शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By

'तिच्यासोबत संभोग म्हणजे मारामारीच होती,' लैंगिक हिंसाचाराच्या जोखडात अडकलेल्या काँगोची गोष्ट

डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ काँगोमध्ये लैंगिक हिंसाचाराचा दर जगात सर्वाधिक आहे. मात्र, आता एका नव्या दृष्टीकोनातून या समस्येचा सामना करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. यात पुरुषांनाच त्यांच्या विषारी पौरुषत्वाला सामोरं जाऊन स्वतःच प्रश्न उपस्थित करण्यासाठी प्रेरित करण्यात येत आहे.
 
मॉईझेस बॅगविझा डीआर काँगोतल्या अशाच विषारी पौरुषत्वाला बळी पडलेल्या हजारो पुरुषांपैकी एक आहेत. मात्र, आता त्यांना त्यांच्या कृतीचा पश्चाताप होतोय. ते त्यांची बायको ज्युलिएनला ज्या पद्धतीने वागवायचे, तिच्यावर बलात्कार करायचे, याचं वर्णन अंगावर काटा आणतो. ते म्हणतात, "तिच्यासोबत संभोग म्हणजे मारामारीच होती. तिने काय घातलंय याचा मी विचारच करायचो नाही. मी फक्त ते फाडायचो."
 
पूर्व काँगोतल्या रुत्शुरु गावात त्यांचं एक साधारण घर आहे. तिथेच ते बोलत होते. मॉईझेस यांनी त्यांची बायको चार महिन्यांची गर्भवती असतानाची एक आठवण सांगितली.
 
"मी वळलो आणि तिच्या पोटावर एक हलकी किक मारली", ते सांगत होते. या किकने त्यांची बायको जमिनीवर कोसळली. तिला रक्तस्राव सुरू झाला. आरडाओरड ऐकून शेजारी धावले आणि त्यांनीच तिला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. तिचा गुन्हा काय होता? तर घरखर्चासाठी ती एका स्थानिक महिलेजवळ चोरून पैसे जमा करत होती. त्यांनी तिला शूज घेण्यासाठी पैसे मागितले आणि तिने नकार दिला. याचा संताप अनावर झाल्याने त्यांनी तिच्या पोटावर लाथ मारली होती.
 
कणखर, भावनांचं प्रदर्शन न करणारा, कुटुंबाचं रक्षण आणि त्यांचं भरणपोषण करणारा म्हणजे पुरूष, याच संस्कारात गेली अनेक शतकं मुलांची जडणघडण होत आली आहे. मात्र, काळानुरूप दोघांच्याही भूमिका बदलत चालल्या आहेत. स्त्रिया अधिकाधिक सक्षम होणं आणि त्यासोबतच पुरूषांमध्ये बेरोजगारीचं प्रमाण वाढणं, यामुळे पुरूष असण्याच्या या पारंपरिक मूल्यांना जपणं पुरूषांसाठी कठीण होत आहे. आणि बॅगविझासारख्या काही पुरुषांना आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र स्त्री म्हणजे जणू त्यांच्या अस्तित्वालाच धोका वाटतात.
 
एक स्थानिक बिल्डर आहेत. ते सांगतात, हिंसा हाच बायकोशी संवाद साधण्याचा एकमेव मार्ग आहे, असं त्यांना वाटायचं. "मला वाटायचं तिच्यावर माझी मालकी आहे", ते सांगत होते. "तिच्यासोबत वाट्टेल ते मी करू शकतो, असं मला वाटायचं. मी घरी आल्यावर तिने माझ्याकडे काही मागितलं की मी तिला मारझोड करायचो."
 
पौरुषत्वाच्या 'अपयशाची' भरपाई
बॅगविझा यांच्यासारखे अनेक आहेत. जगभरात सर्वाधिक बलात्कार होणाऱ्या देशांमध्ये डीआर काँगोचा क्रमांक वरचा आहे. American Journal of Public Health या मासिकाने केलेल्या सर्वेक्षणानुसार काँगोमध्ये दर तासाला जवळपास 48 स्त्रियांवर बलात्कार होतात.
 
अभ्यासकांच्या मते काँगोच्या पूर्व भागात अनेक वर्षांपासून सुरू असलेला संघर्ष इथल्या बलात्काराच्या समस्येसाठी कारणीभूत आहे. इथले बंडखोर स्त्रियांवर बलात्कार आणि लैंगिक गुलामगिरी, याचा युद्धातील शस्त्र म्हणून वापर करतात. मात्र, डीआर काँगोमध्ये Congo Men's Network (Comen) या स्वयंसेवी संस्थेची स्थापना करणारे इलॉट अल्फोन्से यांच्या मते काँगोमधल्या या समस्येचे मूळ अधिक खोलवर रुजलेलं आहे.
 
"आपण लैंगिक हिंसाचाराचा केवळ सैन्य संघर्ष एवढ्याच संदर्भात विचार करतो तेव्हा आपण थोडं चुकतो." ते पुढे म्हणतात, "स्त्री आपली गुलाम आहे, अशाच पद्धतीने तिला वागवतात, हे वंशपरंपरेने आपल्यात बिंबवलं गेलं आहे. पुरुषांना माहितीय त्यांना सदासर्वकाळ संभोग करण्याचा अधिकार आहे. काँगोतल्या पुरुषांना असलेली सत्ता आणि पदाची लालसा, हेच लैंगिक हिंसाचाराचं मूळ कारण आहे."
 
चर्चेत स्त्रियांचा सहभाग
दक्षिण आफ्रिकेतल्या Justice and Reconsiliation (IJR) संस्थेतल्या प्रकल्प अधिकारी डॅनिअल हॉफमिस्टर यांनाही स्त्रियांचा सहभाग महत्त्वाचा वाटतो. त्यांच्या मते लैंगिक हिंसाचार हा मुलं म्हणून पुरुषाला समाजात मिळणारं स्थान आणि पौरुषत्वाचे आफ्रिकन परंपरेतले जे कठोर नियम आहेत, त्यांचं पालन न करण्याची त्यांची क्षमता याच्याशी जोडला आहेत.
 
"परंपरेनुसार कुटुंबाचं भरणपोषण करणं, ही पुरुषाची जबाबदारी सांगण्यात आली आहे. यालाच पौरुषत्व मानलं जातं. मात्र, यात अपयशी ठरत असल्याने त्या पौरुषत्वाची भरपाई म्हणून अनेक पुरूष अधिक आक्रमक आणि हिंसक होत आहेत."
 
अल्फोन्से सांगतात ते स्वतः गुन्हेगार आणि पीडित दोन्ही आहेत. "शाळेत आम्हाला मारझोड व्हायची. घरी आम्हाला मारझोड व्हायची आणि गावात आम्ही मारामारीचा खेळ खेळायचो." अल्फोन्से सांगतात आम्हीच ही हिंसा आत्मसात केली आणि नंतर हीच हिंसा आमच्या संवादाचं माध्यम बनली.
 
"कधीकधी मी माझ्या प्रेयसीला मारायचो आणि मग तीच माफी मागायची. मला आठवतं, आम्ही लहानच होतो तेव्हा एक दिवस माझं माझ्या बहिणीशी भांडण झालं आणि मी तिच्यावर चाकू भिरकावला." आफ्रिकेतल्या काही भागात लैंगिक हिंसाचार रोखण्यासाठी जे बलात्कारविरोधी उपक्रम हाती घेण्यात आले आहेत त्याच्या केंद्रस्थानी बलात्कार पीडित स्त्रीच आहे. मात्र, यात जे गुन्हेगार आहेत त्या पुरुषांना सहभागी करून घेण्यात आलेले नाही.
 
अल्फोन्से म्हणतात, या उपक्रमांमुळे आजाराची लक्षणं कळतील. मात्र, आजाराच्या मूळ कारणावर उपचार होणार नाही. "लिंगभेदावर आधारित हिंसाचाराविरोधात आम्ही लढा देत आहोत", ते सांगतात. "समस्येच्या निवारणासाठी या समस्येचा भाग असलेले पुरूष आणि तरुण यांना सहभागी करून घ्यावं लागेल. समाजात पुरूषांचं वर्चस्व आहे. त्यामुळे या लढ्यात त्यांना सहभागी करून घेतल्यास समाजात बदल घडवण्यासाठी त्यांना वाव मिळेल." हेच अल्फोन्से आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी करून दाखवलं आहे. यासाठी त्यांनी 'बराझा बदिलिका' उघडल्या आहेत. प्राचीन काळात बैठकीचं ठिकाण म्हणजे 'बराझा बदिलिका'. या ठिकाणी एक प्रकारची ग्रामसभा भरायची. गावातली कुठलीही समस्या सोडवण्यासाठी पुरुषमंडळी इथं एकत्र येत असत.
 
गावात भांडणतंटे वाढू लागले तशा या जागा नाहीशा झाल्या. त्यामुळे तरुण मुलांसमोर तंटा सोडवणारे रोल मॉडेल राहिलेच नाहीत, असं अल्फोन्से सांगतात. पारंपरिक 'बराझा बदिलिका'मध्ये केवळ पुरूषांच्या बैठका व्हायच्या. मात्र, 21व्या शतकातल्या या 'बराझा बदिलिका'मध्ये अधिकाधिक नेतृत्व स्त्रियांना सोपवण्यात आलं आहे. अल्फोन्से सांगतात, "अशा ठिकाणांवर आता स्त्रियांनी ताबा मिळवण्याची वेळ आली आहे."
 
'नवऱ्यांमध्ये होतोय बदल'
बराझामध्ये दर आठवड्याला जवळपास वीस माणसं भेटतात. जवळपास दोन तास चर्चा होते आणि यातून सकारात्मक पौरुषत्व, स्त्री-पुरूष समानता आणि पितृत्व याविषयीची माहिती दिली जाते.
 
एक पुरूष आणि एक महिला यांच्या निरीक्षणाखाली ही कार्यशाळा घेतली जाते. ते सिनेमा, सचित्र पुस्तकं आणि मानसशास्त्रीय सत्र या माध्यमातून बलात्कार करणाऱ्या गुन्हेगारांच्या 'मेंदूत प्रकाश टाकण्याचं' काम करतात. अल्फोन्से म्हणतात या कार्यशाळेत सहभागी झाल्यानंतर आपल्या नवऱ्यांमध्ये बरेच बदल झाल्याचं बहुतांश स्त्रिया सांगतात.
 
"त्या म्हणतात - आम्ही इमामांकडे गेलो, पादऱ्यांकडे गेलो, वेगवेगळ्या धर्मगुरूंकडे गेलो. मात्र नवऱ्यात काहीच बदल झाला नाही. त्यांना अनेकदा अटक होऊनही ते बदलले नाही. मात्र, आता अचानक ते अहिंसक झाल्याचं आणि वेळेत घरी येत असल्याचं आम्ही बघतोय." आपल्या गर्भार बायकोच्या पोटात लाथ घालणारे बॅगविझा यांनीही एक मोठा टप्पा पार केला आहे.
 
ते म्हणतात, "100% नक्कीच नाही. शेवटी आपण मनुष्य प्राणी आहोत. मात्र, अनेक गोष्टी आश्चर्यकारकरित्या बदलल्या आहेत. आता आम्हा दोघांमध्ये योग्य पद्धतीने बातचीत होते आणि आमचे लैंगिक संबंधही खूप सुधारले आहेत."
 
अल्फोन्से यांना सकारात्मक पौरुषत्वाचं तत्वज्ञान डीआर कांगोतल्या प्रत्येक पुरूषापर्यंत पोहोचवायचं आहे. "देशातून सर्व प्रकारचा हिंसाचार संपुष्टात आल्याचं आम्हाला बघायचं आहे. ते आमचं स्वप्न आहे", अल्फोन्से सांगतात. "तरच आम्ही हा देश स्त्री, पुरूष, मुलगा, मुलगी सर्वांना जगण्यासाठीचं सुंदर ठिकाण बनवू शकतो."