भुवनेश्वरशी इंदिरा गांधी यांच्या बऱ्याच आठवणी जोडलेल्या आहेत. पण यातील बऱ्याच आठवणी सुखद नाहीत.
याच शहरात त्यांचे वडील जवाहरलाल नेहरू आजारी पडले आणि त्यातच त्यांचं 1964 निधन झालं. याच शहरात 1967ला इंदिरा गांधीवर दगडफेक झाली होती, त्यांच्या नाकाचं हाड मोडलं होतं.
30 ऑक्टोबर 1984ला दुपारी इंदिरा गांधी यांनी जे भाषण केलं होतं ते नेहमीप्रमाणे त्यांच्या सल्लागार एच. वाय. शारदा प्रसाद यांनी बनवलं होतं, पण प्रत्यक्षात भाषण करताना त्यांनी वेगळंच भाषण केलं. हे भाषण करताना त्यांचा पूर्ण नूरच बदलला होता.
त्या म्हणाल्या, "मी आज इथं आहे, पण उद्या नसेनही. मला याची काळजी नाही. माझं जीवन मोठं राहिलं आहे आणि मला याचा अभिमान आहे की मी माझं आयुष्य तुम्हा लोकांच्या सेवेत व्यतीत केलं आहे."
"मी माझ्या शेवटच्या श्वासपर्यंत तुमची सेवा करत राहीन. मी जेव्हा मरेन तेव्हा माझ्या रक्ताचा शेवटचा थेंब आणि थेंब भारताला बळकट करण्यासाठी खर्ची पडेल."
नियती कधी कधी शब्दांतून उद्या येणाऱ्या दिवसाकडे इशारा करत असते. भाषणानंतर त्या राजभवनात आल्या तेव्हा राज्यपाल विश्वंभरनाथ पांडे म्हणाले की, तुम्ही मरणाचा उल्लेख करून मला हादरवून टाकलं आहे. यावर इंदिरा गांधी म्हणाल्या होत्या, "मला प्रामाणिक आणि सत्य बोलायला आवडते."
रात्रभर जाग्या होत्या
त्या दिवशी इंदिरा गांधी दिल्लीत आल्या तेव्हा त्या फार थकल्या होत्या. रात्री आरामही फार झाला नव्हता.
तेव्हा सोनिया गांधी समोरच्या खोलीत होत्या. पहाटे 4 वाजता त्या दम्याचं औषध घ्यायला उठल्या तेव्हा त्यांनी पाहिलं की इंदिरा जाग्याच होत्या.
सोनिया गांधी यांनी त्यांच्या 'राजीव' या पुस्तकात या रात्रीबद्दल लिहिलं आहे. त्या सांगतात कशा इंदिरा त्यांच्यामागे आल्या आणि औषध शोधायला सोनियांची मदत केली.
"तुझी तब्येत बिघडली तर मला हाक मार. मी जागीच आहे," असं इंदिरा सोनियांना म्हणाल्या.
सकाळी 7.30 वाजता त्या तयार होत्या. त्यांनी त्या दिवशी काळ्या काठाची केशरी साडी परिधान केली होती.
त्यांची पहिली भेट पीटर उस्तीनोव यांच्यासोबत नियोजित होती. ते इंदिरांवर डॉक्युमेंट्री बनवणार होते. ओडिशा दौऱ्यातही त्यांनी थोडं शूटिंग केलं होतं.
दुपारी ब्रिटनचे माजी पंतप्रधान जेम्स कॅलघन आणि मिझोरमचे एक नेते त्यांना भेटणार होते. सायंकाळी ब्रिटनच्या राजकन्या अॅनसोबत त्यांचं भोजन नियोजित होतं.
त्यादिवशी नाश्त्यात त्यांनी दोन टोस्ट, दोन अंडी आणि संत्र्याचा ज्यूस घेतला होता.
नाश्त्यानंतर त्यांचे मेकअपमन त्यांना पावडर आणि ब्लशर लावत होते. त्यावेळी त्यांचे डॉक्टर के. पी. माथूर तिथे आले. ते दररोज याच वेळी येत असतं. त्यांनी डॉ. माथूर यांना आत बोलवलं. दोघांत काही चर्चा झाली.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रेगन वयाच्या 80व्या वर्षी तरुण दिसण्यासाठी कसा मेकअप करतात, यावर दोघांत हस्यविनोदही झाला होता.
अचानक गोळीबार
नऊ वाजून 10 मिनिटांनी इंदिरा गांधी बाहेर आल्या तेव्हा वातावरण आल्हाददायक होतं. त्यांचे शिपाई नारायण सिंह छत्री घेऊन बाजूनं चालत होते.
त्यांच्या मागे आर. के. धवन आणि त्यांच्या मागे इंदिरा गांधीचे खासगी कर्मचारी नाथू राम होते. तर सर्वांत मागे त्यांचे खासगी सुरक्षा अधिकारी पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर दयाल होते. त्यांच्या मधोमध एक कर्मचारी टी सेट घेऊन आला. त्यानं पीटर उस्तीनोव यांना चहा दिला.
इंदिरा जेव्हा अकबर रोडला जोडणाऱ्या विकेट गेटवर आल्या, त्यावेळी त्या धवन यांच्यासमवेत चर्चा करत होत्या.
धवन यांनी त्यांना सांगितलं की, येमेनच्या दौऱ्यावर असलेले राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग यांना सायंकाळी सात वाजता दिल्लीत लॅंड करण्यासाठी निरोप दिला आहे.
म्हणजे इंदिरा गांधी त्यांना रिसीव्ह करतील आणि नंतर राजकुमारी अॅनच्या भोजनच्या कार्यक्रमाला जाऊ शकतील.
पण अचानक तिथं उपस्थित असलेला सुरक्षाकर्मचारी बिअंतसिंगनं रिव्हॉल्वर काढून इंदिरा गांधींवर गोळी झाडली. ही गोळी त्यांच्या पोटात शिरली.
इंदिरा गांधींनी त्यांचा चेहरा लपवण्याचा प्रयत्न केला. पण बिअंतसिंगनं अगदी जवळून झाडलेल्या गोळ्या त्यांच्या बगलेत, छातीत आणि कमरेत लागल्या.
'गोळी घाल'
इथून पाच फूटांवर सतवंतसिंग टॉमसन ऑटोमॅटिक कार्बाइन गन घेऊन उभा होता.
इंदिरा गांधींना कोसळताना पाहून तो इतका घाबरला होता की, काही क्षण तो स्तब्धच झाला होता. बिअंतसिंग जोरात ओरडला 'गोळी घाल'.
सतवंतनं त्याच्या गनमधून 25 गोळ्या इंदिरांवर झाडल्या.
बिअंतसिंगनं पहिली गोळी चालवून 25 सेकंद झाले होते. तिथे उपस्थित सुरक्षा कर्मचाऱ्यांची काहीच प्रतिक्रिया नव्हती. सर्वांत मागे असलेला रामेश्वर धावला, अजून सतवंत गोळ्या झाडतच होता. रामेश्वरच्या पायात गोळी लागली आणि तो जागेवरच कोसळला.
गोळ्यांनी छिन्नविच्छिन्न झालेला देह पाहून तिथं उपस्थित सहाय्यक एकमेकांना आदेश देऊ लागले. गोंधळ कसला सुरू आहे हे पाहण्यासाठी 1 अकबर रोडवरील एक पोलीस अधिकारी दिनेश कुमार भट्ट धावतच बाहेर आले.
अॅंब्युलन्स नादुरुस्त
यावेळेपर्यंत बिअंतसिंग आणि सतवंतसिंग यांनी शस्त्र खाली टाकली होती. बेअंत म्हणाला, "आम्हाला जे करायचं होतं ते आम्ही केलं आहे. तुम्हाला जे करायचं आहे ते तुम्ही करा."
त्याच वेळी नारायण सिंहनं बिअंतसिंगवर झडप घातली आणि त्याला खाली पाडलं. शेजारच्या गार्डरूममधून धावत आलेल्या जवानांनी सतवंतसिंगला पकडलं.
सर्वसाधारणपणे इथे एक अॅंब्युलन्स उभी असते, पण त्यादिवशी चालक इथं उपस्थित नव्हता. इथे उपस्थित इंदिरा गांधींचे राजकीय सल्लागार माखनलाल फोतदार यांनी जोरात ओरडून गाडी काढण्यास सांगितलं.
आर. के. धवन आणि दिनेश भट्ट यांनी इंदिरा गांधींना उचलून अॅम्बेसिडर कारमध्ये ठेवलं.
पहिल्या सीटवर धवन, फोतेदार आणि चालक होते. गाडी सुरू होणार होती तोच सोनिया गांधी 'मम्मी-मम्मी' ओरडत धावल्या.
इंदिरांची परिस्थिती पाहून त्या गाडीत बसल्या. इंदिरांचं डोकं त्यांनी त्यांच्या मांडीवर घेतलं होतं.
कार सुसाट वेगाने 'एम्स'कडे धावू लागली. चार किलोमीटरच्या या मार्गावर कुणीही काहीही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हतं. सोनियांचे कपडे रक्तानं भरले होते.
गाडी 9 वाजून 32 मिनिटांनी एम्समध्ये अँब्युलन्स पोहोचली. इंदिरांचा रक्तगट ओ आरएच निगेटिव्ह. तो इथे पुरेशा प्रमाणात उपलब्ध होता.
पण इंदिरा गांधी गंभीर आहेत, याची पूर्वकल्पना सफदरजंग रोडवरून कुणीही एम्समध्ये फोन करून दिली नव्हती.
जेव्हा इमर्जन्सी वॉर्डचं गेट उघडलं, तेव्हा तिथे स्ट्रेचरही नव्हतं, त्यामुळं इंदिरांना गाडीतून खाली उतरवण्यास 3 मिनिटं लागली होती.
इंदिरांना या परिस्थितीमध्ये पाहून तिथे उपस्थित डॉक्टर घाबरून गेले होते.
वरिष्ठ डॉक्टरांना तातडीनं याची कल्पना देण्यात आली. काही मिनिटातंच डॉ. गुलेरिया, डॉ. एम. एम. कपूर आणि डॉ. एस. बालाराम तिथे धावतच आले.
एलेक्ट्रोकार्डियोग्राममध्ये इंदिरांच्या हृदयात काही हालचाल जाणवत होती, पण त्यांची नाडी लागत नव्हती. त्यांच्या डोळ्यावरून दिसत होतं की, त्यांच्या डोक्याला मार लागला आहे.
एक डॉक्टर त्यांना तोंडावाटे पाईप ऑक्सिजनचा पाईप टाकत होता. इंदिरांना 80 बाटल्या रक्त चढवण्यात आलं होतं.
डॉक्टर गुलेरिया म्हणतात, "मला पाहता क्षणीच वाटलं होतं की, त्यांनी हे जग सोडलं आहे. पण खात्रीसाठी मी ईसीजी घेतला."
"त्यावेळी उपस्थित आरोग्य मंत्री शंकरानंद यांना विचारलं पुढं काय करायचं? त्यांना मृत घोषित करायचं का? ते म्हणाले, "नाही". मग आम्ही त्यांना ऑपरेशन थिएटरमध्ये नेलं."
फक्त हृदय शाबूत
डॉक्टरांनी त्यांचं शरीर हार्ट अॅंड लंग मशीनला जोडलं. हे यंत्र रक्त शुद्ध करतं. त्यामुळं त्यांच्या शरीराचं तापमान 37 डिग्री इतकं खाली आलं होतं. त्या या जगात नाहीत, हे आता स्पष्ट झालं होतं. पण तरीही त्यांना ऑपरेशन थिएटरमध्ये हलवण्यात आलं.
इंदिरांच्या यकृतात गोळी लागली होती. तर मोठ्या आतड्यांत 12 गोळ्या लागल्या होत्या. लहान आतड्यांना गंभीर इजा झाली होती.
त्यांच्या फुप्फुसात गोळी लागली होती, तसंच गोळी लागल्यानं बरगडीचं हाड मोडलं होतं. फक्त त्यांचं हृदय सुस्थितीमध्ये होतं.
सुनियोजित हत्या
गोळीबारानंतर 4 तासांनंतर म्हणजेच 2 वाजून 23 मिनिटांनी इंदिरा गांधींना मृत घोषित करण्यात आलं. पण सरकारी प्रसारमाध्यामामध्ये ही बातमी संध्याकाळी 6 वाजता देण्यात आली.
इंदिरा गांधींवर पुस्तक लिहिणारे इंदर मल्होत्रा म्हणतात, इंदिरा गांधीवर हल्ला होण्याची शक्यता गुप्तचर संस्थांनी व्यक्त केली होती. इंदिरांच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांतील शीख कर्मचाऱ्यांना त्यांच्या निवासस्थानावरून हटवण्याची शिफारसही करण्यात आली होती.
पण जेव्हा ही फाईल इंदिरांजवळ आली तेव्हा त्यांनी विचारलं आपण धर्मनिरपेक्ष नाही आहोत का?
त्यानंतर एकाच वेळी दोन शीख कर्मचाऱ्यांना त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात करायचा नाही, असा निर्णय घेण्यात आला.
31 ऑक्टोबरला सतवंतसिंगने पोट बिघडल्याचं नाटक करून शौचालयाजवळ ड्युटी लावून घेतली. त्यामुळं बेअंत आणि सतवंत एकत्र तैनात झाले आणि त्यांनी इंदिरा गांधीची हत्या करून ऑपरेशन ब्लूस्टारचा बदला घेतला.