मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: मंगळवार, 12 नोव्हेंबर 2019 (12:12 IST)

'बुलबुल' चक्रीवादळाची तीव्रता वाढली

बंगालच्या उपसागरात आलेलं 'बुलबुल' हे चक्रीवादळ दिवसागणिक तीव्र होताना दिसतंय. ताशी 110 ते 120 किलोमीटर वेगानं ओडिशा, पश्चिम बंगालहून हे वादळ बांगलादेशकडे सरकत असल्याचं भारतीय हवामान विभागानं म्हटलं आहे. 
 
'बुलबुल' चक्रीवादळाचा धोका लक्षात घेता पश्चिम बंगालमध्ये खबरदारी घेण्यात आलीये. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुख्य नियंत्रण कक्षात जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. खबरदारीचा उपाय म्हणून कोलकाता विमानतळ 12 तासांसाठी बंदही ठेवण्यात आलं होतं. तसेच, किनारपट्टी भागातील जवळपास एक लाख नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आलंय.
 
या वादळामुळं पश्चिम बंगालच्या किनारी भागात काही ठिकाणी मुसळधार पावसानं हजेरी लावली. पूर्व मदिनापूर, पश्चिम मदिनापूर, हावरा, नदिया, हुगळी या भागात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि मिझोराम या राज्यांमध्येही पावसाची शक्यता आहे.
 
दरम्यान, ओडिशा राज्यात बुलबुल चक्रीवादळामुळं मोठं नुकसान झालंय. जनजीवन विस्कळीत झालं असून, बचावकार्य राबवलं जातंय. मात्र, अनेक भागात संपर्क तुटला आहे.