शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: बुधवार, 13 नोव्हेंबर 2019 (10:59 IST)

महाराष्ट्र राष्ट्रपती राजवट : सध्याच्या स्थितीत कोणाचाही आमदार फुटणार नाही- अजित पवार

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर शिवसेनेने सत्तास्थापनेची मुदत वाढवून न दिल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. काँग्रेस नेते आणि ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल सेनेची बाजू कोर्टात मांडणार आहेत.
 
शिवसेनेच्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचीही आज बैठक असून सत्तास्थापनेबाबत पुढील रणनीती ठरण्याची शक्यता आहे.
 
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी तीनही पक्ष सत्ता स्थापनेच्या दिशेनं जात असल्याचं स्पष्ट केलं. "काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये चर्चा सुरू आहे. सरकारमध्ये कोण कोणत्या पदांवर काम करेल हे ठरवावं लागेल, आगामी निवडणुकांमध्ये तीनही पक्षांची काय भूमिका असेल यावर चर्चा होणं गरजेचं आहे," असं अजित पवार यांनी म्हटलं.
 
"महाराष्ट्रात सध्याच्या स्थितीत कोणताही आमदार फुटणार नाही. चारपैकी तीन पक्ष जर एकत्र आले, तर त्यांच्यासमोर कुणीही निवडून येणार नाही," असंही अजित पवार यांनी स्पष्ट केलं.
 
गेल्या 24 ऑक्टोबरपासून महाराष्ट्रात सुरू असलेल्या सत्तासंघर्षाला काल (12 नोव्हेंबर) अल्पविराम मिळाला आहे. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली असून शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांत चर्चा सुरूच आहेत.
 
आम्हाला आता 48 तास नव्हे तर सहा महिन्याचा वेळ राज्यपालांनी दिला आहे, असा टोला काल उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेत लगावला.
 
भाजपने सत्ता स्थापन करण्यास असमर्थता दर्शवल्यानंतर गेले दोन दिवस महाराष्ट्रात आणि दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग आला होता. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांमध्ये अंतर्गत आणि काही अंशी परस्परांमध्ये चर्चा झाल्या.
 
राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता स्थापन करण्यासाठी 12 नोव्हेंबरच्या रात्री रात्री 8.30 वाजेपर्यंत मुदत दिली होती. मात्र दुपारीच राज्यपालांनी केंद्राकडे राष्ट्रपती राजवटीची शिफारस केली. राष्ट्रपतींच्या मंजूरीनंतर ती लागू करण्यात आली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली आणि चर्चेनंतर अंतिम निर्णय घेण्यात येईल असं सांगितलं.
 
उद्धव ठाकरे यांनीही पत्रकार परिषद घेत राज्यपालांच्या निर्णयावर तिरकस शब्दांत टीका केली आणि अनेक अडचणीच्या प्रश्नांना बगल दिली. तर भाजपनेही काल 'वेट अँड वॉच'ची भूमिका घेतली असल्याचं माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जाहीर केलं. तर राज्याला लवकरात लवकर स्थिर सरकार लाभावं अशी अपेक्षा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.
 
दरम्यान काल रात्री शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांच्यात चर्चा झाल्याचं वृत्त ANI या वृत्तसंस्थेने दिलं आहे.