गुरूवार, 2 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: मंगळवार, 12 नोव्हेंबर 2019 (15:51 IST)

महाराष्ट्र राज्यपाल कोश्यारी यांची राष्ट्रपती राजवटीची शिफारस, शिवसेनेची सुप्रीम कोर्टात धाव

भाजप आणि शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसला महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी सत्तास्थापनेसाठी निमंत्रण दिलं आहे. मात्र राज्यपालांनी राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस केल्याची बातमी विविध स्रोतांकडून येत आहे. त्यामुळे सत्तापेच कायम आहे.
 
आधी सर्वांत मोठ्या पक्षाने अर्थात भाजपने सत्तास्थापनेची असमर्थता दर्शविल्यानंतर सोमवारी आधी शिवसेनेने सरकारस्थापनेचा दावा केला. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाने शिवसेनेला पाठिंब्याचं पत्र ऐनवेळेपर्यंत मिळालं नाही. आणि राज्यपालांनी सरकार स्थापनेसाठी मुदत वाढवून देण्यास नकार दिल्याने शिवसेनेच्या अडचणीत वाढ झाली.
 
राज्यपालांनी आता राष्ट्रवादी काँग्रेसला सरकार स्थापनेसाठी विचारणा केली असून त्यांना आज (12 नोव्हेंबर) रात्री साडेआठपर्यंतची मुदत दिली आहे. त्यातच राष्ट्रपती राजवटीचे ढग महाराष्ट्रावर घोंघावत आहेत.
 
दुपारी 3.25 - राष्ट्रपती राजवटीची शिफारस
 
राज्यपालांनी राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस केल्याची बातमी ANI वृत्तसंस्थेने दिली आहे.
संविधानाच्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाला कामं करता येणं शक्य नसल्याची खात्री पटल्यामुळे, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी संविधानाच्या कलम 356 मधील तरतुदींनुसार अभ्यास करून अहवाल सादर केला आहे, अशी माहिती राजभवनाने जारी केली आहे.
 
दुपारी 2.45: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांची पत्रकार परिषद

 
 
सर्व आमदारांच्या बैठकीत पर्यायी सरकार स्थापन करण्यासाठीचे सर्व अधिकार शरद पवार यांना देण्यात आले आहेत.
 
तीन पक्ष सत्तेत सहभागी झाल्याशिवाय सरकार स्थापन होऊ शकत नाही. संध्याकाळी काँग्रेसच्या नेत्यांबरोबर चर्चा होणार आहे, त्यानंतर सर्व निर्णय होणार.
आज रात्री 8.30 वाजेपर्यंतचा वेळ आहे. अहमद पटेल, के.सी. वेणुगोपाल, मल्लिकार्जुन खरगे हे मुंबईतील वाय. बी. चव्हाण सेंटरला येत आहेत.
राष्ट्रपती राजवटीची शिफारस केली नाही, असं राजभवनानं स्पष्ट केलं नाही.