रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By

अमेरिकेत व्हर्जिनियामध्ये शासकीय इमारतीत गोळीबार, 11 ठार

अमेरिकेतल्या व्हर्जिनियामध्ये एका शासकीय इमारतीत झालेल्या गोळीबारात 11 जणांचा मृत्यू झाला आहे. तर सहा लोक जखमी झाल्याचं स्थानिक पोलिसांनी सांगितलं आहे.
 
या शासकीय इमारतीत काम करणाऱ्या एका इसमाने हा बेछूट गोळीबार केला आहे. या व्यक्तीची ओळख पोलिसांनी सार्वजनिक केलेली नाही. पोलिसांशी झालेल्या चकमकीत या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.
 
स्थानिक वेळेनुसार शुक्रवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास हा सगळा प्रकार घडला आहे.
 
पोलीस प्रमुख जेम्स सेरेवा यांनी दिलेल्या माहितीनुसार या व्यक्तीने पोलिसांवरही गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात या व्यक्तीचा मृत्यू झाला. जखमी झालेल्या सहा जणांमध्ये एका पोलीस अधिकाऱ्याचा समावेश असल्याचं पोलिसांनी सांगितलं.
 
पोलिसांच्या मते एकाच व्यक्तीने गोळीबार केला असून या हल्ल्यामागचं उद्दिष्ट स्पष्ट नसल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.
 
"व्हर्जिनिया बीच शहरासाठी हा सगळ्यांत काळा दिवस आहे," असं महापौर रॉबर्ट डायर यांनी सांगितलं.
 
या घटनेनंतर आजूबाजूला असलेल्या शासकीय इमारती रिकाम्या करण्यात आल्या आणि तिथल्या लोकांना सुरक्षित स्थळी नेण्यात आलं.
 
आजूबाजूला गोळीबाराचा आवाज ऐकला मात्र ती जागा इतक्या जवळ असेल याची कल्पना नव्हती, असं तिथल्या एका कर्मचाऱ्याने AP या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं.
 
व्हर्जिनियाचे गव्हर्नर राल्फ नॉर्टन यांनी हा दिवस अत्यंत दु:खद असल्याचं म्हटलं आहे. "या हल्ल्यात ठार झालेल्या व्यक्तींबद्दल आणि त्यांच्या कुटुंबीयांबरोबर माझ्या संवेदना आहेत." असं त्यांनी ट्विटरवर लिहिलं आहे.
 
अमेरिकन प्रसारमाध्यमांच्या मते FBI घटनास्थळी असून ते स्थानिक प्रशासनाला मदत करत आहेत.