदू पुरुष दोन वेळा लग्न करू शकतो का?

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर करण्यात आलेले बलात्काराचे आरोप आणि विवाहबाह्य संबंधांविषयी त्यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे दिलेलं स्पष्टीकरण याविषयी चर्चा सुरू आहे.
 
दोन पत्नी असल्यामुळे धनंजय मुंडे यांनी राजीनामा देण्याची मागणी भाजपच्या महिला मोर्चानं केली आहे. त्यासाठी रस्त्यावर उतरण्याचा इशारासुद्धा त्यांनी दिला आहे.
 
"धनंजय मुंडे यांनी स्वतः कबुल केलं आहे ही मला दोन पत्नी आहेत. 2 पत्नी हिंदू संस्कृतीत चालत नाहीत. त्यामुळे कायद्यानुसार त्यांनी त्यांच्या मंत्रिपदाचा ताबोडतोब राजिनामा द्यावा," असं भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष उमा खापरे म्हटलं आहे.
 
दुसरीकडे धनंजय मुंडे यांनी फेसबुक पोस्टमध्ये आपले विवाहबाह्य संबंध मान्य केले आहेत. पण दुसरं लग्न केलं आहे की नाही हे मात्र स्पष्ट केलेलं नाही.
 
पण भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष उमा खापरे यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवरून द्विभार्या प्रतिबंधक कायद्याचाही चर्चा सुरू झाली आहे. नेमका काय आहे हा कायदा?
 
धनंजय मुंडे यांच्यावर काय आरोप करण्यात आले आहेत?
धनंजय मुंडे यांचे आपल्या बहिणीशी प्रेमसंबंध होते, घरात कुणी नसताना त्यांनी आपल्यावर बळजबरी केली, आपल्यला खोटी आश्वासनं दिली असा आरोप पीडित महिलेने केलाय. यावर उत्तर देत धनंजय मुंडे यांनी एका फेसबुक पोस्टद्वारे आपली बाजू मांडली.
 
आपले एका महिलेशी परस्पर सहमतीने संबंध होते आणि आपल्या पत्नीला आणि कुटुंबियांना याविषयी माहिती असल्याचंही त्यांनी या पोस्टमध्ये म्हटलंय.
 
भाजपची निवडणूक आयोगात धाव
धनंजय मुंडे यांच्यावर करण्यात आलेले आरोप आणि त्यांनी दिलेलं स्पष्टीकरण यावरून अनेक प्रतिक्रिया उमटल्या. धनंजय मुंडे यांनी दोन मुलांची जबाबदारी घेतली असली, तरी प्रतिज्ञापत्रात त्यांचा उल्लेख नसल्याने धनंजय मुंडेंची आमदारकी अडचणीत येण्याची शक्यता आहे का? यावरूनही चर्चा सुरू झाली.
 
धनंजय मुंडे यांनी पत्नी, अपत्य आणि मालमत्तेविषयीची माहिती लपवली असल्याचं म्हणत भाजप नेते किरीट सोमय्या यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. धनंजय मुंडे यांची दुसरी पत्नी असल्याचा त्यांनी या तक्रारीत उल्लेख केलाय.
 
तर महाराष्ट्र करणी सेनेने धनंजय मुंडे यांची पाठराखण केली आहे. मुस्लिम व्यक्ती 4 विवाह करू शकतात तर हिंदू व्यक्तीने दुसरं लग्नं केलं तर काय चुकलं असा सवाल महाराष्ट्र करणी सेनेच्या अजय सिंह सेंगर यांनी केल्याचं वृत्त टीव्ही 9ने दिलंय.
 
"भारताच्या राज्यघटनेने सर्व धर्म समभाव तत्त्वं स्वीकारलं आहे. तेव्हा द्विभार्या प्रतिबंधक कायदा निरर्थक ठरला आहे. त्यामुळेच सर्व धर्मांना विवाह बंधनाचे वेगवेगळे कायदे असू शकत नाहीत, असले तरी ते निरर्थक ठरतात, फक्त हिंदू धर्मीयांनाच द्विभार्या प्रतिबंधक कायदा लागू होऊ शकत नाही. कारण राज्यघटना सर्व धर्म समभाव आहेत," असं अजय सिंह सेंगर म्हणाल्याचं या बातमीत म्हटलंय.
 
'विवाहबाह्य संबंध हा अपराध होऊ शकत नाही' असा ऐतिहासिक निर्णय सुप्रीम कोर्टाने 2018मध्ये दिला होता. पण द्विभार्या प्रतिबंधक कायदा नेमका काय आहे?
 
द्विभार्या प्रतिबंधक कायदा नेमका काय आहे?
बीबीसी मराठीशी बोलताना अॅड. दिलीप तौर यांनी सांगितलं, "द्विभार्या प्रतिबंधक कायदा म्हणजेच - Bombay prevention of hindu bigamous marriages act 1946. या कायद्यानुसार हिंदू विवाहित पुरुष, पहिल्या पत्नीला घटस्फोट न देता दुसरं लग्न करू शकत नाही. हा स्वतंत्र कायदा आहे आणि प्रत्येक राज्याने असा कायदा तयार केलेला आहे. शीख, ख्रिश्चन, पारशी आणि जैन धर्मासाठीही हेच तत्वं सांगणारे स्वतंत्र कायदे आहेत."
 
अॅडव्होकेट असीम सरोदे यांनी याविषयी एक फेसबुक पोस्ट लिहिली आहे. त्यात ते म्हणतात, "हिंदू या व्याख्येत बसणाऱ्या पुरुषाला दोन किंवा त्यापेक्षा जास्त लग्न करता करता येत नाही. द्विभार्या प्रतिबंधक कायदा 1946 नुसार एक लग्न झालेले असतांना दुसरे लग्न करणे बेकायदेशीर ठरतं. धनंजय मुंडे यांचं कायदेशीर लग्न झालं आणि त्यांची कायदेशीर पत्नी आहे. त्यांनी दुसरे लग्न केलेलं नाही. ते 2006 पासून एका स्त्री सोबत 'विवाहासारख्या' संबंधात राहतात पण ती त्यांची कायदेशीर बायको नाही. त्यामुळे द्विभार्या प्रतिबंधक कायदा लागूच होत नाही."
 
कायद्यातल्या पळवाटा
द्विभार्या कायद्याची तरतूद ही मुस्लिम विवाहांसाठी लागू होत नाही. म्हणूनच पहिली पत्नी असताना दुसरं लग्न करण्यासाठी धर्मांतर करण्याचा मार्ग अनेकांनी स्वीकारला आहे.
 
भारतीय फिल्मस्टार धर्मेंद्र यांनी अभिनेत्री हेमामालिनी यांच्याशी लग्न करता यावं यासाठी हा मार्ग स्वीकारल्याचं सांगितलं जातं. त्यांची पहिली पत्नी प्रकाश कौर यांनी घटस्फोट देण्यास नकार दिल्याने धर्मेंद्र यांनी इस्लाम स्वीकारत हेमामालिनी यांच्याशी लग्न केल्याचं माध्यमांत छापून आलेलं आहे.
 
पण आपल्या पहिल्या पत्नीला आपल्या दुसऱ्या पत्नीबद्दल काहीही आक्षेप नसल्याचं एखादा पुरूष सांगू शकतो का? यावर अॅड. असीम सरोदे म्हणतात, "एक बायको असतांना दुसऱ्या स्त्रीशी विवाहासारखे संबंध ठेवणे याविरोधत एक तर कायदेशीर पत्नी तक्रार करू शकते किंवा विवाहाशिवाय सहजीवनासरखे संबंध असलेली स्त्री तक्रार करू शकते."
 
पण असं असलं तरी पहिलं लग्न झालेल्या व्यक्तीने दुसरं लग्न केलं आणि त्याला पहिल्या पत्नीचा आक्षेप नसला, तरी त्या दुसऱ्या लग्नाला कायदेशीर मान्यता मिळत नाही.
 
भाजपच्या लोणीकरांवरही आरोप
"बबनराव लोणीकर यांना दोन बायका असताना निवडणूक आयोगाला सादर करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी केवळ एका बायकोच्या नावाचा उल्लेख केला आहे," असा आरोप काँग्रेसनं केला होता.
 
लोणीकरांच्या मतदारसंघातील मतदार यादीत त्यांच्यासह मंदाकिणी आणि वंदना या दोघींचं नाव आहे. या दोघीही लोणीकरांच्या पत्नी असल्याचे त्यात नमूद करण्यात आलं आहे. मात्र, उमेदवारी अर्ज भरताना दिलेल्या प्रतिज्ञापत्रात पत्नी म्हणून केवळ मंदाकिणी यांचे नाव लिहिल्याचे समोर आलं होतं.
 
काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी २००४, २००९ व २०१४ या तिन्ही निवडणुकांच्या वेळी लोणीकर यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रांची पाहणी केली. त्यातून लोणीकरांची लपवालपवी समोर आल्याचं त्यांनी म्हटलं होतं.
 
लोणीकर यांनी माहिती लपवून निवडणूक आयोगाची दिशाभूल केल्याचा आरोप तेव्हा सावंत यांनी केला होता.