Love story : त्याच्या प्रेमासाठी 'ती' 10 वर्ष एका खोलीत कैद्यांसारखी राहिली

love
Last Modified शुक्रवार, 11 जून 2021 (13:19 IST)
- इम्रान क़ुरैशी
केरळच्या पालक्कड जिल्ह्यात एका गावामध्ये कौलांच्या एका लहानशा घराच्या छोट्याशा खोलीत एक तरुणी तब्बल दहा वर्ष कोंडलेली राहिली. पण त्यासाठी तिच्यावर बळजबरी किंवा छळ केला जात नव्हता आणि तिला कोणी शिक्षाही दिलेली नव्हती. उलट एवढी वर्षं एका छोट्याशा खोलीत कोंडून राहिल्यानंतरही ती आनंदीच होती.
हे ऐकायला जरा वेगळं वाटतं आणि याबाबत तुम्ही काही तर्क वितर्क लावण्याआधी हेही सांगायला हवं की ती मुलगी मानसिक रुग्ण किंवा वेडी नव्हती. एका तरुणाच्या प्रेमामध्ये मात्र, ती वेडी झाली होती, असं नक्की म्हणता येऊ शकतं.

पालक्कड जिल्ह्यातील नेनमारा या लहानशा गावातील रेहमान आणि संजिता यांची कहाणी ऐकल्यानंतर, पोलिसांनाही तसंच वाटलं.

रेहमान हा आता 32 वर्षांचा आहे आणि संजिता ही 28 वर्षांची आहे.
बीबीसी हिंदीशी बोलताना नेनमारा येथील पोलीस निरीक्षक दीपक कुमार यांनी सांगितलं की, ''आम्ही दोघांची वेगवेगळी चौकशी केली आणि त्यात त्यांनी जे काही सांगितलं ते अगदी तंतोतंत सारखंच होतं. त्यात काहीही फरक नव्हता. दोघांचं एकमेकांवर अपार प्रेम असून, असं काहीही आढळलं नाही ज्यावर शंका येऊ शकेल."

अशी समोर आली 'प्रेमकहाणी'
रेहमानच्या भावानं जवळच असलेल्या विथुनास्सेरी या गावामध्ये त्यांना पाहिलं आणि त्यानंतर त्यांची ही प्रेमकहाणी सर्वांसमोर आली. भावानं त्यांना पाहिल्यानंतर लगेचच वाहतूक पोलिसांना सांगितलं की, रेहमानच्या आई-वडिलांनी तो बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांत दाखल केली आहे.
रेहमान हा तीन महिन्यांपूर्वी आई-वडिलांच्या घरातून बेपत्ता झाला होता. त्याच्या भावानं त्याला पाहिलं ते विथुनास्सेरी गाव त्यांच्या नेनमारा गावापासून अवघ्या आठ किलोमीटरच्या अंतरावर होतं.

भावानं दिलेल्या माहितीनंतर, पोलिसांनी रेहमानला अडवलं आणि पोलिस ठाण्यात घेऊन आले. त्यानंतर रेहमाननं त्याची संपूर्ण कहाणी सांगितली.

रेहमान आणि संजिता एकमेकांचे शेजारी होते. दोघांचं एकमेकांवर प्रेम जडलं होतं. त्यामुळं 2 फेब्रुवारी 2010 मध्ये संजिता अयिलुरच्या करातपरांबू येथील रेहमानच्या आई-वडिलांच्या घरी राहायला आली. त्यानंतर संजिताच्या कुटुंबीयांनी ती हरवल्याची तक्रारही पोलिसांत दाखल केली होती, पण तिचा काहीही थांगपत्ता लागला नाही.
पोलिसांनी त्यावेळी या प्रकरणी अनेकांची चौकशी केली होती. त्यामध्ये रेहमानचाही समावेश होता. रेहमान हा इलेक्ट्रीशियन असून तो पेंटिंगची कामंही करतो. तो कामाच्या निमित्तानं बाहेरही जातो, पण फार क्वचित. त्याचे आई-वडील मजूर म्हणून रोजंदारीच्या कामासाठी रोज बाहेर जातात.

संजिता जगली कशी?
पोलिस अधिकाऱ्यानं सांगितलं की, "रेहमान रोज किचनमधून जेवण घेऊन संजिता असलेल्या त्याच्या खोलीत जात होता. त्यानंतर तो आतून दार लावून घ्यायचा. याच पद्धतीनं तो रोज संजिताला जेवण देत होता."
पोलिसांच्या रिपोर्टमध्ये नोंदवलेल्या माहितीनुसार, घरातलं कोणीही रेहमानच्या खोलीकडं जायचं तेव्हा तो खूप चिडायचा. त्याची खोली कायम बंद राहायची. अगदी रेहमान आत असेल तेव्हाही ती खोली बंदच असायची.

दीपक कुमार यांनी सांगितलं की, "संजिता जेव्हा रेहमानचे आई-वडील झोपलेले असतील तेव्हाच बाथरूम आणि इतर दैनंदिन विधीसाठी जात होती. त्याचं घर फार मोठं नव्हतं. तीन बेडरूम असलेलं कौलाचं असं लहानसं त्यांचं घर होतं. पण ते काही वेळ बाहेरही बसायचे."
मात्र पोलिस निरीक्षक दीपक कुमार यांचं असंही म्हणणं आहे की, रेहमानच्या आई-वडिलांना एकाच घरात राहूनही संजिता त्यांच्या सोबतच राहत असल्याचं लक्षात कसं आलं नाही, हे एक गूढच आहे.

मार्च महिन्याच्या सुरुवातीला कुटुंबीयांना असं वाटलं की, रेहमान बेपत्ता झाला आहे, त्यामुळं त्यांनी पोलिसांत तक्रार दिली होती. पण दीपक कुमार यांनी सांगितलं की, "रेहमान पेंटिंगच्या कामासाठी गेला होता. आधी दोन महिने तो रोज कामासाठी बाहेर जात होता. यातून पैसे जमवल्यानंतर तो घरातून निघून गेला होता."
रेहमाननं आई-वडिलांचं घर सोडून वेगळं राहण्याचा निर्णय घेतला होता. त्यामागचं नेमकं कारण काय होतं, हे त्यानं सांगितलं नाही. मात्र संजिता आणि त्यानं दहा वर्षे अशी कैद्यासारखी का घालवली? याचं कारण मात्र त्यानं पोलिसांना सांगितलं.

काय होतं कारण?
पोलिसांच्या मते, रेहमान आणि संजिता यांचं एकमेकांवर प्रेम होतं, पण दोघांचे धर्म वेगवेगळे असल्यामुळं कुटुंबीय परवानगी देणार नाही, अशी भीती त्यांना होती. त्यामुळं त्यांनी जवळपास दहा वर्ष सर्वांपासूनच हे लपवून ठेवलं होतं.
रेहमान आणि संजिता दोघंही बेपत्ता असल्याची तक्रार त्यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांत केलेली होती. त्यामुळं पोलिसांनी दोघांनाही कोर्टासमोर हजर केलं. पण त्यांची संपूर्ण कहाणी ऐकल्यानंतर कोर्टानंही त्यांना मुक्त केलं. मात्र या सर्वानंतर रेहमान आणि संजितानं माध्यमांशी बोलायला नकार दिला आहे.

यावर अधिक वाचा :

नव्या वर्षीच सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा सुरू होणार

नव्या वर्षीच सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा सुरू होणार
येत्या ३१ डिसेंबर पर्यंत प्रवाशांना लोकलने प्रवास करता येणार नाही. नव्या वर्षीच ...

सर्व शासकीय रुग्णालयांमधील रुग्णांना मोफत रक्त मिळणार

सर्व शासकीय रुग्णालयांमधील रुग्णांना मोफत रक्त मिळणार
राज्यात शनिवार १२ डिसेंबरपासून सर्व शासकीय रुग्णालयांमधील रुग्णांना मोफत रक्त मिळणार ...

जेजुरीच्या खंडोबा देवाची सोमवती अमावस्या यात्रा रद्द

जेजुरीच्या खंडोबा देवाची सोमवती अमावस्या यात्रा रद्द
कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जेजुरीच्या खंडोबा देवाची सोमवती अमावस्या यात्रा रद्द ...

आयएमएकडून आज राष्ट्रव्यापी बंद, रुग्णांची मोठी गैरसोय ...

आयएमएकडून आज  राष्ट्रव्यापी बंद, रुग्णांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता
केंद्र सरकारने आयुर्वेदाचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अॅलोपॅथिक शस्त्रक्रियांची ...

जुनी पेन्शन योजना लागू होण्यास अडथळा असणारी अधिसूचना रद्द

जुनी पेन्शन योजना लागू होण्यास अडथळा असणारी अधिसूचना रद्द
जुनी पेन्शन योजना लागू होण्यास अडथळा असणारी १०जुलै २०२०ची अधिसूचना रद्द करण्याच्या ...