शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: मंगळवार, 14 मे 2019 (18:16 IST)

'नेवासेत ऑनर किलिंग, जेव्हा ते म्हणाले झाडाखाली दिसणारी आग ही तिची चिता आहे'

"त्या झाडाखाली आग दिसतीय ना, ती तिचीच चिता आहे. जा, बघ. हे मी ऐकलं आणि माझ्या पायखालची जमीनच सरकली. डोळ्यासमोर अंधारी आली. माझ्यासोबत काय होतंय हेच मला कळत नव्हतं," 30 वर्षांचे देवेंद्र कोठावळे सांगत होते.
 
अहमदनगर जिल्ह्यातल्या संगमनेरमध्ये राहणाऱ्या देवेंद्र यांनी काही दिवसांपूर्वीच प्रतिभाशी प्रेमविवाह केला होता. आंतरजातीय विवाहामुळे प्रतिभाच्या वडिलांचा (ब्रह्मदेव मरकड) या लग्नाला विरोध होता. त्यातून तिची हत्या करण्यात आली अशी फिर्याद देवेंद्र यांनी पोलिसात दिली आहे.
 
प्रतिभाची हत्या ही ऑनर किलिंग असल्याचं प्रथमदर्शनी पुराव्यावरून वाटतं, असं श्रीरामपूरचे अप्पर पोलीस अधीक्षक रोहिदास पवार यांनी बीबीसी मराठीला सांगितलं.
 
देवेंद्र यांच्याशी बीबीसी मराठीने संपर्क साधला आणि प्रकरणाची अधिक माहिती घेतली.
 
वैद्यकीय प्रतिनिधी (मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह) देवेंद्र यांची एका फार्मसीमध्ये काम करत असलेल्या प्रतिभाशी ओळख झाली. ओळखीचं रूपांतर मैत्रीत आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमात झाल्यावर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. पण लग्न करायचं म्हटलं तर आपली जात आडवी येईल याची त्यांना कल्पना आली. या लग्नाला प्रतिभाच्या कुटुंबीयांचा विरोध होता.
 
"...तरी प्रतिभाने आई-वडिलांचं मन वळवण्याचा खूप प्रयत्न केला. पण त्यांच्या घरच्यांचा विरोध कायम राहिला. मग आम्ही कोर्ट मॅरेज करण्याचा निर्णय घेतला त्याप्रमाणे आम्ही 1 एप्रिलला (2019) लग्न केलं," देवेंद्र सांगतात.
 
"चार-पाच दिवस प्रतिभाचा तिच्या घरच्यांशी संपर्क झाला नाही. 5-6 एप्रिलला त्यांनी तिच्याशी संपर्क साधून घरी ये असं म्हणायला सुरुवात केली. प्रतिभेला या गोष्टीचा त्रास होत होता. म्हणून तिने तिच्या कुटुंबीयांविरुद्ध तक्रार करायचं ठरवलं. 18 एप्रिल रोजी तिनं पोलिसांना एक पत्र लिहिलं. आम्ही ज्या पोलीस स्टेशनमध्ये गेलो ते पोलीस स्टेशन त्या हद्दीत नव्हतं आणि ते पत्र दुसऱ्या पोलीस स्टेशनला द्यायचं राहिलं. अजून ते पत्र माझ्या सॅकमध्येच आहे," देवेंद्र सांगतात.
 
पुढं ते सांगतात, "मग प्रतिभाच्या बहिणीने प्रतिभाशी संपर्क केला आणि वडील रीतसर लग्न लावून द्यायला तयार आहेत. पण एकदा तू घरी चल असं म्हणायला सुरुवात केली. तिची बहिण आमच्या घरी 21 एप्रीलला आली. दोन दिवस राहिली. वडिलांचं मन बदललं आणि ते दारात लग्न लावून द्यायला तयार आहेत, असं ती म्हणाली. 23 एप्रीलला तिच्या बहिणासोबत मी तिला माहेरी पाठवलं.
 
"23 एप्रीलला मी प्रतिभाला बोललो. आपल्या लग्नाचे फोटो वडिलांना दाखवायचे आहेत, असं ती म्हणाली. दुस-या दिवशी म्हणजेच 24ला रात्री ती बोलली. तिने मध्येच फोन कट केला आणि मला मेसेज केला. म्हणाली वडील आले आहेत मी नंतर बोलते. ते तिचं आणि माझं शेवटचं बोलणं होतं. मी रात्रभर फोन लावत होतो, पण तिनं काही फोन उचलला नाही." देवेंद्र सांगतात.
 
"दुसऱ्या दिवशी सकाळी मी तिच्या घरी जायचं ठरवलं. तितक्यात मला मेसेज आला माझ्या फोनची बॅटरी लो आहे तू काही आता फोन करू नको. हा मेसेज 25 एप्रिल रोजी आला. त्यात इतक्या स्पेलिंग मिस्टेक होत्या की मला शंका आली की हा मेसेज तिने केलाच नाही. मी तेव्हाच तिच्या घरी जायचं ठरवलं. मी कौठ्याला गेलो. तिथं मरकड यांचं घर कुठे आहे विचारणा केली. तिच्या घराजवळ आलो."
 
"तिथं कुणीच नव्हतं. त्यांच्या घरी चार पाच पाहुणे आलेले दिसत होते. बहुतेक आपल्या लग्नाच्या बोलणीसाठी हे आले आहेत असा माझा समज झाला. त्यांच्या घराबाहेर उभा राहून मी तिची वाट पाहत होतो. तितक्यात समोरून एक व्यक्ती आली. मला लक्षात आलं की हेच प्रतिभाचे वडील आहेत. मला प्रतिभेने एकदा त्यांचा फोटो दाखवला होता त्यावरून मी त्यांना ओळखलं. त्यांना मी विचारलं प्रतिभा कुठे आहे. त्यांनी मलाच प्रश्न केला की तू कोण," देवेंद्र सांगतात.
 
"मी म्हटलं मी तिचा नवरा आहे. आमचं लग्न झालं आहे 1 एप्रीलला. तेव्हा त्यांना घरापासून काही अंतरावर असलेल्या झाडाखाली काहीतरी जळत होतं त्याच्याकडे बोट दाखवलं आणि म्हणाले ते दिसतंय ना. ती तिची चिता आहे. तिला आकडी (अॅटॅक) आली आणि त्यात ती गेली."
 
"मला विश्वासच बसेना की मी जे ऐकलं ते खरं आहे म्हणून. मला हेच वाटलं की लग्न केल्यामुळे त्यांचा राग असेल आणि त्यातून हे असं बोलले असतील. मी परत विचारलं खरं सांगा प्रतिभा कुठे आहे, तेव्हा ते म्हणाले आता इथून जातो की तुझ्याकडे पाहू. मी त्यांना पुढचा प्रश्न केला जर तिला अॅटॅक आला तर मग तिला तुम्ही डॉक्टरकडे नेलं का? तिचं पोस्टमार्टम केला का. मी तिचा नवरा आहे तर मला आधी का नाही सांगितलं," देवेंद्र सांगतात.
 
"माझ्या या प्रश्नाला ते चिडले आणि म्हणू लागले तू आता इथून गेला नाही तर तुला मारायला पोरं बोलवतो. हे ऐकून मला समजलं की त्यांनीच प्रतिभाचं काहीतरी बरंवाईट केलं आहे. मी तिथून घरी आलो आणि माझ्या घरच्यांना हे सांगितलं. मग आम्ही पोलिसांत जायचं ठरवलं आणि फिर्याद दिली."
 
या प्रकरणाचा तपास करणारे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास देशमाने सांगतात की, आरोपी ब्रह्मदेव मरकड हे फरार आहेत. फिर्याद मिळाल्यानंतर पोलिसांनी चौकशीला सुरुवात केली. त्यात पोलिसांच्या लक्षात आलं की प्रतिभाचा आजाराने मृत्यू झाल्याची बातमी तिच्या वडिलांनी गावात उठवली. रुग्णालयात न नेता किंवा कुठेही नोंद न करता तिचा मृतदेह जाळण्यात आला. आता त्यांच्यावर मुलीच्या हत्येचा आणि पुरावे नष्ट केल्याचा आरोप आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.
 
रामपूरचे अप्पर पोलीस अधीक्षक रोहिदास पवार हे सांगतात की "मुलगा आणि मुलीची जात वेगळी होती. त्यातून तिच्या वडिलांनी मनात राग धरून मुलीची हत्या केली असं प्रथमदर्शनी सांगत आहेत. त्यात त्यांनी पुरावे नष्ट करण्याचा आणि मुलीच्या मोबाइलवरून मेसेज करण्याचाही प्रकार केला आहे. आता फरारी असल्यामुळे त्यांच्यावरचा संशय आणखी बळावला आहे. त्यांना पकडल्यानंतर त्यांची चौकशी केली जाईल आणि मगच पुढील कारवाई केली जाईल."
 
आरोपी पकडले जाऊन आपल्या पत्नीला न्याय मिळावा अशी देवेंद्र यांची इच्छा आहे. बोलताना देवेंद्र यांचा कंठ दाटून येतो आणि ते म्हणतात, "मी तिला न्याय मिळवून देण्यासाठी कायदेशीर मार्गाने जे शक्य असेल ते सर्वकाही करायला तयार आहे. तपास पण योग्य दिशेने चाललाय असं मला वाटतं, पण सर तुम्ही मला सांगा की कोणता बाप आपली मुलगी आजारी आहे म्हणल्यावर तिला दाखवण्यात नेणार नाही. तिला डॉक्टरकडे नेण्याची गरज पण त्यांना वाटू नये का? हा माणूस स्वतः डॉक्टर आहे? 24 वर्षांच्या मुलीला कधी अॅटॅक येऊ शकतो का?"
 
त्यांचे प्रश्न संपत नाहीत की ते पुढे सांगतात, "लग्नाला 20-22 दिवसच झाले होते हो. आमच्यात ते पडले नसते तर चांगला सुखाने संसार चालू होता आमचा."