शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: शुक्रवार, 15 जानेवारी 2021 (17:23 IST)

विकिपीडियाचा 20 वा वाढदिवस : तुम्हाला 'या' 5 रंजक गोष्टी माहितीयेत का?

'लेट्स सेट नॉलेज फ्री' म्हणत 15 जानेवारी 2001 रोजी अमेरिकेतील जिमी वेल्स आणि लॅरी सँगर या दोन उद्योजकांनी ऑनलाईन जगतात माहितीचा भांडार उघडलं.
 
'विकिपीडिया' असं तुम्हा-आम्हाला परिचित असणाऱ्या या भांडाराचं नाव.
 
सुरुवातीच्या काळात विकिपीडियावर बरीच टीका झाली. चुकीची माहिती पसरवत असल्याची ही टीका असे. पण या सर्व टीकांना सामोरं जात, बऱ्याच सुधारणा-दुरुस्त्या करत विकिपीडियाची घोडदौड सुरूच राहिली. परिणामी सर्वात मोठ्या यशाचे ते मानकरी ठरले.
 
आजची स्थिती अशी आहे की, वेबजगतातील सर्वाधिक लोकप्रिय असणाऱ्या 15 वेबसाईट्सपैकी एक विकिपीडिया आहे.
 
आजच्या घडीला विकिपीडिया 316 भाषांमध्ये उपलब्ध आहे. 5 कोटी 6 लाख लेख आतापर्यंत या वेबसाईटवर आहेत. या वेबसाईटचं काम स्वयंसेवी संपादकांकडून सांभाळलं जातं, हे विशेष.
 
अर्थात, या रंजक गोष्टीही मला विकिपीडियावरच सापडल्या!
 
विद्यार्थ्यांपासून राजकारण्यांपर्यंत, आणि अर्थात पत्रकारही, एखाद्य व्यक्तीबद्दल, घटनेबद्दल किंवा कुठलीही माहिती जाणून घेण्यासाठी सर्वात आधी विकिपीडियाकडे धाव घेतात. जरी विकिपीडियाने स्वत:हून सांगितलंय की, प्राथमिक स्रोत म्हणून विकिपीडिया वापरू नका, तरीही!
 
आम्ही तुम्हाला विकिपीडियाबाबतच्या पाच रंजक गोष्टी इथं सांगणार आहोत.
 
1. जॉर्ज डब्ल्यू बुश - संपदानासाठी अक्षरश: ऑनलाईन लढाई
जॉर्ज डब्ल्यू बुश यांनी 20 जानेवारी 2001 रोजी अमेरिकेचे 43 वे अध्यक्ष म्हणून शपथ घेतली. म्हणजेच, विकिपीडियाची सुरुवात झाल्याच्या पाच दिवसांनंतर.
 
जॉर्ज बुश यांच्यावरील लेख विकिपीडियावर प्रकाशित करण्यात आलं आणि विकिपीडियाच्या 'ओपननेस' या मुख्य तत्त्वावरच चिंता व्यक्त करण्यात आली.
 
डेव्हिड गेरार्ड हे स्वंयसेवी संपादक आहेत. अगदी विकिपीडियाच्या सुरुवातीच्या काळापासून. हे गेरार्ड सांगतात की, कुणीही एडिटचं बटन दाबून माहिती बदलू शकतो.
 
"विकिपीडिया हे एका चांगल्या हेतूने काम करणाऱ्यांचा गट आहे, जो चांगलं काहीतरी करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करतोय, हे लोकांना कळलं असेल अशी आशा आहे," असंही गेरार्ड सांगतात.
 
मात्र, अर्थातच सगळेच काही चांगले नसतात.
 
जॉर्ज डब्ल्यू बुश यांच्यावरील लेख विकिपीडियावर प्रकाशित करण्यात आला आणि त्यात प्रचंड बदल होऊ लागले. उदाहरणादाखल सांगायचं, तर गल्फ वॉरबद्दल. एकाने अमूक बदल केले, त्यात दुसरी कुणीतरी आणखी बदल करत असे. हे असं चक्र सुरू झालं. इथेच विकिपीडियाच्या संपादनासंदर्भातल्या नियमांची सुरुवात झाली, असं म्हणता येईल.
 
काही युजर्सना बंधनं घालण्यात आली. ती कशी, तर संपादनाची मर्यादा घालून देण्यात आली. विशेषत: नवीन युजर्स आणि निनावी नावानं अकाऊंट उघडणाऱ्या युजर्सना ही प्रामुख्यानं बंधनं होती.
 
जिमी वेल्स एक प्रसंग आठवून सांगतात की, "एक अॅडमिन बुश यांचं पेज अनलॉक करून ते सांभाळण्यासाठी पुढे आला. तो अत्यंत आशावादी वगैरे होता. मात्र, त्याच्या आठ तासांच्या मूर्खपणानंतर तोच म्हणाला, मी हे पेज लॉकच करतो, तेच बरंय."
 
2. कोरोनाची अचूक माहिती देण्यासाठी खास टीम
5 जानेवारी 2020 चा तो दिवस. विकिपीडियाच्या संस्थापकाने एक पेज तयार केलं, त्याचं नाव होतं - '2019-2020 चायना न्युमोनिया आऊटब्रेक'.
 
हा आजार दुसरा-तिसरा कुठला नसून, 2020 हे संपूर्ण वर्ष ज्यानं जगभर धुमाकूळ घातला, तो कोरोनाच होय.
 
विकिपीडियानं मग आपल्या पेजचं नाव बदललं आणि ठेवलं - 'कोव्हिड-19'.
 
कोरोनाच्या प्रत्येक मुद्द्यावर एखादं छोटंसं पुस्तक बनू शकेल, इतकी माहिती विकिपीडियावर संपादित करण्यात आली. आतापर्यंत 100 हून अधिक जणांनी या पेजचं संपादन केलंय.
 
खरंतर कोरोनाबाबत गेल्या काही महिन्यांमध्ये बऱ्याच अफवा, चकीची माहिती इत्यादी पसरत होती. मात्र, डेव्हिड सांगतात की, वैद्यकीय किंवा आरोग्याचा विषय ज्यावेळी येतो, तेव्हा विकिपीडिया आपली गुणवत्ता टिकवून ठेवत असते. तिथे कुठलीही हयगय केली जात नाही.
 
पण संपादन करणाऱ्यांमधील लढाई काही थांबण्याचं नाव घेत नाही.
 
एका प्रतिक्रियेत कुणीतरी म्हटलं होतं की, "ही अफवा आहे. ही घटना घडल्याला काहीच पुरावा नाहीय. त्यामुळी घटना इथे समाविष्ट केली जाऊ नये."
 
जिमी सांगतात की, "विकिपीडियाच्या सुरुवातीच्या काळातच आम्ही विकी प्रोजेक्ट मेडिसिन नावाचा गट स्थापन केला होता. यात डॉक्टर आणि वैद्यकीय तज्ज्ञांचा समावेश आहे. हाच गट कोरोनाच्या काळात कोव्हिड-19 चं पेज अचूक ठेवण्याचं काम करतो."
 
कोरोनावरील या पेजच्या संपादनासाठी मे 2020 मध्ये आम्ही नियमांमध्ये काही बदलही केले आहेत. किमान चार दिवसांचं संपादन आणि आतापर्यं 10 संपादनं केले असतील, अशांनाच परवानगी देण्यात येते.
 
गेल्या बऱ्याच वर्षात अशाप्रकारचं बंधनं पहिल्यांदाच घातलंय. एकप्रकारे हे दुर्लभच म्हणता येईल, असं डेव्हिड सांगतात.
 
आम्हाला विकिपीडियावरील लेख लॉक करावे वाटत नाहीत. मात्र, काही गंभीर असेल, तर तसं आम्ही करता, असंही डेव्हिड सांगतात.
 
3. ...आणि ग्लॅडीस वेस्ट यांचं पेज तयार झालं
 
ग्लॅडीस वेस्ट या अमेरिकन गणितज्ज्ञ होत्या. इम्पीरियल कॉलेज लंडन येथील डॉ. जेस वेड यांनी एक हजाराहून अधिक जीपीएस नेव्हिगेशन्स तयार केले. या निर्मितीसाठी त्यांना ग्लॅडीस वेस्ट यांच्या संशोधन आणि अभ्यासाचाच उपयोग झाला होता.
 
विकिपीडियामध्ये वैविध्याबाबत प्रंचड निराशाजनक वातावरण होतं. म्हणजे ते अगदी संपादकही प्रामुख्याने पुरुष आणि श्वेतवर्णीय असत.
 
हे बदलण्यासाठी ज्यांनी खऱ्या अर्थाने प्रयत्न केले, त्यात जेस यांचा समावेश आहे. त्यांनी महिला शास्त्रज्ज्ञांना अधिक प्राधान्य दिलं.
 
"मी विकिपीडिया साधारण गेल्या तीन वर्षांपासून संपादित करतेय. मी महिला आणि विविध वर्णीयांची चरित्र लिहिली आहेत," असं जेस सांगतात.
 
ग्लॅडी वेस्ट यांच्यावरील पेज हे जेस यांनी संपादित केलेलं पहिलं पेज आहे. हे पेज सुरू झाल्यानंतर यूएस एअर फोर्स हॉल ऑफ फेममध्ये वेस्ट यांचा समावेश झाला.
 
"आता जेव्हा कधी जीपीएस यंत्रणेची चर्चा होते, तेव्हा लोकच विचारतात, ग्लॅडीस वेस्टबद्दल काय?" असं जेस सांगतात.
 
पण जेस म्हणतात, अजून बरंच काम बाकी आहे.
 
विकिपीडियाच्या पहिल्या पानावरच, जिथे भौतिकशास्त्रातील तज्ज्ञांची यादी दिली गेलीय, त्यावर महिलांचं प्रमाण फक्त 1.6 टक्के देण्यात आलंय.
 
जेस म्हणतात, डोन्ना स्ट्रिकलँड, जोसलीन बेल बर्नेल यांसारख्या शास्त्रज्ज्ञांचं आयुष्य इतून दूर आहे, असं जेस सांगतात.
 
4. WWE - सर्वाधिक संपादित पेज
गेली अनेक वर्षे सर्वात जास्त संपादन झालेल्या पेजच्या यादीत जॉर्ज डब्ल्यू बुश यांचंच पेज पहिल्या स्थानी होतं. मात्र, आता या पेजलाही आणखी एका पेजनं मागे टाकलंय, ते म्हणजे WWE पैलवानांच्या पेजने. या पेजचं तब्बल 53 हजारांहून अधिकवेळा संपादन झालंय.
 
मात्र, इथेही संपदन करणाऱ्यांमध्ये माहितीबाबत खूप वाद असलेला दिसतो.
 
रिंगमध्ये उतरलेल्या प्रत्येकासाठी त्यांचे चाहते विकिपीडियावर माहिती संपादित करायला येतात.
 
संपादकाला वाटत नाही की अमूक माहिती क्षुल्लक आहे आणि ती रद्द करायला हवी, तोपर्यंत ती तिथेच राहते.
 
5. रंजक शब्दांचा भडीमार
विकिपीडियाचे संस्थापक असलेल्या जिमी यांचंही Inherently funny word हे पेज अत्यंत आवडीचं आहे. या पेजवर असे काही शब्द आहेत, जे रंजक आहेत, इतर शब्दांपेक्षा काहीसे अजब म्हणता येतील.
 
मात्र, काही काळानं हे पेज हटवण्यासाठी विनंती होऊ लागली.
 
झालं असं की, बरेच जण कुठलेही शब्द संपादन करून समाविष्ट करू लागले. आणि या शब्दांना काहीच संदर्भ नव्हता.
 
मग अशावेळी फक्त संस्थापकाला हे पेज आवडतं, म्हणून ते तसंच ठेवायचं?
 
डेव्हिड म्हणतात, अजिबात नाही.
 
डेव्हिड विकिपीडियाचं वर्णन दोन्ही पद्धतीने करतात. एक म्हणजे, कुणाचं नियंत्रण नसलेलं अराजक (किंवा अनियंत्रित असं आपण म्हणू शकतो) म्हणूनही आणि दुसरं म्हणजे एक गुंतागुंतीची नोकरशाही, जी तुम्ही सर्व शिकवू पाहते.
 
पण हे अनियंत्रित असलं तरी ते चांगलं सुरू असल्याचं आतापर्यंत तरी दिसतंय.