सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: मंगळवार, 11 मे 2021 (12:10 IST)

भाजपमध्ये सर्वांत जास्त छळ गोपीनाथ मुंडे यांचा झाला- एकनाथ खडसेंचा आरोप

'मागील काळात ओबीसी नेत्यांना भाजपनं नेहमीच सहकार्य केल्याचं पाहायला मिळत होतं. पण गेल्या काही वर्षांत भाजपमध्ये ओबीसी नेत्यांना टार्गेट केलं जात आहे, असा आरोप भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले नेते एकनाथ खडसे यांनी केला आहे.
 
भाजपमध्ये सर्वांत जास्त छळ गोपीनाथ मुंडे यांचा करण्यात आला, असा आरोपही खडसे यांनी केला आहे. गेल्या 4-5 वर्षांचा विचार केला तर भाजपचे काही नेते ओबीसी नेत्यांना टार्गेट करत असल्याचं पाहायला मिळत आहे, असं खडसे यांनी म्हटलं आहे.
 
जळगावमध्ये माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना त्यांनी हे वक्तव्यं केलं.
खडसे यांनी भाजप नेते गिरीश महाजन यांच्यावरही टीका केली. गिरीश महाजन यांचा सर्व इतिहास आपल्याला माहिती असून त्यांना राजकारणात मी आणलं, असंही खडसे यांनी म्हटलं आहे.
 
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अनेक आरोप करत खडसे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.