शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: गुरूवार, 3 जून 2021 (16:36 IST)

HSC Exam रद्द : मूल्यांकनाचे पर्याय काय आहेत?

एचएससी बोर्डाच्या बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. शालेय शिक्षण विभागाने या परीक्षा रद्द करण्याचा प्रस्ताव दिल्यानंतर यासंदर्भात आज (3 जून) राज्य आपत्ती व्यवस्थापनाची बैठक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. पण बारावीच्या विद्यार्थ्यांना गुण देण्याचा फॉर्म्यूला काय असेल याबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
 
मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं, "आजच्या बैठकीत बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. आपत्ती व्यवस्थापन विभागाने हा निर्णय घेतला. परीक्षा रद्द करण्याची भूमिका आधीपासूनच होती पण काहीजणांनी याला विरोध दर्शवला होता."
 
सीबीएसई बोर्डाने विद्यार्थ्यांचे मूल्यमापन अंतर्गत गुणांच्या आधारे वस्तुनिष्ठ पद्धतीने करणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यानुसार एचएससी बोर्ड सुद्धा अकरावी आणि बारावीच्या अंतर्गत परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना मिळालेले गुण निकालासाठी ग्राह्य धरू शकतात.
 
सर्वोच्च न्यायालयात सीबीएसई बोर्डाने बारावीच्या विद्यार्थ्यांना गुण देण्याचे मापदंड दोन आठवड्यात जाहीर करू असं सांगितलं आहे. त्यामुळे एचएससी बोर्डाकडून सुद्धा आगामी काही दिवसांत याबाबत सविस्तर माहिती येणं अपेक्षित आहे.
 
मूल्यांकनाचे पर्याय काय आहेत?
दहावीच्या विद्यार्थ्यांप्रमाणे बारावीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यांकन अकरावी आणि बारावीच्या महाविद्यालयीन स्तरावर झालेल्या परीक्षांच्या आधारे होण्याची शक्यता आहे.
 
अकरावी आणि बारावीत विद्यार्थ्यांच्या युनीट टेस्ट आणि प्रिलियम्स झाल्या आहेत. या परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना मिळालेल्या गुणांचा फॉर्म्यूला अंतिम निकासाठी विचारात घेतला जाऊ शकतो, असं शिक्षणतज्ज्ञांनी सांगितलं.
 
शिवाय, जे विद्यार्थी अंतर्गत मूल्यमापनात मिळालेल्या गुणांवर समाधानी नसल्यास त्यांना कोव्हिडची परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर प्रचलित पद्धतीनुसार परीक्षा देण्याची संधी दिली जाण्याचीही शक्यता आहे.
 
कनिष्ठ महाविद्यालय प्राध्यापक संघटनेचे प्रमुख मुकुंद अंधलकर यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, "अद्याप कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही. यासंदर्भात शिक्षण विभाग चर्चा करत आहे. मला वाटतं अकरावी आणि बारावीसोबतच या विद्यार्थ्यांच्या दहावी बोर्डाच्या गुणांचाही विचार केला जाऊ शकतो. कारण दहावीच्या बोर्डाचे मूल्यमापन पारदर्शी पद्धतीने होत असतं."
 
पदवी परीक्षेसाठी सीईटी द्यावी लागणार?
महाविद्यालयीन प्रवेशासाठी स्वतंत्र सीईटीची परीक्षा होणार?
 
दहावीची परीक्षा रद्द केल्यानंतर राज्य सरकारने अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेसाठी स्वतंत्र सामाईक परीक्षेचा पर्याय विद्यार्थ्यांना दिला आहे. ही परीक्षा प्रत्येक विद्यार्थ्यासाठी बंधनकारक नाही. पण या परीक्षेत प्रविष्ठ झालेल्या विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशात प्राधान्य देण्यात येणार असल्याचं शिक्षण विभागाने स्पष्ट केलं.
 
दहावीच्या विद्यार्थ्यांना दिलेल्या या पर्यायांप्रामाणेच बारावीच्या विद्यार्थ्यांसाठीही हे निकष लागू केले जाऊ शकतात, असं शिक्षणतज्ज्ञांचं म्हणणं आहे.
 
यासंदर्भात सर्व विद्यापीठांच्या अधिकाऱ्यांची नुकतीच एक बैठक पार पडली. बारावीची परीक्षा शिक्षण विभागाने रद्द केल्यास विद्यापीठाच्या म्हणजेच पदवीच्या प्रवेशासाठी स्वतंत्र परीक्षा घेण्याबाबत या बैठकीत चर्चा झाल्याचे समजते. ही प्रवेश परीक्षा आर्ट्स, सायन्स, कॉमर्स आणि प्रोफेशनल कोर्सेस अशा सर्व शाखांसाठी वेगवेगळी असू शकते. यासंदर्भात अद्याप कोणताही अधिकृत निर्णय घेण्यात आलेला नाही.
 
मुंबईतील एका नामांकित महाविद्यालयाच्या वरिष्ठ प्राध्यपकांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, "पदवी प्रवेशासाठी स्वतंत्र प्रवेश परीक्षा होणं गरजेचं आहे. कारण कनिष्ठ महाविद्यालयांचे मूल्यमापन पारदर्शी असेलच असे नाही. तसंच विद्यार्थ्यांना सरसकट गुण दिले गेले तर प्रवेशासाठी स्पर्धा प्रचंड वाढणार आहे. हे विद्यार्थ्यांसाठीही योग्य ठरणार नाही. शिवाय, महाविद्यालयात उच्च शिक्षणाची गुणवत्ता राखता येणार नाही. त्यामुळे शासन व्यवस्थेने निर्णय घेताना या गोष्टींची खबरदारी घेणं गरजेचं आहे."