शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Updated : सोमवार, 15 एप्रिल 2019 (10:12 IST)

लोकसभा निवडणूक : दलित, मुस्लिमांशी भेद केल्याचा आरोप असलेल्या भाजपसोबत का आहेत लिंगायत गुरू जयसिद्धेश्वर स्वामी?

"आता बघा माझे हात बांधले गेले आहेत. जगद्गुरूंपेक्षा कुणीही मोठं असू शकत नाही. जर मी बोललो तर मला त्यांच्या विरोधात बोलावं लागेल, आणि जर मी बोललो नाही तर इतर काही जण नाराज होतील. म्हणून जर लिंगायत समाजाला धर्म म्हणून मान्यता द्यावी की नाही याचा निर्णय जगद्गुरू घेतील आणि त्याबद्दल तेच सांगतील," असं म्हणत सोलापूरचे भाजपाचे उमेदवार जयसिद्धेश्वर स्वामी यांनी स्पष्टपणे भूमिका घेणं टाळलं आहे.
 
जयसिद्धेश्वर स्वामी हे सध्या अनुसुचित जातींसाठी राखीव असलेल्या सोलापूर लोकसभा मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार आहेत. त्यांनी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांना आव्हान दिलं आहे.
 
त्यांच्या जात प्रमाणपत्रावरही आक्षेप घेण्यात आला होता. मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी ते वैध ठरवलं आहे. कर्नाटकातील लिंगडेर समाज हा अनुसुचित जातींमध्ये येतो. मात्र महाराष्ट्रात लिंगायत समाज हा खुल्या प्रवर्गात आहे.
 
एका अध्यात्मिक गुरूंना राजकारणात येण्याची गरज का आणि कशासाठी पडली? या प्रश्नाचं उत्तर देताना ते म्हणतात, "धर्म आणि दंड दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. धर्म नसेल तर अनैतिकता वाढेल आणि जर दंड काढून टाकला तर अराजक निर्माण होईल. त्यामुळे माझ्या एका हातात धर्म आहे, तर दुसऱ्या हातात राजदंड घेतला तर समाजाला त्याचा अधिक फायदा होईल."
 
मात्र निवडणुकीच्या आखाड्यात मी केवळ पालकमंत्री विजय देशमुख आणि सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या आग्रहामुळेच उतरलो आहे असं जयसिद्धेश्वर स्वामी यांनी सांगितलं.
 
दरम्यान मी फक्त कामासाठी, जनतेसाठी, राष्ट्रासाठी कटिबद्ध आहे. मी केवळ कामाशीच स्पर्धा करतो. त्यामुळे जरी सुशीलकुमार शिंदे किंवा प्रकाश आंबेडकर माझ्याविरोधात निवडणुकीत असले तरी मी त्यांना आव्हान समजत नाही, असं उत्तर देऊन जयसिद्धेश्वर स्वामींनी हुशारीनं दोन्ही नेत्यांपेक्षा धर्मशास्त्र अधिक महत्त्वाचं आहे असं सूचित केलं आहे.
 
'सबका साथ सबका विकास'वर विश्वास
बसवेश्वरांनी भेदाभेद आणि उच्च-नीचतेला विरोध म्हणून लिंगायत धर्माची स्थापना केली. मग ज्या पक्षावर दलित, मुस्लिमांवर अन्याय केल्याचा आरोप होतो. मुस्लिमांचं मॉब लिंचिंग झालं, फरीदाबाद आणि उनामध्ये दलितांवर अत्याचार झाले. मग अशा पक्षाचं तिकीट अध्यात्मिक गुरू असूनही तुम्ही का घेतलं? या प्रश्नाचं उत्तर देताना जयसिद्धेश्वर स्वामी म्हणाले की, "आता बघा नरेंद्र मोदींचं घोषवाक्य आहे 'सबका साथ सबका विकास' यात कुठं धर्माची गोष्ट आली? बिलकुल नाही. असं अजिबात मानलं नाही. आपण भारतीयांनी एक राहिलं पाहिजे. तसंच आपल्या भारताची संस्कृती वसुधैव कुटुंबकम् अशी आहे. त्यामुळे त्यावर बोलणं चुकीचं आहे." 
 
पण भाजपचे नेते सातत्यानं अशी वक्तव्य करतात तेव्हा तुम्हाला भाजप नेत्यांच्या उक्ती आणि कृतीत फरक दिसत नाही का? यावर बोलताना ते म्हणाले, "ती भाजप नेत्यांची स्वत:ची बाब आहे, मी त्याचं उत्तर देऊ शकत नाही."
 
आपल्या संतांनी समानतेची, महिलांना सन्मान देण्याची शिकवण दिली आहे. तुम्हीही अध्यात्मिक गुरू आहात. मात्र नरेंद्र मोदी ट्विटरवर महिलांबद्दल अपशब्द काढणाऱ्यांना फॉलो करतात, हे तुम्हाला विरोधाभासी वाटत नाही का? याचं उत्तर देताना जयसिद्धेश्वर म्हणतात की, "आता परवाच अलाहाबादमध्ये कुंभमेळा झाला. तिथं साफसफाई करणारे अनेक लोक होते. तिथल्या एका महिलेचे पाय धुवून मोदींनी आपण महिलांचा सन्मान करतो हेच दाखवून दिलं ना?"
 
उत्तर प्रदेशातील खासदार सावित्रीबाई फुले यांनी भाजप दलितविरोधी आहे, संविधानाच्याविरोधात आहे, असा आरोप करत भाजपला रामराम ठोकला. त्यांनी काँग्रेसचं तिकीट घेतलं. मग तुम्ही आता वंचितांचं प्रतिनिधीत्व करताय, तर मग तुम्ही याकडे कसं बघता? या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले की, "मी तो विषय कधी वाचलेला नाही किंवा पाहिलेला नाही. त्यामुळे मी यावर बोलू शकत नाही."
 
तुम्ही लिंगायत समाजाचे धर्मगुरू म्हणून काम करता. पण सोलापुरातून तुम्ही अनुसुचित जातीसाठी राखीव असलेल्या जागेवरून लढत आहात, मग तुमची या निवडणुकीतील नेमकी ओळख काय आहे? लिंगायत समाजाचे धर्मगुरू की वंचितांमधून पुढं आलेलं नेतृत्व? या प्रश्नावर ते म्हणाले, "तुम्ही एकच गोष्ट फिरवून फिरवून विचारत आहात. थोडं विकासावरही बोलू. त्यावरही विचार करू. इथून पलायन करणाऱ्या तरूणांना इथंच रोजगार कसा मिळेल हे बघू. मी धर्म, जातीच्या आधाराला मानत नाही. ही जागा राखीव आहे याचा अर्थ असा नाही की त्याभोवतीच फिरायला पाहिजे."
 
कोण आहेत जयसिद्धेश्वर स्वामी?
63 वर्षाच्या जयसिद्धेश्वर स्वामी यांचा जन्म सोलापूर जिल्ह्यात झाला आहे. त्यांनी 1978-79 मध्ये बनारस हिंदू विद्यापीठातून कला शाखेत पदवी घेतली.
 
त्यानंतर 1989 साली त्यांनी बनारस विद्यापीठातून पीएचडी पूर्ण केली. वीरशैव तथा काश्मीर शैवदर्शन मोक्षाचं चिंतन हा त्यांचा विषय होता.
 
जून 1989 मध्ये त्यांनी गुरूसिद्धमल्लेश्वर कल्याण केंद्र ट्रस्टची स्थापना केली. त्या माध्यमातून शैक्षणिक आणि सामाजिक आणि शेती क्षेत्रात कामाला सुरूवात केली.
 
1991ला त्यांनी सोलापूर जिल्ह्यातील गौडगाव इथं जगद्गुरूपंचाचार्य प्रशाला सुरू केली. त्यानंतर अक्कलकोट शहरात बीबीए, बीसीए, पब्लिक स्कूलची स्थापना केली.
 
पशुपालन आणि गोपालनाच्या क्षेत्रातही जयसिद्धेश्वर स्वामी यांनी मोठं काम केलं.
 
दक्षिण सोलापूर आणि परिसरात त्यांचा मोठा भक्त परिवार आहे. लिंगायत समाजात त्यांना मान्यता आहे. तसंच सोलापूर जिल्ह्यातील राजकीय नेत्यांची उठबस असते.
 
सोलापूर मतदारसंघ महत्त्वाचा का?
सोलापूर लोकसभा मतदारसंघ हा अनुसुचित जातींसाठी राखीव आहे. 1952 पासून केवळ तीनवेळा या मतदारसंघात भाजपनं बाजी मारली आहे.
माजी केंद्रीयमंत्री सुशीलकुमार शिंदे हे 1998 आणि 2009 अशा दोनवेळा सोलापुरातून लोकसभेवर निवडून गेले आहेत.
 
गेल्या निवडणुकीत तशाअर्थी नवखा उमेदवार मानल्या जाणाऱ्या शरद बनसोडे यांनी दीड लाखांहून अधिक मतांनी शिंदेंचा पराभव केला होता.
 
या मतदारसंघात दलित आणि मुस्लिम मतदारांचा वरचष्मा आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकर यांनी सोलापूर मतदारसंघाची निवड केली आहे.
 
देशभरात दलित आणि मुस्लिम समुदाय अस्वस्थ असल्याचा आरोप होत असतानाच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेसमधील दलित चेहरा अशी ओळख असलेले सुशीलकुमार शिंदे यांनी इथून लढणं आणि त्याला लिंगायत समाजाच्या धर्मगुरूंचं आव्हान हे प्रतिकात्मक मानलं जात आहे.

अभिजित करंडे