शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Updated : बुधवार, 22 जून 2022 (20:19 IST)

एकनाथ शिंदेंचं बंड ही उद्धव ठाकरेंचीच खेळी?,या चर्चेत किती तथ्य?

eknath uddhav
शिवसेनेचे पहिल्या फळीचे नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर पक्षात उभी फूट पडलीय.
आपल्या सोबत शिवसेनेचे 40 आमदार आहेत असा दावा एकनाथ शिंदे यांनी केला आहे. तसंच आपण शिवसेना सोडलेली नाही असंही ते वारंवार स्पष्ट करत आहेत.
 
दुसऱ्या बाजूला पक्ष प्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंना भावनिक साद घातली आहे की, मुंबईत येऊन त्यांना भेटा. पण, त्यांनी राजीनामा दिला नाही. त्यामुळे ही राजकीय खेळी खुद्द उद्धव ठाकरे यांची तर नाही ना? असा प्रश्न उपस्थित केला जातोय.
 
'मातोश्री अनभिज्ञ होती यावर विश्वास नाही'
 
तुम्हाला पहाटेचा शपथविधी आठवतोय का? महाविकास आघाडीने सत्तास्थापनेचा दावा करूनही राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि शरद पवार यांचे पुतणे अजित पवार यांनी भाजपचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सरकार आणण्याचा प्रयत्न केला होता.
 
शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं ठरलं असताना, महाविकास आघाडीची सत्ता येणार असं या तिन्ही पक्षांच्या हायकमांडने निश्चित केलेलं असताना अजित पवार पहाटे काही आमदारांसोबत राजभवनावर शपथविधीसाठी पोहोचले होते.
 
त्यानंतर शरद पवार यांनी आमदारांना परत बोलवलं, हे जरी उघड असलं तरी या राजकीय प्रयोगाचे खरे सूत्रधार खुद्द शरद पवार नव्हते ना? असा संशय आजही राजकीय वर्तुळात कायम आहे.
 
आताची परिस्थिती फारशी वेगळी नाही. कट्टर शिवसैनिक, 'मातोश्री'चे निष्ठावंत आपल्याच पक्षातल्या आमदारांना घेऊन एका रात्रीत महाराष्ट्राबाहेर पडले.
 
एक, दोन नव्हे तर तब्बल 30-40 आमदारांची फौज त्यांच्यासोबत होती. पण तरीही पक्ष प्रमुखांना याचा थांगपत्ता कसा नाही? असा प्रश्न उपस्थित केला जातोय.
 
एकनाथ शिंदेंसोबत कॅबिनेट मंत्रीही सुरतला गेले. यात गृहराज्यमंत्री शंभु देसाई यांचाही समावेश आहे.
 
या सर्व घडामोडी स्क्रिप्टेड तर नाहीत? ही राजकीय खेळी उद्धध ठाकरेंचीच असू शकते का? अशी चर्चा सोशल मीडियावरही सुरू झालीय.
 
वरिष्ठ पत्रकार सुधीर सूर्यवंशी यांनी यासंदर्भात ट्वीट केलंय. या ट्वीटमध्ये ते म्हणाले, "एकनाथ शिंदे यांनी शिवसनेचे 30 आमदार फोडले, तरीही पक्ष नेतृत्त्वाला काहीच माहिती कशी नाही? या सर्व आमदारांना 24 तास पोलीस सुरक्षा असते. तरीही त्यांना कल्पना नाही?"
 
दुसरा प्रश्न ते असाही उपस्थित करतात, "एकनाथ शिंदे हे मोठे नेते आहेत यात वाद नाही. पण पक्षातले एकगठ्ठा 30 आमदार फोडण्याची ताकद खरंच त्यांच्या एकट्याकडे आहे का?"
 
"शिवाय हे सगळे आमदार उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बंड करण्यासाठी एकनाथ शिंदेंसोबत गेले हे पचवणं थोडं कठीण आहे," असंही ते म्हणाले.
 
ज्येष्ठ पत्रकार रवींद्र आंबेकर यांनीही अशाच आशयाचं ट्वीट केलंय. ते म्हणतात, "अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या बंडामध्ये संख्यात्मक फरक आहे, बाकी स्क्रिप्ट दोन्हीकडची सेम होती! दोन्ही प्रकरणात त्यांचं हायकमांड अनभिज्ञ होतं असं मला वाटत नाही. शिवसेनेचं ऑपरेशन कमळ आहे."
 
ज्येष्ठ पत्रकार आणि बऱ्याच वर्षांपासून शिवसेना पक्षाचं राजकारण जवळून पाहिलेले संदीप प्रधान सांगतात, "मलाही हाच प्रश्न पडलाय की ही 'मातोश्री'ची खेळी आहे का? कारण शिंदेंसोबत जे आमदार गेलेत ते त्यांच्या जवळचे आमदार नाहीत. उद्धव ठाकरेंची भेट घेतल्यानंतर मागूनही काही आमदार सुरत आणि नंतर गुवाहटीला गेले. याचा काय अर्थ आहे."
 
शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांमागे लागलेला ईडीचा ससेमिरा हे सुद्धा यामागील प्रमुख कारण असू शकतं असं ते सांगतात.
 
एकनाथ शिंदे यांनी जाहीर बंड केलं त्या दिवशी म्हणजेच 21 जूनला उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय, परिवहन मंत्री अनिल परब यांची ईडीने तब्बल 11 तास चौकशी केली.
 
"शिवसेना आमदारांचं पाठबळ देऊन भाजपने सत्ता स्थापन केली तर ईडीचा सततचा दबाव नियंत्रणात राहू शकेल. जास्तीत जास्त आमदार सरकारला पुरवायचे आणि मंत्रिपदं घ्यायची. विधिमंडळ गटनेतेपद एकनाथ शिंदेंना द्यायचं आणि सत्तेपासून दूर राहून पक्ष प्रमुख म्हणून सक्रिय रहायचं असा विचार उद्धव ठाकरे यांचा असू शकतो," अशीही शक्यता संदीप प्रधान यांनी व्यक्त केली.
 
'ही खेळी उद्धव ठाकरेंची असू शकत नाही'
राजकीय विश्लेषक अभय देशपांडे यांनी मात्र या सगळ्या शक्यता फेटाळल्या आहेत. ही उद्धव ठाकरेंचीच खेळी आहे याची एक टक्काही शक्यता नाही असं ते सांगतात.
 
ते म्हणाले, "हा पूर्णपणे एकनाथ शिंदेंचा निर्णय आहे. सुरुवातीपासूनच आमदारांना भाजपसोबत युती हवी होती. ते त्यांच्यासाठी फायदेशीर होतं आणि भाजप विरोधात जाणं जिकरीचं आहे, असं त्यांना वाटत होतं. पण पक्षाचा निर्णय म्हणून त्यांनी तो मान्य केला होता."
 
ते पुढे सांगतात, "ते बाळासाहेबांच्या हिंदुत्वाने आम्ही पुढे चाललोय असंच म्हणत आहेत. त्यामुळे बाळासाहेबांचं हिंदुत्व आम्ही नाही तर तुम्ही ( उद्धव ठाकरे) सोडलं हे ते जाहीर सांगतायत. त्यामुळे बाळासाहेबांच्या शिवसेनेला ते आव्हान देतायत असं म्हणता येणार नाही."
 
 
तर उद्धव ठाकरे स्वत:वर अशी नामुष्की का ओढावतील, असा प्रश्न वरिष्ठ पत्रकार वैभव पुरंदरे उपस्थित करतात.
 
ते म्हणाले, "महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा हा एक्झिट प्लॅन आहे असं मला वाटत नाही. ते स्वत:च अशी नामुष्की का ओढवून घेतील. त्यांना बाहेरच पडायचं होतं तर ते अधिक सन्माननीय पद्धतीने बाहेर पडले असते."
 
"अशा कॉन्स्पिरसी थीअरीला काही अर्थ नसतो असं मला वाटतं. आपण हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे की हा बाळासाहेबांनंतरचा काळ आहे. म्हणजे बाळासाहेब ठाकरे गेल्यानंतरची ही शिवसेना आहे. त्यामुळे शिवसेनेत असं काही होणं शक्य नाही."
 
मग उद्धव ठाकरेंचं कुठे चुकलं?
या बंडानंतर पक्ष नेतृत्त्वावर प्रश्न उपस्थित होणं स्वाभाविक आहे.
 
महाविकास आघाडीच्या सत्तास्थापनेपासूनच एकनाथ शिंदे नाराज होते. ही नाराजी उद्धव ठाकरेंना वेळीच दूर करता आली नाही.
 
या संदर्भात बोलताना अभय देशपांडे सांगतात, "शिंदे नाराज होते हे निश्चितच त्यांना माहिती होतं. काही आमदार भाजपसोबत जाण्यासाठी इच्छुक आहेत याचीही कल्पना त्यांना असणार. पण एवढं मोठं बंड होईल याचा अंदाज त्यांना आला नाही. शिंदेंनी बंड केलं तरी फार काही मोठं होणार नाही असंही त्यांना वाटत असावं."
 
"याला आपण अति-आत्मविश्वास म्हणू शकतो. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसला सांभाळण्यासाठी त्यांना एवढी ऊर्जा लागली की संघटनेकडे दुर्लक्ष झालं."
 
आमदारांचे स्थानिक प्रश्न, निधी, त्यांच्याशी वेळेत संवाद साधणं किंवा त्यांना वेळ देणं या संघटनेसाठी महत्त्वाच्या असलेल्या गोष्टींकडे पक्ष नेतृत्त्वाकडून दुर्लक्ष झालं आणि नाराजी टोकाला पोहचली असंही दिसून येतंय. उद्धव ठाकरे यांनीसुद्धा बुधवारच्या त्यांच्या फेसबुक लाईव्हमध्ये आजारपणामुळे लोकांना वेळ देता आला नाही, हे मान्य केलं आहे.
 
वरिष्ठ पत्रकार वैभव पुरंदरे म्हणाले, "मला वाटतं हे पक्षाचं अपयश आहे. आमदारांची नाराजी दूर करू शकले नाहीत आणि अगदी पक्ष पणाला लागला ही वेळ आली हे नेतृत्त्वाचं अपयश आहे,"
 
पण एक गोष्ट महत्त्वाची आहे ती म्हणजे मुख्यमंत्र्यांना दररोज गृह खात्याकडून होणारं ब्रिफिंग. हे ब्रिफिंग मुख्यतः राज्यात घडत असलेल्या राजकीय आणि सामाजिक घडामोडींचं असतं. राज्यातल्या या घडामोडींची माहिती गृह खात्याच्या गुप्तचर विभागानं गोळा केलेली असते आणि दररोज सकाळी गृह खात्याचे वरिष्ठ अधिकारी त्याची सविस्तर माहिती मुख्यमंत्र्यांना देतात.
 
ज्याच्या माध्यमातून राज्यातल्या राजकीय घडामोडींचा अंदाज घेणं मुख्यमंत्र्यांना सहज शक्य असतं.