'राजे गेले, सेनापती गेले आता आम्ही मावळे लढणार'- धनंजय मुंडे
"उदयनराजे यांनी भाजपात जाण्याचा निर्णय घेतला, याचं मला फार फार वाईट वाटलं. काल शरद पवार यांच्यासोबत उदयनराजेंची बैठक झाली. त्या बैठकीत महाराज महाराष्ट्राच्या आणि देशाच्या जनतेच्या प्रश्नांबाबत अत्यंत निराश होते. भाजपविषयी ते जे काही बोलत होते. त्यानंतर ते भाजपात जातील असं वाटलं नव्हतं," असं मत राष्ट्रवादीचे नेते धनजंय मुंडे यांनी व्यक्त केला आहे. लोकसत्तानं ही बातमी दिलीय.
साताऱ्याचे राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले आज (14 सप्टेंबर) दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.
ते पुढे म्हणाले, जीएसटी, मंदी, बेरोजगारी या सगळ्या विषयांवर चर्चा झाली. हे सरकार चांगलं काम करत नसल्याचंही त्यांनी म्हटलं होतं. मात्र संध्याकाळी काय घडलं ते माहित नाही. उदयनराजे भोसले यांनी भाजपात जाण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय त्यांनी का घेतला? ते माहीत नाही. रयतेची काळजी असलेले राजे गेले, सेनापती गेले आता आम्ही मावळे लढू."
दरम्यान, धनंजय मुंडे यांनी शिवसेनेत प्रवेश केलेल्या भास्कर जाधव यांच्यावरही टीका केली आहे.
"भास्कर जाधव 2013 मध्ये विचारत होते ठाकरेंचा व्यवसाय नाही, मग त्यांचं उत्पन्न इतकं कसं? आज भास्कर जाधव यांना उत्तर मिळालं असेल, अशी अपेक्षा आहे. तुम्हाला पवारसाहेबांनी पद दिलं, सगळं दिलं. लोकांचा विकास तुम्ही केला नाहीत ही तुमची चूक की पक्षाची?"