गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: मंगळवार, 25 ऑक्टोबर 2022 (18:16 IST)

शिक्षण : विद्यार्थ्यांनी कॉपी करू नये म्हणून शिक्षकांनी घातल्या 'टोप्या'

student caps
जेम्स फिट्सजेराल्ड
विद्यार्थी सहसा शिक्षकांना टोप्या घालण्यात पटाईत असतात. पण या फिलिपिन्सच्या शिक्षकांनीच त्यांच्या विद्यार्थ्यांना टोप्या घातल्या आहेत. त्याही एक से बढकर एक.
 
का म्हणाल, तर परिक्षेत पोरांनी कॉप्या करू नये म्हणून. या टोप्या सोशल मीडियावर चांगल्याच व्हायरल झाल्या आहेत.
 
लेगाझ्पी कॉलेजच्या विद्यार्थ्यांना परिक्षेत अशा टोप्या घालायला सांगितल्या होत्या जेणेकरून ते शेजाऱ्याच्या पेपरमध्ये काय लिहिलं आहे ते बघणार नाहीत.
 
विद्यार्थ्यांनी घरच्या घरीच चित्रविचत्र हॅट्स, टोप्या, हेल्मेट तयार करून परिक्षेत रंगत आणली.
 
कोणी कार्डबोर्डपासून टोप्या तयार केल्या तर कोणी अंडी पॅक केली जातात त्या बॉक्सेसपासून.
 
त्यांच्या शिक्षिकेनी बीबीसीशी बोलताना म्हटलं की, त्यांना विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणे पेपर लिहावा यासाठी काहीतरी नवीन आणि गंमतीशीर क्लृप्ती हवी होती.
 
मेरी जॉय मँडाने-ऑर्टिझ बिकोल युनिव्हर्सिटीतल्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या प्राध्यापिका आहेत.
 
या कॉलेजच्या सहामाही परिक्षेदरम्यान मुलांना डोळे उघडे राहतील, पण शेजारचं काही दिसणार नाही (घोड्याला झापड लावतात त्याप्रमाणे) अशा प्रकारच्या टोप्या घालून यायला सांगितल्या होत्या.
 
प्रा. मेरी म्हणतात की, आधी त्यांनी विद्यार्थ्यांना कागदापासून काहीतरी साधं डिझाईन करायला सांगितलं होतं. पण काही वर्षांपूर्वी थायलंडमध्ये झालेल्या परिक्षांमध्ये अशा प्रकारच्या टोप्या वापरल्या गेल्या होत्या, त्या पाहून त्यांनाही प्रेरणा मिळाली.
 
2013 साली बँकॉकमधल्या एका विद्यापीठातल्या मुलांचे फोटो व्हायरल झाले होते. या फोटोंमध्ये विद्यार्थी वर्गात बसले आहेत आणि त्यांचे कान, डोक्याच्या दोन्ही बाजू झाकल्या जातील अशा प्रकारच्या कागदी टोप्या घातल्या होत्या. या टोप्यांमुळे त्यांना बाजूचं काही दिसत नव्हतं.
 
प्रा. मेरी म्हणतात की, त्यांचे इंजिनिअरिंगचे विद्यार्थी तयारच होते. त्यांनी आयडिया लढवून 'टाकाऊपासून टिकाऊ' करत अशा टोप्या बनवल्या की बघणारा पाहातच बसेल.
 
काहींनी हॅट, हॅलोविन मास्क किंवा हेल्मेट घातले.
 
प्रा. मेरी यांनी या कलाबहाद्दर विद्यार्थ्यांचे फोटो काढले आणि एकेक करून आपल्या फेसबुकवर पोस्ट केले. याला हजारो लाईक्स मिळाले आणि फिलिपीनो माध्यमांमध्ये याला कव्हरेज मिळालं.
 
हे फोटो पाहून फिलिपिन्समधल्या इतर शाळा कॉलेजांनीही प्रेरणा घेतली असं म्हटलं जातंय. त्यांनीही आपल्या विद्यार्थांना कॉपी करता येऊ नये म्हणून तुम्हीच अशा टोप्या डिझाईन करा असं सांगितलं.
 
प्रा. मेरी म्हणतात की यावर्षी त्यांच्या विद्यार्थ्यांनी चांगला अभ्यास केला आणि मार्कही चांहले मिळवले. कडक शिस्तीच्या वातावरणात परीक्षा द्यावी लागेल हे कळल्यामुळे मुलांनीही चांगला अभ्यास केला होता.
 
कित्येकांनी पेपर वेळेआधीच सोडवले आणि कॉपी करताना कोणी पकडलं गेलं नाही असंही त्यांनी सांगितलं.