गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By

विंग कमांडर अभिनंदन यांनी खरंच भाजपला पाठिंबा दिला आहे का?

विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांनी भारतीय जनता पार्टीला उघड पाठिंबा दिल्याचा आणि त्यानं नरेंद्र मोदींना मत दिल्याचा दावा करणारा एक फोटो व्हायरल झाला आहे.
 
या फोटोबरोबर करण्यात आलेल्या दाव्यामध्ये लिहिलं आहे, "विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांनी भाजपाला उघड पाठिंबा दिला आहे आणि इतकंच नाही तर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मतही दिलं आहे. आताच्या काळात नरेंद्र मोदींशिवाय दुसरी कोणतीही व्यक्ती चांगली पंतप्रधान होऊ शकत नाही. मित्रांनो लष्कराच्या एखाद्या जवानास जिवंत परत कधीच आणले नाही हे जिहादी आणि काँग्रेसच्या लक्षात आणून द्या."
 
27 फेब्रुवारी रोजी अभिनंदन यांचं विमान पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाडल्यानंतर त्यांना पकडण्यात आलं होतं. 1 मार्च रोजी त्यांना भारताकडे सोपवण्यात आलं होतं. या काळामध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये तणावाची स्थिती निर्माण झाली होती. 14 फेब्रुवारी रोजी काश्मीरमध्ये पुलवामा येथे सीआरपीएफच्या जवानांच्या ताफ्यावर हल्ला झाला होता. त्यामध्ये 40 जवानांचे प्राण गेले होते. 26 फेब्रुवारी रोजी भारताने पाकिस्तानच्या भूमीत हवाई हल्ले केले होते. पाकिस्तानी जेटचा पाठलाग करणाऱ्या विमानाला पाडल्यानंतर 27 फेब्रुवारीरोजी अभिनंदन यांना पकडले असं पाकिस्तानने स्पष्ट केलं होतं.
 
व्हायरल झालेल्या फोटोतून अभिनंदन यांच्या लोकप्रियतेचा राजकीय फायद्यासाठी उपयोग करण्याचा प्रयत्न होत असल्याचं दिसून येतं. नमो भक्त, मोदी सेना यासारख्या उजव्या विचारसरणीच्या फेसबूक ग्रुप्सवर तो फोटो शेअर करण्यात आला आहे. फेसबुक आणि ट्वीटरवर हजारो लोकांनी तो पाहिला आहे. या फोटोची सत्यता पडताळण्यासाठी आमच्या व्हॉटसअप वाचकांनी हा फोटो आम्हाला पाठवला. या फोटोत केलेले दावे खोटे असल्याचं बीबीसीला समजलं. तसेच हा फोटो अभिनंदन यांचा नसल्याचंही स्पष्ट झालं.
 
सत्य काय आहे?
भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये तयार झालेल्या तणावपूर्वक स्थितीनंतर अभिनंदन यांचा देशभरात गौरव करण्यात आला होता. त्याच्या मिशांची स्टाइल भारतांमध्ये लोकप्रिय झाली. या फोटोत अभिनंदन यांच्यासारख्या मिशा असणाऱ्या व्यक्तीने काळा चष्मा घातला असून त्याने गळ्यात भाजपाचं चिन्ह कमळ असलेलं उपरणं घातलं आहे. फोटोत अभिनंदन यांच्यासारख्या दिसमाऱ्या व्यक्तीमध्ये आणि अभिनंदनमध्ये बराच फरक असल्याचं आमच्या लक्षात आलं.
 
अभिनंदन यांच्या ओठांच्या खाली डाव्या बाजूला तीळ आहे. मात्र फोटोतल्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर तसे दिसत नाही. फोटोतल्या व्यक्तीच्या उजव्या डोळ्याजवळ तीळ आहे, मात्र असा खऱ्या अभिनंदनच्या उजव्या डोळ्याजवळ असा तीळ नाही. फोटोतल्या व्यक्तीच्या मागे समोसा सेंटर अशी गुजराती अक्षरं असलेली पाटी आहे, त्यामुळे हा फोटो गुजरातमध्ये काढलेला दिसून येतो. पण या राज्यात अजून मतदान झालेलेच नाही.
 
अभिनंदन यांनी 27 मार्च रोजी श्रीनगरमध्ये वायूदलामधील काम पुन्हा सुरू केले. कामावर रूजू होण्यापूर्वी त्यांनी चार आठवड्यांची विश्रांती घ्यावी असं डॉक्टरांनी सुचवलं होतं, मात्र त्यांनी काम सुरु करण्याचा निर्णय घेतला. अभिनंदन यांनी पुन्हा विंग कमांडर म्हणून काम सुरू केले आहे. 'वायूदल नियम 1969' नुसार कोणत्याही अधिराऱ्याला कोणत्याही राजकीय संघटनेने किंवा चळवळीत सहभागी होता येत नाही किंवा मदत करता येत नाही. हा व्हायरल झालेला फोटो विंग कमांडर अभिनंदन यांचा नसल्याची माहिती भारतीय वायूदलांमधील सूत्रांनी बीबीसीला दिली. फेक न्यूजमध्ये त्यांचा वापर याआधीही झाला आहे. त्यांची पाकिस्तानने सुटका केल्यानंतर काही तासांमध्ये सोशल मीडियावर त्यांच्या नावाने अनेक फेक अकाऊंटस सुरू करण्यात आली होती. वायूदलाने हे दावे फेटाळले होते.