जगभरातील वेगवेगळे शास्त्रज्ञ आणि त्यांची पथकं कोरोना व्हायरसवर प्रभावी ठरू शकणारी लस शोधण्याच्या प्रयत्नात आहेत.
ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनी 'सध्याच्या मानवी आयुष्यातील सर्वाधिक आवश्यक प्रयत्न' अशा शब्दांत या प्रयत्नांचं वर्णन केलं आहे.
पण प्रगत वैद्यकीय तंत्रज्ञानाच्या बळावर लसीचा शोध लागला तरी जगभरातील सात अब्ज लोकांना ही लस लवकरात लवकर कशा प्रकारे दिली जाईल, हा प्रश्न सर्वांसमोर आहे.
युकेमध्ये ऑक्सफर्डशायर येथील हार्वेल सायन्स कॅम्पसमध्ये लस बनवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
इथं कोव्हिड-19 च्या पार्श्वभूमीवर व्हॅक्सीन मॅन्यूफॅक्चरिंग अँड इनोव्हेशन सेंटर (VMIC) बनवण्यात येत आहे.
VMIC चे मुख्य कार्यकारी अधिकारी मॅथ्यू डचर्स यांनी लस बनवण्याच्या अभियानाबाबत अधिक माहिती दिली.
"आम्ही लस बनवण्यासाठीची वेळ मर्यादा जवळपास निम्म्यावर आणली आहे. साधारणपणे लस बनवण्यासाठी 2022 वर्ष उजाडलं असतं. पण आम्ही 2021 मध्येच ही लस बाजारात आणण्याचा प्रयत्न करत आहोत," असं ते म्हणाले.
'प्रभावी लस बनवण्याचं आव्हान'
कोव्हिडची जागतिक साथ आल्यापासून डुचर्स यांनी सुटी घेतलेली नाही. कारण ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्येच ही लस निर्माण केली जाऊ शकते, याचा त्यांना विश्वास आहे. ही एक प्रचंड मोठी जबाबदारी असल्याचं त्यांना वाटतं.
हे अत्यावश्यक आहे. फक्त ब्रिटनच नव्हे तर जगभरात प्रत्येकासाठी ही लस तातडीने आणि प्रभावी पद्धतीने बनवण्यासाठी हे आवश्यक असल्याचं डुचर्स सांगतात.
तुम्हाला कोरोनावरची प्रभावी लस बनवायची आहे. त्यानंतर जगभरात करोडोंच्या संख्येने याचं उत्पादन होईल. हे आव्हानात्मक आहे. त्यामुळे अतिशय काळजीपूर्वक काम केलं जात आहे, असं डुचर्स यांनी सांगितलं.
ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने लस निर्मिती करण्यापूर्वीच पुरेशी जागा उपलब्ध केली आहे. जगभरात लस चाचणीसाठी पाठवण्यापूर्वीच त्यांना जागेची सोय करून ठेवावी लागली.
मानवावर ही लस वापरताना विविध प्रकारच्या कोव्हिड-19 लस बनवण्याची गरज आहे. जगाच्या कानाकोपऱ्यात ही लस वितरीत करण्यात येणार आहे.
लशींच्या संदर्भात काम करणाऱ्या 'गवी' या आंतरराष्ट्रीय संघटनेने सर्वच देशांना लशींवर काम करण्याची सूचना केली आहे.
पण यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर सहकार्य मिळवणं इतकं सोपं नाही. अनेक श्रीमंत देश पूर्वीपासूनच औषध कंपन्यांसोबत करार करत आहेत. लशीचा शोध लागल्यास सर्वप्रथम स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांनी हे पाऊल उचललेलं आहे.
'देशांच्या स्वार्थीपणाचा अडसर'
गवी संघटनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सेठ बर्कले यांच्या मते, लस निर्मितीच्या कामातील मुख्य अडसर म्हणजे कथित 'लस-राष्ट्रवाद'.
प्रत्येक देशाने या संकटाचा जागतिक पातळीवर विचार करून लस निर्मिती करावी. स्वार्थीपणा न दाखवता आपण सर्वांचा विचार करायला हवा, असं बर्कले यांना वाटतं.
तुमच्या आजूबाजूच्या देशांमध्ये कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला असताना तुमच्या देशातील दळणवळणावरसुद्धा त्याचा परिणाम होऊ शकतो. तुम्ही पूर्वीच्या 'नॉर्मल' परिस्थितीत जाऊ शकणार नाही. प्रत्येक जण सुरक्षित असेल तरच आपण सुरक्षित आहोत, हे सर्वप्रथम आपण लक्षात घेतलं पाहिजे, असं ते सांगतात.
विकसनशील देशांना योग्य लस उपलब्ध व्हायला हवी. शिवाय लस वितरण किंवा लस पुरवठा हासुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. जगभरात पुरेशा प्रमाणात काचेच्या बाटल्या उपलब्ध असल्या पाहिजेत. वैद्यकीय क्षेत्रातील काचेच्या वस्तू बनवणाऱ्या उद्योगांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागत असल्याचं गेल्या काही दिवसांत समोल आलं होतं.
त्यामुळे 2021 पर्यंत पुरेशा प्रमाणात काचेच्या बाटल्यांची निर्मिती व्हायला हवी, अशी अपेक्षा बर्कले यांनी व्यक्त केली.
काचेच्या बाटल्यांप्रमाणेच फ्रीज आणि इतर उपकरणांची उपलब्धता तपासून घ्यायला हवी, असंही त्यांना वाटतं.
लशींचा साठा करण्यासाठी शीतगृहांची आवश्यकता
प्रा. टोबी पीटर्स हे बर्मिंगहॅम युनिव्हर्सिटीमध्ये शीतगृह तज्ज्ञ आहेत. विकसनशील देशांमध्ये मोठ्या प्रमाणात लशीचा साठा करण्यासाठी शीतगृहांची क्षमता कशा प्रकारे वाढवण्यात येऊ शकते, या विषयावर ते गवी संघटनेसोबत मिळून काम करत आहेत.
लशीचा साठा योग्य प्रकारे व्हावा, यासाठी प्रा. पीटर्स मोठ-मोठ्या खाद्यपदार्थ आणि पेयपदार्थ उत्पादक कंपन्यांच्या संपर्कात आहेत.
या कंपन्यांकडे पूर्वीपासूनच मोठ्या क्षमतेचे फ्रीज, शीतगृह असल्यामुळे याठिकाणी लशींचा साठा करण्यासाठी त्यांची मदत होऊ शकते.
सुरुवात कुणापासून?
कोरोनावरची लस तयार झाल्यानंतर जगभरात नवे प्रश्न निर्माण होणार आहेत.
देश लशीचं कशा प्रकारे वितरण करतील, याबाबत त्यांना थेट प्रश्न विचारले जाऊ शकतात, असं डॉ. चार्ली वेलर यांना वाटतं. डॉ. वेलर हे युकेमधील वेलकम ट्रस्टमध्ये लस विभागाचे प्रमुख आहेत.
त्यांच्या मते, "लशीची गरज कुणाला आहे? सर्वाधिक धोका कोणत्या समाजगटाला जास्त आहे? जास्त प्राधान्य कुणाला दिलं जाईल? हे प्रश्न लस तयार झाल्यानंतर समोर येऊ शकतात.
लस आल्यानंतरही लशीकरण करणं आव्हानात्मक ठरू शकतं, असा अंदाज चार्ली व्यक्त करतात.
उदाहरणार्थ, युकेमध्ये मतदान प्रक्रियेप्रमाणे मतदान केंद्रांमधून हे काम केलं जाऊ शकतं. पण गरीब देशांमध्ये असं करणं अवघड आहे.
या कामात प्रशिक्षित वैद्यकीय कर्मचाऱ्यांची भूमिका सर्वात जास्त महत्त्वपूर्ण असेल, असं डॉ. वेलर यांना वाटतं. त्यांच्या मदतीने हे काम नियोजनबद्ध पद्धतीने केलं जाऊ शकतं.
दरम्यान, कोरोनावरची लस लवकरच तयार होईल, अशी अपेक्षा शास्त्रज्ञांना आहे. या लशीचा शोध लावण्यासाठी अनेकजण रात्रीचा दिवस करून काम करत आहेत. लस निर्मितीसाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न या शास्त्रज्ञांकडून केले जात आहेत.