पॅरिस : 850 वर्षं जुन्या नोत्र दाम कॅथेड्रलला आग, इमारत भस्मसात.. शिखर कोसळलं
पॅरिसच्या सर्वात प्राचीन आणि जगभरात प्रसिद्ध असलेल्या नोत्र दाम कॅथेड्रलला आग लागून अख्खी इमारत भस्मसात झाल्याची घटना घडली आहे. आगीचं नेमकं कारण अद्यापही समजू शकलेलं नाही. मात्र चर्चमध्ये नूतनीकरणाचं काम सुरू होतं, आणि यामुळेच आग लागलेली असू शकते अशी शक्यता अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे. विशेष म्हणजे नोत्र दाम कॅथेड्रलची इमात 850 वर्ष जुनी होती. अग्नीशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत, मात्र आगीमुळे प्रार्थनास्थळाचा हॉल आणि कळस कोसळला आहे. मात्र सुदैवानं मुख्य इमारत आणि दोन टॉवर्स वाचवण्यात अग्नीशमनल दल आणि पोलिसांना यश आलं आहे.
प्राचीन वास्तू असलेलं चर्च मोडकळीस आलं होतं. त्याची अवस्था जीर्ण झाली होती. त्यामुळे गेल्यावर्षी लोकांनी ही वास्तू वाचवण्यासाठी आर्थिक मदत करावी असं आवाहन करण्यात आलं होतं. फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन यांना घटनेची माहिती मिळताच ते तातडीनं चर्चकडे रवाना झाले. "या दुर्घटनेमुळे कॅथलिक समाजाच्या आणि पूर्ण फ्रान्सच्या भावना दुखावल्या आहेत, त्यांना वेदना झाल्या आहेत. या दु:खद क्षणी मी कॅथलिक लोकांसोबत आहे. " असं त्यांनी म्हटलं आहे.
"सगळ्या देशवासियांप्रमाणे मीसुद्धा आज मनातून प्रचंड दु:खी आहे. आपल्या जगण्याचा एक भाग जळून खाक होत असताना बघून प्रचंड वेदना होत आहेत." असं मॅक्रॉन यांनी म्हटलंय. "खूप मोठा धोका टळला आहे. या चर्चच्या पुनर्बांधणीसाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर निधी गोळा केला जाईल आणि हे चर्च पुन्हा बांधलं जाईल." अशी ग्वाही त्यांनी दिली. "आम्ही ही वास्तू पुन्हा बांधू कारण आमच्या इतिहासात या वास्तूचं अमूल्य स्थान आहे." हे बोलताना ते अतिशय भावनिक झाले होते. "ही अतिशय दुर्दैवी घटना आहे." असं ते म्हणाले.
इमॅन्युएल मॅक्रॉन आज देशाला संबोधित करणार होते, मात्र प्राचीन चर्चला आग लागल्याची बातमी समजल्यानंतर त्यांनी हा कार्यक्रम रद्द केला आहे, राष्ट्रपती भवनाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. प्रार्थनास्थळाच्या एका प्रवक्त्याने सांगितलं की, पूर्ण चर्चला आगीनं जणू वेढा घातला आहे. "आता तिथं काही शिल्लक आहे असं वाटत नाही. आता एवढंच बघायचंय की चर्चला घुमट सुरक्षित आहे किंवा नाही."
पॅरिसचे महापौर एन हिडाल्गो घटनास्थळावर आहेत. त्यांनी सांगितलं की "आगीचं स्वरूप भयानक होतं. सामान्य लोकांनी अग्नीशमन दलानं आखून दिलेल्या सीमेनजीक जाऊ नये, तसंच नियमांचं पालन करावं." दरम्यान हेलिकॉप्टरच्या साहाय्यानं पाण्याचा मारा करून आग विझवण्याचा प्रयत्न करावा, असा सल्ला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी दिला आहे.
फ्रान्समधील ऐतिहासिक आणि महत्त्वाचं ठिकाण
हे चर्च जगातल्या सर्वात प्राचीन कॅथेड्रलपैकी एक आहे. प्रत्येक वर्षी लाखोंच्या संख्येनं लोक इथं प्रार्थनेसाठी आणि पर्यटनासाठी येतात. ही इमारत जीर्ण झाली होती. भिंतींनी तडे गेले होते. त्यानंतरच इमारतीच्या नुतनीकरणाचं काम हाती घेण्यात आलं होतं. दरम्यान आग नेमकी कशामुळे लागली हे शोधण्यासाठी एका समितीची स्थापना करण्यात आल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. ज्याप्रमाणं नोत्र दाम कॅथेड्रलची इमारत फ्रान्सचं वैशिष्ट्य आणि सामर्थ्य दाखवते ते फ्रान्समधील दुसरी कुठलीही इमारत दर्शवत नाही असं बीबीसीचे प्रतिनिधी हेन्री एस्टियर म्हणतात.
तुम्ही असंही म्हणून शकता की पॅरिसच्या आयफेल टॉवरला फक्त ही एकमेव इमारत टक्कर देते. देशाच्या एका महान साहित्यिक कलाकृतीचं नावही याच इमारतीववरून ठेवण्यात आलंय. व्हिक्टर ह्युगो यांचं 'द हंचबॅक ऑफ नोत्र दाम' ला नोत्र दाम द पॅरिस नावानं ओळखलं जातं. फ्रान्सच्या क्रांतीवेळी या इमारतीचं बरंच नुकसान झालं होतं. ही इमारत दोन जागतिक युद्धांची साक्षीदार आहे. या दुर्घटनेनंतर अनेक स्वयंसेवी संस्था आणि प्रसिद्ध उद्योगपतींनी या वास्तूच्या पुनर्बांधणीसाठी पुढाकार घेतला आहे.