शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By

बुरखा घालून काँग्रेससाठी मतदानाला गेलेल्या तरुणाच्या व्हायरल फोटोचे सत्य : बीबीसी फॅक्ट चेक

सोशल मीडियावर सध्या बुरखा घातलेल्या दोन तरूणांचा फोटो व्हायरल होत आहे. हे दोन तरूण काँग्रेसचे कार्यकर्ते असून मतदानामध्ये फेरफार करण्यात गुंतले असल्याचा दावा सोशल मीडियावर केला जातोय.
 
29 एप्रिलला लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा पार पडल्यानंतर हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला जाऊ लागला. काँग्रेसचा कार्यकर्ता बुरखा घालून शमिना या नावानं बनावट मत देत आहे, असं या फोटोच्या कॅप्शनमध्ये म्हटलं आहे.
 
उजव्या विचारसरणीच्या फेसबुक पेजेसवर हा फोटो मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात आहे. Narendra Modi for 2019 PM या फेसबुक पेजवर हा फोटोला 9,200 पेक्षा अधिक शेअर केलेला दिसत आहेत. मागेही एकदा फेसबुकवर हा फोटो मोठ्या प्रमाणात शेअर झाला होता. बीबीसीच्या वाचकांनीही व्हॉट्स अॅपवर हा फोटो पाठवून तो खरा आहे का, याची विचारणा केली आहे.
 
फोटोचं वास्तव
सोशल मीडियावर शेअर होणारा हा फोटो खरा नसल्याचं बीबीसीच्या पडताळणीत आढळून आलं आहे. मोदींना आव्हान देणारे अजय राय काँग्रेसविरोधात बोलत आहेत? फॅक्ट चेक सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीशी या फोटोचा काहीही संबंध नाही. हा फोटो 2015 सालचा आहे.
 
चर्चेतील फोटो
या फोटोची सत्यता तपासण्यासाठी आम्ही रिव्हर्स इमेज सर्चचा वापर केला. तेव्हा हा फोटो ऑक्टोबर 2015 साली प्रसिद्ध झालेल्या चार बातम्यांमध्ये छापून आल्याचं स्पष्ट झालं.
 
'स्कूपव्हूप'च्या वृत्तानुसार ही बातमी 1 ऑक्टोबर 2015 ला प्रसिद्ध झाली होती. फोटोतील व्यक्ती आरएसएसचा कार्यकर्ता असल्याचा संशय होता. उत्तर प्रदेशमधील आझमगढ जिल्ह्यातील मंदिरात गोमांस टाकताना त्याला पकडण्यात आलं होतं.
 
या बातमीचा मथळा होता - या फेसबुक पोस्टमधून बुरख्याआडून मंदिरात गोमांस टाकणाऱ्या आरएसएसच्या कथित कार्यकर्त्याचं बिंग फुटलं आहे. अन्य ठिकाणी प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार त्यावेळी बुरखा घातलेल्या या कार्यकर्त्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. मात्र नंतर या घटनेशी संबंधित सर्व ट्वीटस आणि फेसबुक पोस्ट काढून टाकण्यात आले. बुरख्यामधील व्यक्ती ही खरंच आरएसएसचाच कार्यकर्ता आहे का, याची पडताळणी बीबीसीनं स्वतंत्रपणे केलेली नाही. पण या संबंधीच्या जुन्या बातम्या विचारात घेतल्या तर सध्या व्हायरल होत असलेल्या या दोन फोटोंचा 2019 च्या लोकसभा निवडणुकीशी काहीही संबंध नसल्याचं स्पष्ट होत आहे.
 
या फोटोविषयीचे इतर दावे
11 एप्रिलला लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचं मतदान पार पडल्यानंतरही हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यावेळी काही फेसबुक पेजेसवर हा फोटो उत्तर प्रदेशमधील मुझफ्फरनगरमधला असल्याचा दावा करण्यात आला होता. तर काही पेजेसवर हा फोटो सहारणपूरमधला असल्याचं म्हटलं होतं. अर्थात, त्यावेळी या फोटोसंबंधी केलेला दावा एकदम वेगळा होता. "मुस्लिम महिलांचा बुरखा घालून मतदानासाठी निघालेल्या भाजप कार्यकर्त्यांना रंगेहाथ पकडण्यात आलं आहे," असा मथळा त्यावेळी होता. सोशल मीडियावर काँग्रेस कार्यकर्त्यांचा म्हणून व्हायल होणारा हा फोटो बीबीसीच्या पडताळणीमध्ये खरा नसल्याचं समोर आलं आहे.