परीक्षा पुढे ढकलली, परिस्थिती पाहून नवीन तारखा जाहीर करणार
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची रविवारी 11 एप्रिल रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.
महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब ची संयुक्त पूर्व परीक्षा 2020 ही येत्या रविवारी होणार होती. पण ती पुढे ढकलण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली झालेलया बैठकीत घेण्यात आला.
राज्यातल्या कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन नवीन तारीख जाहीर करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलंय.
राज्यात वेगाने वाढणारी कोव्हिड 19 रुग्णसंख्या, विद्यार्थ्यांची सुरक्षितता याचा विचार करून, विद्यार्थी आणि विविध राजकीय पक्षांची मतं आणि मागण्या विचारात घेऊन, हा निर्णय एकमताने घेण्यात आला असल्याचं राज्य सरकारच्या पत्रकात म्हटलं आहे.
ही परीक्षा पुढे ढकलल्याने परीक्षार्थी विद्यार्थ्यांचं कोणतंही नुकसान होणार नाही, परीक्षा फॉर्म भरतानाचं विद्यार्थ्यांचं वय गृहित धरलं जाणार असल्याने वयाची डचण येणार नसल्याचं सरकारने म्हटलंय.
मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला राज्यातले सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे नेते उपस्थित होते.
जितेंद्र आव्हाडांचं ट्वीट
MPSC ची परीक्षा पुढे ढकलल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार मानणारं ट्वीट गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे.
आव्हाड यांनी ट्वीट करत म्हटलंय, "मुख्यमंत्री साहेब तुम्ही परत एकदा माणुसकीचे दर्शन घडवलं. तुमच्यातील ज्या संवेदना आज जिवंत आहेत, त्या परत एकदा महाराष्ट्राला दिसल्या. महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांच्या वतीने आपण MPSC आणि MBBS च्या ज्या परीक्षा पुढे ढकलल्या त्याबद्दल आपले जाहीर आभार."