गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Updated : शुक्रवार, 3 मे 2019 (11:01 IST)

फॉनीः ओडिशा किनाऱ्यावर थडकलं चक्रीवादळ, हजारोंना सुरक्षितस्थळी हलवलं

सकाळी साडेआठच्या सुमारास फॉनी (किंवा फानी) चक्रीवादळ ओडिशाच्या किनाऱ्यावर धडकलं आहे. सतर्कतेचा इशारा म्हणून आधीच हजारो लोकांना पूर्व किनाऱ्यावरील खेड्यांमधून हलवण्यात आलं आहे.
 
200 किमी प्रतितास वेगाने येत असलेलं चक्रीवादळ शुक्रवारी सकाळी 8 वाजता धडकलं, असं भारतीय हवामान खात्याने सांगितलं आहे. पुढच्या दोन तासांत, म्हणजे साधारण 10.30 वाजेपर्यंत हे चक्रीवादळ मुख्य भूभागावरून पुढे सरकेल, असंही सांगण्यात आलं आहे.
 
ओडिशाची राजधानी भुवनेश्वरमध्ये ताशी 50 किमीचे वारे वाहत असून पावसाच्या सरीही पाहायला मिळत आहे. सावधानतेचा इशारा म्हणून भुवनेश्वर विमानतळ मध्यत्रीपासून बंद करण्यात आलं आहे. तसंच ओरिसा सरकारने पूर्व किनाऱ्यावरील दोन महत्त्वाच्या बंदरातील कामकाज थांबवलं आहे.
 
आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूमध्येही हाय अलर्ट देण्यात आला आहे.
 
आतापर्यंत 8 लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलवल्याचं अधिकाऱ्यांनी बीबीसीला सांगितलं आहे. फॉनीच्या मार्गात असणाऱ्या पुरी शहरात जवळपास एक लाख लोक राहातात. पुरीमध्ये 858 वर्षं जुनं जगन्नाथाचे मंदिर असून त्याचंही नुकसान होण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे.
 
गेल्या तीन दशकांमध्ये भराताच्या पूर्व किनाऱ्यावर येणारे हे चौथं चक्रीवादळ आहे.
 
2017 आली आलेल्या ओखी चक्रीवादळामुळे 200 लोकांचे प्राण गेले होते आणि शेकडो लोकांना विस्थापित व्हावं लागलं होतं. तसंच गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात आलेल्या एका चक्रीवादळामुळे हजारो लोकांना सुरक्षित स्थळी हलवावं लागलं होतं.
कोणत्या परिसराला तडाखा बसेल?
सध्या फॉनी आंध्र प्रदेशच्या पूर्वेस बंगालच्या उपसागरातून वाहात आहे. चक्रीवादळामुळे अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाल्यामुळे मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये, असा इशारा नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटीने आधीच दिला होता.
 
या चक्रीवादळांमुळे घरांचं पूर्ण नुकसान होऊ शकतं, अशी भीती NDMAने व्यक्त केली आहे.
 
एकदा किनाऱ्यावर थडकल्यावर चक्रीवादळ क्षीण होऊन शनिवारी बांगलादेशच्या चितगाँवच्या दिशेने सरकेल. या चक्रीवादळामुळे मोठ्या लाटा आल्यामुळे बांगलादेशात पूरस्थिती येण्याची शक्यताही वर्तवली आहे.
 
बांगलादेशातील कॉक्स बझार या किनारी शहरामध्ये लाखो रोहिंग्या राहात असून त्यांनाही सावधगिरीचा आदेश देण्यात आला आहे. परंतु चक्रीवादळाने मार्ग बदलल्याशिवाय रोहिंग्यांच्या छावणीला तडाखा बसेल असं वाटत नाही. हे रोहिंग्या बांबू आणि प्लास्टिकच्या झोपड्यांमध्ये राहात आहेत.
 
त्यांना थोडं अधिक संरक्षण मिळावं यासाठी चक्रीवादळाचा हंगाम पाहून इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ रेड क्रॉस अँड रेड क्रिसेंट सोसायटीने रोहिंग्यांना फेब्रुवारी महिन्यात ताडपत्रीचं वाटप केलं होतं.
 
कशी केली भारताने तयारी?
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार 850 आश्रय छावण्या तयार केल्या असून त्यामध्ये 10 लाख लोकांना आश्रय देता येईल. NDRF, तटरक्षक दल, नौदल तैनात करण्यात आलं आहे. विशाखापट्टणम आणि चेन्नईजवळ पाणबुडे आणि डॉक्टरांसह दोन जहाजे सज्ज ठेवण्यात आली आहेत.
 
किनारी प्रदेशातील 81 रेल्वेगाड्या रद्द केल्याचं वृत्त स्थानिक माध्यमांनी प्रसिद्ध केलं आहे.
 
या निवडणुकीच्या कालावधीत सरकारी अधिकारी मदतकार्यात भाग घेऊ शकतात, असं निवडणूक आयोगाने जाहीर केलं आहे.
 
गेल्या महिन्याभरापासून देशात मतदान प्रक्रिया सुरू आहे. आता निवडणुकांचा अगदी मधला कार्यकाळ सुरू आहे. मे महिन्यात इतरत्र मतदान होत असलं तरी ओडिशामधील मतदान प्रक्रिया आधीच संपली आहे. मात्र झालेल्या मतदानाच्या मतपेट्या सुरक्षित राहाव्यात, म्हणून स्ट्राँगरूम्सचं संरक्षण वाढवण्यात आलं आहे.