शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: शुक्रवार, 15 जानेवारी 2021 (17:46 IST)

धनंजय मुंडे OBC नेते, या वक्तव्यातून जयंत पाटील भाजपला काय सूचवत आहेत?

बलात्काराचे आरोप झालेले धनंजय मुंडे यांना पाठिंबा देताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जातीचा अंग पुढे आणलं आहे आणि त्यातून भाजपवर टीका केलीय.
 
एबीपी माझा वृत्तवाहिनीशी बोलताना जयंत पाटील म्हणाले, "धनंजय मुंडे हे ओबीसी समाजाचे नेते आहेत. भाजप ओबीसी समाजाच्या नेत्यांमागे उभी राहत नाही, मात्र राष्ट्रवादी काँग्रेस धनंजय मुंडे यांचा या प्रकरणात दोष नसेल तर पाठीमागे ताकदीनिशी उभा राहील."
 
11 जानेवारी 2021 रोजी पीडित महिलेने तक्रारीचं पत्र ट्वीट केलं आणि त्यातून धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप केले. धनंजय मुंडे यांनी फेसबुक पोस्ट लिहून विस्तृतपणे भूमिका मांडली आणि बलात्काराचे आरोप फेटाळले.
त्यानंतर भाजपकडून धनंजय मुंडे यांच्यावर टीका सुरू झाली. मुंडेंच्या राजीनाम्याची मागणीही भाजपकडून करण्यात येतेय.
 
मात्र, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपवर टीका करताना ओबीसीचा मुद्दा उपस्थित केला.
जयंत पाटील म्हणाले, "धनंजय मुंडे हे आमच्या पक्षातील ओबीसी समाजातील नेते आहेत. आमच्या पक्षात आणि भाजपमध्ये एक फरक आहे. आमच्या पक्षात कोणत्याही समाजाचा, जाती-धर्माचा नेता असला तरी सगळा पक्ष त्याच्या पाठीमागे उभा राहतो. त्याची चूक केली नसेल, तर पूर्ण ताकदीनिशी त्याचं समर्थन करतो."
 
"भाजपमध्ये खडसेंची अवस्था मधल्या काळात काय झाली, बावनकुळेंची काय अवस्था झाली? त्यांच्या मागे भाजप उभा राहिला नाही. ओबीसी समाजाचे हे नेते असताना भाजप त्यांच्या पाठीमागे उभा राहिला नाही. पण धनंजय मुंडे चूक असतील तर आम्ही त्यांची साथ नाही करणार, पण धनंजय मुंडे यांचा या प्रकरणात त्यांचा दोष नसेल तर भाजपसारखं करणार नाही, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ओबीसी नेत्यामागे ताकदीने उभे राहील, हाच विश्वास देतो," असं जयंत पाटील म्हणाले.
 
यावेळी जयंत पाटील यांनी या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली.
 
ते म्हणाले, "कार्यकर्ते, नेता घडण्यासाठी 30-40 वर्षं जातात आणि एखादी महिला अचानकपणे येते, सार्वनिजक जीवनातील कार्यकर्त्यांची दोन मिनिटात बदनामी होते. सर्व प्रसारमाध्यमं आणि लोकांपर्यंत एकच बाजू जाते. त्या व्यक्तीबद्दलचं मत तयार होतं. त्यामुळे 30-40 वर्षं कष्ट केलेले असतात, त्या सर्वांवर एका क्षणात पाणी पडतं. त्यामुळे नीट चौकशी झाली पाहिजे."
 
"धनंजय मुंडे यांनी या प्रकरणात सर्व माहिती पोलिसांना दिलीय. काहीही दडवून ठेवलेले नाही. आमची अपेक्षा अशी आहे की, पोलिसांनी आता लवकर तपास करावा," असंही जयंत पाटील म्हणाले.
 
'राष्ट्रवादी ओबीसी नेत्यांना बाजूला सारत नाही'
 
राष्ट्रवादी कॉँग्रेसचे वरिष्ठ नेते जयंत पाटील यांच्या वक्तव्याबाबत बोलताना वरिष्ठ राजकीय पत्रकार धमेंद्र जोरे म्हणतात, "मुंडे यांची ओबीसी चेहरा म्हणून ओळख आहे. मात्र राष्ट्रवादीची मराठा पार्टी म्हणून ओळख आहे ती धूसर करणे जरूर आहे. सद्यस्थितीत राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न मोठा ज्वलंत बनलाय. अशा परिस्थितीत ओबीसी समाज दूर गेला तर राजकीय दृष्ट्या चांगलं नाही. त्याचबरोबर राष्ट्रवादितील OBC नेते जे मुंडे ना प्रतिस्पर्धी मानत असतील त्यांनासुद्धा पक्षाची भूमिका लक्षात घेऊन चूप बसावे लागेल."पक्ष ओबीसी समाजाच्या पाठीशी उभा असल्याचं जयंत पाटील यांना दाखवून द्यायचं आहे आणि त्याच बरोबर भाजपालासुद्धा धारेवर धरायचे आहे, असंही जोरे पुढे म्हणतात.
 
तर वरिष्ठ राजकीय पत्रकार हेमंत देसाई म्हणतात, "भाजपमध्ये ओबीसी चेहरा असलेल्या पंकजा मुंडे एका कोपऱ्यात पडल्या आहेत. तसं राष्ट्रवादी ओबीसी नेत्यांबाबत करत नाही असं त्यांना भाजपला सुचवायचं आहे. राष्ट्रवादीवर मराठ्यांचा पक्ष असा आरोप नेहमी होतो. ओबीसी समाजाची राष्ट्रवादीकडून उपेक्षा होते असा समज ओबीसींमध्ये आहे. त्यामुळे ओबीसी नेत्यांवर कारवाई न करता, संरक्षण दिलं असं राष्ट्रवादी कॉँग्रेसला या माध्यमातून दाखवायचं आहे. पण, प्रश्न असा आहे की मुंडे ओबीसी नसते तर? राष्ट्रवादीने त्यांना संरक्षण दिलं असतं?"