शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: शुक्रवार, 3 जानेवारी 2020 (15:42 IST)

देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ खडसे यांच्या भेटीचा अर्थ काय?

देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांनी भाजपच्या कोअर ग्रुपमध्ये मला तिकीट न देण्यसाठी नाराजी व्यक्त केली होती, असं गुरुवारी (2 जानेवारी) एकनाथ खडसेंनी जाहीरपणे आरोप केले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे शुक्रवारी एकनाथ खडसेंची भेट घेण्यासाठी देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन थेट जळगावात पोहोचले.
 
जळगाव जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदांच्या निवडणुकीसाठी जरी खडसे, महाजन आणि फडणवीसांची भेट झाली असली, तरी राजकीय वर्तुळात ही भेट चर्चेचं केंद्र बनली. कारणही तसंच आहे.
 
गुरुवारी खडसेंनी महाजन-फडणवीसांवर नाराजी व्यक्त केली. त्यानंतर आजच्या बैठकीनंतरही खडसेंना विचारण्यात आलं की, तुमची नाराजी दूर झालीय का? तर त्यावर ते म्हणाले, "आजच्या बैठकीत केवळ जिल्हा परिषद निवडणुकीबाबत चर्चा झाली. तो विषय वेगळा आहे. आज इतर मुद्दे चर्चेस आले नाहीत."
 
तर दुसरीकडे, गिरीश महाजन म्हणाले, "यापुढे आमच्यातील मनोमिल दिसून येईल. आमच्यात संभाषण कमी झालं होतं. आम्ही सगळे एकत्रच आहोत."
 
मात्र, तरीही खडसेंची नाराजी दूर करण्यासाठी फडणवीसांकडून पावलं उचलली जातायत का, अशीही चर्चा सुरु झालीय.
 
खडसे-फडणवीस-महाजन भेटीचा अर्थ काय?
याबाबत महाराष्ट्र टाईम्सचे नाशिकचे निवासी संपादक शैलेश तनपुरे म्हणतात, "चर्चेची दारं उघडी आहेत, असं म्हणता येईल. मात्र, याला प्राथमिक कारण, जिल्हा परिषदेतली सत्ता राखणं हे आहे. मात्र, या भेटीनं फार बदल होतील, असं दिसत नाही."
 
शैलेश तनपुरे जळगाव जिल्हा परिषदेतल्या सत्तेचा उल्लेख करतात, त्या जिल्हा परिषदेत गेल्या 30 वर्षांपासून भाजपची सत्ता आहे.
 
67 सदस्य संख्या असलेल्या जळगाव जिल्हा परिषदेत सध्या भाजप (33), राष्ट्रवादी (16), काँग्रेस (4) आणि शिवसेना (14) अशी सदस्यसंख्या आहे. काँग्रेसच्या पाठबळावर जळगावात भाजप सत्तेत आहे. त्यामुळे कोल्हापुरात महाविकास आघाडी जशी एकत्र आली, तशीच जळगावात एकत्र आल्यास भाजपसाठी लढत अटीतटीची होईल. त्यामुळे खडसेंची नाराजी भाजपला परवडणारी नाही, असंच दिसून येतंय.
 
"राज्यात सत्तेत आलेली महाविकास आघाडी भाजपच्या ठिकठिकाणच्या सत्ता खालसा करताना दिसतायत. तेच जळगावात झालं, तर भाजपची पंचाईत होईल. जळगाव जिल्हा परिषदेतली भाजपची सत्ता जाणं म्हणजे भाजपला मोठा धक्का ठरू शकतो. कारण जवळपास 20 वर्षं भाजपकडे जळगाव जिल्हा परिषद आहे. ती एकदा खालसा झाली, तर पंचायत समित्या, ग्रामपंचायतीही जाऊ शकतील. म्हणून भाजपकडून खबरदारी घेतल्याचे दिसून येते," असं शैलेश तनपुरे म्हणतात.
 
शिवाय, जळगाव जिल्हा परिषद हातातून गेल्यास खडसे वेगळे होतायत असा स्पष्ट संदेश गेला असता, असंही तनपुरे सांगतात.
 
वरिष्ठ पत्रकार दिलीप तिवारीही फडणवीस-खडसे भेट म्हणजे जळगाव जिल्हा परिषद निवडणुकीपुरतीच असल्याचं म्हणतात.
 
ते म्हणतात, "सगळीकडेच भाजपला जिल्हा परिषदेत सुरुंग लागताना दिसतंय. जळगावमध्ये महाजन आणि खडसे या दोघांचे गटही शक्तिशाली आहेत. या वादातून सत्ता जाऊ नये म्हणून फडणवीसांनी प्रयत्न केल्याचं दिसतं."
 
खडसेंची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न होतोय का?
पण आदल्या दिवशी आपल्यावर आरोप करूनही फडणवीसांनी खडसेंची भेट घेणं म्हणजे त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा सुरु झाली आहे.
 
दिलीप तिवारी म्हणतात, "खडसेंची नाराजी दूर होण्याची ही सुरुवात म्हणता येणार नाही. कारण खडसेंनी इतका तणाव निर्माण करून ठेवलाय. काल तर थेट नाव घेऊन त्यांनी टीका केलीय. त्यामुळे जिल्हा परिषदेपुरताच हा संवाद आहे."
 
मात्र, शैलेश तनपुरे हे खडसेंच्या टीकेनंतर भाजपनं पक्षीय शिस्तभंगाची कारवाई न केल्याकडे लक्ष वेधतात. तनपुरे म्हणतात, "खडसेंनी कालच फडणवीस आणि महाजन यांची थेट नावं घेऊन टीका केली. मात्र तरीही पक्षानं (भाजप) त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली नाही. त्यामुळे कुठंतरी पक्षालाही त्यांची गरज आहे, असं दिसून येतं."
 
खडसेंची नाराजी दूर करण्यापेक्षा फडणवीस आता आपली प्रतिमा सावरण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिलीप तिवारी म्हणतात. खडसेंच्या भेटीच्या निमित्तानं तेच दिसून आल्याचंही ते सांगतात.
 
त्यामुळे राहतो मुद्दा, खडसेंच्या नाराजीची भाजपला भीती वाटत नाही का, तर तनपुरे म्हणतात, "खडसेंनी राष्ट्रवादी आणि शिवसेनेत जाण्याचा प्रयत्न केलाच होता. मात्र, तिथे जाण्याचे रस्ते खुंटले असल्यानं भाजपमध्ये राहून पक्षाचं नाक दाबणं आणि शक्य तेवढं आपल्या पदरात पाडून घेणं, यापलिकडे त्यांच्या हाती असल्याचं दिसत नाही."
 
मात्र, खडसेंनी केलेल्या आरोपांबाबत गिरीश महाजन किंवा देवेंद्र फडणवीस यांनी अद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेली नाहीय. त्यामुळे ते काय बोलतायत आणि त्यानंतर एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया काय असेल, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
 
एकनाथ खडसेंनी काल काय म्हटलं होतं?
एकनाथ खडसे यांनी एबीपी माझाला मुलाखत दिली. त्यात ते म्हणाले होते की, "सांगायला काही अडचण नाही की, देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांच्यासारख्या नेत्यांनी भाजपच्या कोअर ग्रुपमध्ये माझ्या तिकिटाबाबत नाराजी व्यक्त केली होती."
 
तसंच, "मला तिकीट न देण्याबाबत काय प्रयोजन आहे, हे मी वारंवार विचारलं, माझा गुन्हा काय आहे, हे मला कुणीही सांगत नाही. मला सांगून समाधान करा, पण समाधान होत नाही. स्वत:चं राजकारण सरळ करण्यासाठी मला संपवण्याचा हा डाव आहे," असंही खडसे म्हणाले होते.