रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By

भला मोठा चालणारा मासा: चार पायांच्या व्हेल माशाचे सापडले अवशेष

चार पाय असणाऱ्या प्राचीन व्हेलचे (देवमासा) अवशेष पेरूमध्ये सापडले आहेत.

या माशाच्या पायाची बोटं एकमेकांना चिकटलेली होती आणि त्यांचा आकार खुरांसारखा होता. हा प्राणी सुमारे 4 कोटी 30 लाख वर्षांपूर्वी पृथ्वीवर वास्तव्यास होता.
 
2011 साली सापडलेल्या या जीवाश्माचा अभ्यास करून जीवाश्मतज्ज्ञांनी एक शोधनिबंध प्रसिद्ध केला आहे.
 
जीवाश्मतज्ज्ञांच्या मते हा पाण्यात जगणारा सस्तन प्राणी 4 मीटर लांब होता आणि त्याचं शरीर पाण्यात पोहण्यासाठी तसंच जमिनीवर चालण्याच्या दृष्टीने बनलं होतं.
 
त्याचे पाय त्याचं वजन उचलण्यासाठी सक्षम होते, तसंच त्याला एक शक्तिशाली शेपूटही होती. या देवमाशांच्या शरीररचनेमुळे त्यांची तुलना आजच्या जगातल्या पाणमांजरांशी होऊ शकते.
 
अभ्यासकांना असंही वाटतं की या शोधामुळे व्हेल माशांच्या उत्क्रांतीवर आणखी प्रकाश पडेल, तसंच त्यांची प्रजाती जगभरात इतरत्र कशी पसरली याचाही अभ्यास करता येईल.
 
"भारत आणि पाकिस्तानच्या बाहेर सापडलेला हा सगळ्यांत सुस्थितीतला चार पायांच्या व्हेलचा जीवाश्म आहे," असं रॉयल बेल्जियन इंस्टिट्यूट ऑफ नॅचरल सायन्सेस या संस्थेतले शास्त्रज्ञ आणि संशोधन लेखाचे सहलेखक डॉ. ऑलिव्हर लँबर्ट म्हणतात.
 
हे जीवाश्म पेरूच्या पॅसिफिक किनाऱ्यापासून 1 किलोमीटर आत समुद्राच्या गाळाने तयार झालेल्या प्रदेशात सापडले.
 
ज्या ठिकाणी हे जीवाश्म सापडले ते पाहून शास्त्रज्ञांना आश्चर्य वाटलं, कारण व्हेल माशांची पहिली उत्पत्ती 5 कोटी वर्षांपूर्वी दक्षिण आशियाच्या भागात झाल्याचं मानलं जातं.
 
जसजशी त्यांच्या शरीरात सुधारणा होत गेली, तसतसे हे मासे उत्तर आफ्रिका आणि उत्तर अमेरिका या भागात स्थलांतरित व्हायला लागले. आता तिथे त्यांचे जीवाश्म सापडत आहेत.
 
नव्याने सापडलेल्या या जीवाश्मांमुळे हे लक्षात येतं की व्हेल माशांना पोहून दक्षिण आशियातून दक्षिण अमेरिकेत स्थलांतर करणं शक्य झालं.
 
"व्हेल मासे उत्क्रांतीचं एक उत्तम उदाहरण आहेत," लंडनच्या नॅचरल हिस्ट्री म्युझिअममध्ये देवमाशांवर संशोधन करणारे ट्रॅव्हिस पार्क सांगतात.
 
"खुर असणाऱ्या छोट्या प्राण्यांपासून त्यांची उत्क्रांती आताच्या ब्लू व्हेलमध्ये झाली. त्यांचा महासागरावर सत्ता स्थापन करण्याचा इतिहास अतिशय उत्कंठावर्धक आहे.
 
पेरू, फ्रान्स, इटली, नेदरलँड आणि बेल्जियमच्या एका आंतरराष्ट्रीय टीमने 2011 मध्ये हा जीवाश्म उत्खनन करून शोधून काढला.
 
त्यांनी या जीवाश्माचं नाव 'पेरेगोसेक्टस पॅसिफिस' असं ठेवलं, ज्याचा अर्थ 'ती फिरणारी व्हेल जी पॅसेफिकला पोहचली,' असा होतो.